कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जाती जमातींना पुढे नेण्याचे काम केले. त्यांच्या कल्याणकारी कामांचा वारसा घेऊन महायुती काम करत आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली असून ही योजना कधीच बंद होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Jaysingpur)
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा आणि म्युझियमचे लोकार्पण उप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशिल माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, किसनराव वानखेडे, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी टीना गवळी, यांची प्रमुख उपस्थिती होती. (Jaysingpur)
उप मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनेक संकटांना तोंड देत छत्रपती शिवरायांनी स्वराजाची स्थापना केली. स्वराज्यात त्यानी पिण्याचे पाणी, शेतीला पाणी, बाजार पेठेची उभारणी, व्यापाराला उत्तेजन देत कुशल प्रशासनाद्वारे स्वराज्याचे सुराज्य केले. आठरापगड जातींना पुढे नेण्याचे काम शिवरायांनी केले. शिवरायांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या जयसिंगपूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा उभारण्यात आला आहे. शिवरायांचा पुतळा सर्वांना प्रेरणा देईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (Jaysingpur)
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने अडीच वर्षात आम्ही विकासाचा डोंगर उभारला. जनतेते आम्हाला पुन्हा सत्ता दिली. यापुढे महायुती दुप्पट वेगाने काम करुन सोन्याचे दिवस आणण्याचे काम केले जाईल, असे आश्वासनही उप मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. (Jaysingpur)
अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू छत्रपती म्हणाले, आमचे पणजोबा राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे यांच्या नावाने जयसिंगपूर शहराची उभारणी केली. नियोजनबद्ध आणि आदर्श शहर म्हणून ओळख असलेल्या जयसिंगपूरने वेगाने प्रगती करुन घोडदौड कायम ठेवली आहे. आजही आदर्श शहर म्हणून ओळख असलेल्या जयसिंगपूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा उभारल्याने शहराचा मान वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या आचार, विचारांचा आदर्श घेऊन विकासाचा वेग कायम राखेल. (Jaysingpur)