नवी दिल्ली : देशातील तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यातूनच अकाली मृत्यू होण्याचे प्रकारही घडत आहेत. कनार्टकच्या हसन जिल्ह्यात एकाच महिन्यात अशी १८ प्रकरणे घडली. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरणामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढतेय की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागली होती. (ICMR Research)
या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) यांनी संशोधन केले. या संशोधनावर आधारीत महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले. त्यामुळे कोविड लसीमुळे तरुणांमधील अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही, तर अशा प्रकारांना जीवनशैली कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या अहवालाच्या आधारे हे वृत्त दिले आहे.
कोविड-१९ लसीकरण आणि तरुणांचा अकाली मृत्यू या दोघोंचा काहीही संबंध नसल्याचे अहवालांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (ICMR Research)
कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत हृदयविकाराने १८ तरुणांचा मृत्यू झाला. या चिंताजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल महत्त्वाचा आहे. आयसीएमआर-एनसीडीसी अभ्यासाच्या आधारे कोविड-१९ लसीकरण सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि लसीकरणामुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. या अहवालानुसार, कोविड-१९ लसीकरण धोका वाढवत नाही तर हृदयविकाराने होणाऱ्या अकाली मृत्यूमागे आनुवंशिकता, जीवनशैली आणि संबंधितांना आधी असलेल्या व्याधी आणि आजारासारखे घटक आहेत.
जीवनशैलीकडे दुर्लक्ष नको
हृदयविकारामुळे तरूणांमधील वाढत्या मृत्यूमागे अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत. अशा जोखीम घटकांपैकी धूम्रपान आणि कामाच्या ताणामुळे होणारा उच्च रक्तदाब हे जबाबदार आहेत, असे बेंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटल्सचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. रंजन शेट्टी सांगतात. “संबंधिताची फॅमिली हिस्ट्री, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, मधुमेह आणि अल्कोहोल हे इतर घटकही कारण ठरतात. सिगारेट ओढल्याने संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीचे नुकसान होते. कारण ते रक्ताभिसरणाची प्रक्रियाच बिघडवून टाकते, रक्तवाहिन्या जाड होतात. यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तदाब वाढतो, रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेक तयार होण्यास गती मिळते. त्यामुळे सिगारेट ओढणे सोडून देण्याशिवाय पर्याय नाही, असे ते सांगतात. (ICMR Research)
धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीलाही शेजारी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमुळे धोका असतो.
झोप आणि विश्रांती महत्त्वाची
झोप कमी होणे आणि उच्च रक्तदाब यांचा परस्पर संबंध आहे. “शरीर विश्रांती घेत नाही, तणाव संप्रेरक सक्रिय असतात, जळजळ आणि उच्च रक्तदाब असतो. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. त्यामुळे अस्थिर किंवा अगदी लहान प्लेक्स बाहेर पडतात आणि त्यावर रक्ताच्या गुठळ्या तयार होत राहतात. पुरेशी झोप न घेता अनेकजण जिममध्ये व्यायाम करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. ‘जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराने मृत्यू,’ अशा बातम्यांचे प्रमाणही हल्ली वाढले आहे, याकडे डॉ. शेट्टी यांनी लक्ष वेधले.
आयसीएमआरचे अभ्यास कशाबद्दल होते?
१८ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये, विशेषतः अचानक आलेल्या मृत्यूंमागील कारणे समजून घेण्यासाठी आयसीएमआर आणि एनसीडीसी एकत्र काम करत आहेत. हे शोधण्यासाठी, वेगवेगळ्या संशोधन पद्धतींचा वापर करून दोन पूरक अभ्यास करण्यात आले. एक भूतकाळातील डेटावर आधारित आणि दुसरा रिअल-टाइम संशोधन. आयसीएमआरच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने (एनआयई) केलेला पहिला अभ्यास मे ते ऑगस्ट २०२३ दरम्यान १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७ टेर्टिअरी केअर हॉस्पिटल्समध्ये करण्यात आला. त्यात ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान निरोगी दिसणाऱ्या परंतु अचानक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा समावेश होता. निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की कोविड-१९ लसीकरण तरुणांमध्ये अकाली मृत्यूचा धोका वाढवत नाही. (ICMR Research)
दुसरा अभ्यास सध्या एम्स, नवी दिल्ली करत आहे. तोही आयसीएमआरच्या सहकार्याने केला जात आहे. तरुणांमध्ये अचानक झालेल्या मृत्यूची सामान्य कारणे निश्चित करणे हे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे.
‘‘निर्णायक पुराव्यांशिवाय केलेल्या दाव्यांमुळे लसींवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे. कोविड प्रतिबंधक लसीने साथीच्या काळात लाखो लोकांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे निराधार अहवाल आणि दावे देशात लसींबद्दलच्या अनिश्चिततेला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो,’’ असे आयसीएमआरच्या निवेदनात म्हटले आहे.
प्रतिबंधात्मक चाचण्या कधी कराव्यात?
डॉ. शेट्टी सांगतात की, कुटुंबातील हिस्ट्री असलेल्या प्रत्येक तरुणाची २० वर्षांच्या सुरुवातीला आणि हिस्ट्री नसलेल्या कुटुंबातील सदस्यांनी २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान चाचणी करावी. लिपिड प्रोफाइल आणि रक्तचाचणीशिवाय कॅल्शियम स्कोअरिंग चाचणी प्लेक्स मॅप करू शकते तर सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीनने (hsCRP) उच्च-संवेदनशीलता समजू शकते. जळजळ होण्याचे रक्त घटक सूचक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त आहे की नाही हे सांगू शकते. त्यानंतर हृदयाच्या ताणाचे मॅपिंग करण्यासाठी ट्रेडमिल चाचणी किंवा टीएमटी करावी. प्रत्येक मधुमेही व्यक्तीने दहा वर्षांचा जोखीम स्कोअर घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.