मुंबई : विशेष प्रतिनिधी : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता घ्यावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल) दिले. (Cashless treatment)
काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैसे न भरल्याने दाखल न करून घेतल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री आबीटकर यांनी राज्यभरातून राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा घेतला. (Cashless treatment) बैठकीस मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगताप, विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, सहायक संचालक डॉ.रविंद्र शेटे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
- योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवडप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे त्यांनी आदेश दिले.
- या योजनेतील उपचार संख्येत वाढ, दरामध्ये सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणे, तसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री आबीटकर यांनी संबंधितांना दिले.
- जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (Cashless treatment)
- प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करून किमान ५ रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, अशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावी, असे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
- योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले.
हेही वाचा :
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना
आणि घरात कपडे पेटवणारी भानामती पळाली !