कोल्हापूर : प्रतिनिधी : खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने देशात क्षुद्र पद्धतीने राकारण केले जात आहे. त्यामुळे संघर्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि राज्यघटना’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु साळुंखे यांच्या हस्ते डॉ. चौसाळकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. चौसाळकर म्हणाले, सतत संशोधन करणे आणि नवनवीन विषय शोधत राहणे हीच शिकवण शिवाजी विद्यापीठात नोकरी लागल्यापासून मिळाली. विद्यापीठात अभ्यास आणि संशोधनापासून क्रियाशील राहता आणि. लोकांशी सातत्याने संवाद ठेवल्याने समाधान लाभते. त्यामुळेच मी तंदुरुस्त आहे. (Chausalkar Seminar)
डॉ. चौसाळकर म्हणाले, मुंबईहून शिवाजी विद्यापीठात पहिल्यांदा आलो तेव्हा डॉ. भणगे कुलगुरू होते. त्यांनी मानव्यशास्त्र विभागात काम करण्याची संधी दिली. पाठपुस्तक लिहिण्यापेक्षा संशोधन करत राहण्याचा त्यांनी दिलेला सल्ला मी प्रमाण मानला. मी मार्क्सवादी विचाराचा असूनही मला नोकरीची संधी मिळाले. त्याकाळातील अनेक कुलगुरुंचा वैचारिक खुलेपणा भावणारा होता. कोल्हापुरात कॉ. गोविंद पानसरे, आचार्य शांताराम गरुड, प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांच्या सहवासामुळे लोकांमध्ये कसे जावे, काय बोलावे, विषय कसा समजून घ्यावा, अवघड विषय सोपा करुन सांगण्याची कला कशी आत्मसात करावी ही शिकता आली. (Chausalkar Seminar)
डॉ. माणिकराव साळुंखे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, डॉ. चौसाळकर हे महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरुंचे सच्चे पाईक आहेत. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक काळी विद्यापीठात एकत्र काम करत असत. त्यात चौसाळकरही होते. त्यांनी शिक्षक म्हणून रुजू होऊन निवृत्तीपर्यंत विदयापीठात कार्य केले. इतर कोणतीही संधी न स्वीकारता त्यांनी विद्यापीठाशी निष्ठा जपली. कॉ. उदय नारकर म्हणणले, डॉ. चौसाळकर यांनी मानव्यशास्त्र आणि इतर कलांचा संगम साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. त्यांचे कार्य कोल्हापुरात सिद्ध झाले आणि राज्यभर पोहोचले. (Chausalkar Seminar)
किशोर बेडकीहाळ यांनी बीजभाषण केले. ते म्हणाले, सध्याचा काळ हा संघर्षाचा काळ आहे. सर्वधर्मसमभाव विस्कळीत झाला असून त्याला धोका निर्माण झाला आहे. राजकारणाचे हिंदूकरण झाले आहे. धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. चौसाळकर यांनी राष्ट्रवादावर मोठ्या प्रमाणावर लिखान केले आहे. सर्वसमावेशक राष्ट्रवाद आजची गरज आहे. विज्ञान शाखेच्या मंडळीनी कल वाढवला पाहिजे.
डॉ. विजय चोरमारे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. दमसाचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळु यांनी स्वागत केले. भारतीय राष्ट्रवादीचा मागोवा या चर्चा सत्रात भारती पाटील, प्रमोद आलेकर यांनी विचार मांडले. धर्म, धर्मांधता, धर्मनिरपेक्षता या विषयावर गौतमीपुत्र कांबळे, प्रकाश पवार, राधेश्याम जाधव यांनी विचार मांडले. दिनकर झिब्रे, प्राचार्य नागोराव कुंभार यांचीही भाषणे झाली. यावेळी गौरी भोगले, दि.बा. पाटील, विनोद कांबळे, गौरी चौसाळकर, डॉ. प्रमिला जरग उपस्थित होत्या. विक्रम राजवर्धन यांनी सुत्रसंचालन केले.