– निळू दामले
लॉस एंजेलिस टाइम्स या पेपरच्या संपादकीय विभागाच्या प्रमुख मेरियल गार्झा यांनी पेपरच्या मालकांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. लॉस एंजेलिस टाइम्स हा कॅलिफोर्नियातला सर्वात मोठा पेपर आहे. गार्झा यांच्या भूमिकेमुळं अमेरिकेत चर्चेचं वादळ सुरू झालं. वॉशिंग्टन पोस्ट या पेपरनंही भूमिका घेण्याचं टाळल्यानं चर्चा आणखी विस्तारलीय.
वर्तमानपत्रांची नीतिमत्ता हा विषय अमेरिकेत धसाला लागतोय. लॉस एंजेलिस टाइम्स या पेपरच्या संपादकीय विभागाच्या प्रमुख मेरियल गार्झा यांनी पेपरच्या मालकांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. लॉस एंजेलिस टाइम्स हा कॅलिफोर्नियातला सर्वात मोठा पेपर आहे. गार्झा यांच्या भूमिकेमुळं अमेरिकेत चर्चेचं वादळ सुरु झालं.
मेरियल गार्झानी लिहिलंय ‘कमला हॅरिस यांना पाठिंबा देण्याचं संपादकीय विभागानं ठरवलं होतं, तसं संपादकीय मी लिहिलं होतं. आमच्या मालकांनी ते प्रसिद्ध करायला नकार दिला. त्यामुळं मी संपादकीय विभागाचा राजीनामा देत आहे. आमच्या पेपरनं बातमीदारीच्या निःपक्षपाती परंपरेनुसार, निवडणुकीबद्दलच्या बातम्या, दिल्या. पेपरच्या परंपरेनुसार आमचा संपादकीय विभाग स्वतंत्र असतो. आमच्या विभागानं डोनल्ड ट्रंप यांची वर्तणुक लोकशाहीला मारक असल्यानं हॅरिस यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं. मालकांनी कोणतीही भूमिका घ्यायला नकार दिला…’
गार्झा यांच्या भूमिकेमुळं अमेरिकेत चर्चेचं वादळ सुरु झालं. वॉशिंग्टन पोस्ट या पेपरनंही भूमिका घेण्याचं टाळल्यानं चर्चा आणखी विस्तारलीय. लॉस एंजेलिस टाइम्सचे मालक आहेत सून शियॉन. ते व्यवसायानं डॉक्टर आहेत, एक बायोटेक कंपनी त्यांनी यशस्वीरित्या चालवून पैसे कमावले; २०१८ साली त्यांनी एंजेलिस टाइम्स हा १४० वर्षे जुना पेपर ५५ कोटी डॉलर खर्च करून विकत घेतला. सून शियॉन यांचा पत्रकारितेशी संबंध नाही, तिथला त्यांचा अनुभव शून्य आहे.
सून शियॉन यांनी पेपर विकत घेण्यापूर्वी २०१६ साली हिलरी क्लिंटन यांना निवडणूक निधी दिला होता. व्यक्तिशः सून शियॉन डेमॉक्रॅटिक उमेदवारांना पाठिबा देत आले आहेत. ओबामा यांना दोन वेळा, नंतर हिलरी क्लिंटन यांना आणि नंतर जो बायडन यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. आताच ते कां बदललेत याचा उलगडा जाणकारांना होत नाहीये.
२०१८ साली पेपर ताब्यात घेतला खरा पण तिथून पेपर तोट्यात जाऊ लागला. २०२३ साली शियॉन यांनी २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. गार्झा यांचा राजीनामा आल्यावर मालक प्रकाशक शियॉन यांनी सोशल मिडियात पोस्ट टाकली.’ सारासार विचार करून, विश्लेषण करून कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवा असं मी संपादकीय विभागाला सांगितलं. परंतू संपादकीय विभागानं गप्प रहायचा निर्णय घेतला..’
