बडोदा : स्मृती मानधनाचे अर्धशतक आणि रेणुका सिंगच्या पाच विकेट्समुळे भारतीय महिला संघाने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा २११ धावांनी पराभव केला. भारताच्या ९ बाद ३१४ धावांपुढे विंडीजचा डाव अवघ्या १०३ धावांमध्ये आटोपला. वन-डेमध्ये भारतीय महिलांचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा विजय, तर विंडीजचा सर्वांत मोठा पराभव ठरला. (Indian women’s win)
वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्मृतीने नवोदित प्रतिका रावलच्या साथीने भारताला ११० धावांची सलामी दिली. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या प्रतिकाने ६९ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. त्यानंतर स्मृतीने हरलीन देओलसोबतही अर्धशतकी भागीदारी रचली. स्मृतीने १०२ चेंडूंत १३ चौकारांसह ९१ धावा फटकावल्या. तिचे अर्धशतक मात्र ९ धावांनी हुकले. हरलीनने ४४ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर (३४), रिचा घोष (२६) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (३१) यांनीही भारताच्या धावसंख्येमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. विंडीजच्या झाएदा जेम्सने पाच विकेट्स घेतल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामी फलंदाज क्विआना जोसेफ धावबाद झाली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर विंडीजच्या कोणत्याच फलंदाजास फारसा टिकाव धरता आला नाही. विंडीजच्या संघातील सर्वोच्च धावसंख्या ही नवव्या स्थानावरील ॲफी फ्लेचरची होती. तिने २२ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह २४ धावा केल्या. रेणुकाने वन-डे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना २९ धावांत विंडीजचा निम्मा संघ गारद केला. प्रिया मिश्राने २ विकेट घेऊन तिला उपयुक्त साथ दिली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी, २४ डिसेंबर रोजी होणार आहे. (Indian women’s win)
Dominating Win 💪 #TeamIndia complete a 211 runs victory over the West Indies in the first ODI 👌
Scoreboard ▶️ https://t.co/OtQoFnoAZu#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WHTFt8qz8u
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
हेही वाचा :