कोलकाता : कोलकाता शहरातील एका हॉटेलला भीषण आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. २४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझवण्याचे काम हाती घेत नियंत्रण मिळवले. मृतांमध्ये हॉटेलमधील कर्मचारी आणि काही ग्राहक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Kolkota hotel fire)
कोलकातातील पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही १४ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अनेक लोकांना वाचवले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे.” दरम्यान हॉटेलमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे बोलले जात आहे. महानगरपालिकेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. (Kolkota hotel fire)
केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. त्यांनी राज्य सरकारला मदतीचे आवाहन केले. त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “मी राज्य सरकारला तातडीने मदत करण्याचे आवाहन करतो. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्नि सुरक्षा धोरण अधिक कडक करण्याची मागणी करतो.” त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने तातडीने लोकांना मदत करावी. जखमी लोकांना चांगले उपचार मिळावेत.पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सुभंकर सरकार यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोलकाता महानगरपालिकेवर टीका केली. ते एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “ही एक दु:खद घटना आहे. आग लागली तेव्हा बरेच लोक इमारतीत अडकले होते. इथे कोणतीही सुरक्षा नाही. मला माहीत नाही महापालिका काय करत आहे.”
हेही वाचा :