गार्झा तर म्हणतात की त्यांचा निर्णय झाला होता, मालकांनी तो अमान्य केला.सत्य कसं समजणार? गप्प रहायचा निर्णय घेतला की त्यांना गप्प रहायला सांगण्यात आलं? वर्तमानपत्रांच्या धोरणाचा विषय गेल्या वर्षी अमेरिकेत चर्चेत आला होता. न्यू यॉर्क टाईम्स या १७१ वर्षं जुन्या पेपरच्या संपादकीय विभागातल्या लेखकांनी, बातमीदारांनी पेपरच्या इसरायलच्या वर्तणुकीबद्दलच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करून राजीनामे दिले होते, जाहीरपणे.
हमासनं इस्त्रायलच्या केलेल्या दहशतवादी हल्ल्याला इसरायलनं दिलेलं प्रत्युत्तर अतिरेकी आणि प्रमाणाबाहेरचं होतं. इसरायलची १५०० माणसं मेली त्या बदल्यात इस्त्रायलनं ३५ हजार माणसं मारली. टाइम्स इसरायलच्या बाजूला झुकला. इसरायलच्या बाजूनं बातम्या, पत्रं, लेख, प्रसिद्ध होत. टाईम्सच्या संपादकीयातही इस्त्रायल बाजू उचलून धरली जात होती. अमेरिकाभर तरूण रस्त्यावर आले होते. वियेतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या धोरणावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी दाखवली होती तशी स्थिती इसरायलच्या आक्रमणानंतर झाली होती. टाईम्स तिकडं डोळेझाक करत होतं. टाईम्सचे वाचकही तक्रार करत असत.
अमेरिकेत एक गंमत आहे. वाचक वार्षिक वर्गणी भरतात, सबस्क्राइब करतात. पेपरचं धोरण आवडलं नाही तर नवी वर्गणी भरायला नकार देतात. नकार देताना कारणही सांगतात. त्यावरून पेपरांना नाराजी कळते. खप तर घसरतोच पण जाहिरातवालेही जाहिरात बंद करतात. राजीनामे आणि लोकांची नाराजी कळल्यावर न्यू यॉर्क टाइम्सनं आपल्या धोरणात बदल केला, बातम्यांचा तोल सांभाळला. लॉस एंजेलिस टाईम्समधेही लोक सबस्क्राईबचं बटन दाबताना खळखळ करत होते.
अमेरिकेत पेपरांनी अध्यक्षीय उमेदवाराला पाठिंबा देण्याची परंपरा आहे. लॉस एंजेलिस टाईम्स, न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्कर इत्यादी पेपर प्रत्येक निवडणुकीत एकाद्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतात. त्या पेपरांत बातमी आणि संपादकीय विभाग स्वतंत्र असतात, वेगळे असतात. बातमी विभाग पत्रकारीच्या परंपरांनुसार निवडणुकीच्या बातम्या देत असतो. बातम्या सर्व बाजूनी असतात. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याबद्दलची सर्व माहिती बातम्यांतून दिली जाते. त्यांच्या सभा, त्यांच्या जाहिराती, त्यांची मोहिम, लोकांचं मत, जाणकारांचं मत इत्यादी अनेक बाजूनी बातमी विभाग निवडणूक कव्हर करत असतो. तिथं पेपर कोणाची बाजू घेत नाही.
निवडणूक एका निर्णायक वळणार येते तेव्हां पेपरांचा संपादकीय विभाग विचार करून, संपादक मंडळाचा विचार, संपदकीयातून मांडतो, संपादक एक संपादकीय लिहितो. तेवढंच. त्यानंतर पेपर कोणाचाही भक्त होऊन काम करत नाही, स्वतंत्र रहातो. गार्डियन या पेपरमधे तर महत्वाचे राजकीय निर्णय घेत असताना संपादक बातमी आणि संपादकीय या दोन्ही विभागांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करत असतो. अमेरिकेतल्या पत्रकारीचं काही एक दर्शन या निमित्तानं घडलं हे खरं.