कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय विकासनितीचे धोरणकर्ते होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात उमटला. सप्ताहांतर्गत आज डॉ. प्रकाश कांबळे यांच्या “वर्तमान उपयुक्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या पुस्तकावर विशेष परिसंवाद रंगला.
यामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीष मोरे आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे सहायक संचालक अविनाश भाले यांनी सहभाग घेतला. परिसंवादात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय विकासनीतीचे खरे शिल्पकार म्हणून अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते, तर लेखक डॉ. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Dr. Ambedkar: The Architect of India’s Development Policy)
परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान केवळ सामाजिक किंवा राज्यघटनात्मक क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्यांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी ठोस आणि दूरदर्शी धोरणांचा आराखडा तयार केला. या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्या पुस्तकाने आंबेडकरांच्या आर्थिक विचारांना समकालीन संदर्भ दिला आहे. आंबेडकरांच्या विकासनीतीत शेती आणि उद्योग यांच्यातील समतोलाला विशेष महत्त्व देण्यात आले होते. शेतीतील अतिरिक्त मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्रात वळवून उत्पादनक्षमतेत वाढ साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. यामुळे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होऊन व्यापक आर्थिक प्रगती साधता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक लोकशाहीच्या संकल्पनेवर विशेष भर देताना डॉ. मोरे यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला समान आर्थिक संधी मिळणे, उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि संसाधनांवर सर्वांचा समान हक्क सुनिश्चित करणे हीच खरी लोकशाही आहे. यासाठी आंबेडकरांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्य समाजवादाच्या माध्यमातून महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण आणि सार्वजनिक नियंत्रण यावर त्यांनी भर दिला. मोठ्या उद्योगांमधून निर्माण होणारा नफा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी सरकारची भूमिका निर्णायक असावी. याचबरोबर संपत्ती व संसाधनांचे संतुलित वितरण, सामाजिक न्याय आणि आर्थिक समता यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सहायक संचालक अविनाश भाले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांचे इतक्या सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत केलेले सादरीकरण हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. अर्थशास्त्रासारखा गुंतागुंतीचा विषयही सामान्य वाचकाला सहज समजेल, अशा पद्धतीने मांडताना लेखकाने बाबासाहेबांच्या विचारांची मूळ गाभा जपला आहे. (Dr. Ambedkar: The Architect of India’s Development Policy)
लेखक डॉ. प्रकाश कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील अर्थशास्त्रज्ञ हा महत्त्वाचा पैलू समाज आणि अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिला असून, तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्रीय संशोधन, भारताच्या नियोजन प्रक्रियेतले योगदान, वित्तीय समतोल, चलनव्यवस्था, रिझर्व्ह बँकेची संकल्पना, तसेच शेती व औद्योगिक विकासाचा समन्वय या सर्व बाबी आजच्या समस्यांवरही प्रभावी उपाय सुचवतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. महादेव देशमुख म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांची सुस्पष्ट, संक्षिप्त आणि संदर्भाधारित मांडणी हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अवघ्या १५२ पृष्ठांच्या या पुस्तकात २५ प्रकरणांद्वारे आंबेडकरांचे व्यापक आर्थिक तत्त्वज्ञान प्रभावीपणे उलगडले असून, संशोधनासाठी केवळ समस्या मांडण्यापेक्षा तिचे उपाय सुचवण्याची बाबासाहेबांची दृष्टी विशेष अधोरेखित होते.
यावेळी डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सिद्धांत माने यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, डॉ. एल.एन. घाटगे, ए.बी. कांबळे, आनंद खामकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Dr. Ambedkar: The Architect of India’s Development Policy)