कोल्हापूरच्या नृत्यांगणा संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्ट बेस कॅपवर भरतनाट्यम नृत्य करुन मानवंदना दिली. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. १७ जणांच्या चमूत संयोगिता पाटील यांच्यासह त्यांच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज, प्रांजल दळवी यांचा समावेश होता. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुवर्णांकित झालेल्या एव्हरेस्टसमोर, काला पत्थरच्या शिखरापासून थोड्या खाली, जिथे नृत्यासाठी जागा होती, तिथे या चौघींनी उणे ८ अंश तापमानात, बर्फावर बूट काढून भरतनाट्यम सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली.
विनोद कांबोज
कोल्हापूरमधून पहिल्यांदाच १७ जणांचा चमू एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) मोहिमेसाठी २३ ऑक्टोबर रोजी रवाना झाला होता. या मोहिमेचे एक वेगळे ध्येय होते. ते म्हणजे थेँगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या ठिकाणी भरतनाट्यम सादर करून एव्हरेस्टला मानवंदना देणे. (Bharatanatyam pays homage to Everest)
२६ तारखेला लुक्ला येथून ट्रेकला सुरुवात झाली. ट्रेकचा पहिला दिवस उत्तम वातावरणात पार पडला. २६ तारखेला रात्री पाऊस सुरू झाला. त्यामुळे पुढचे पाच दिवस आम्हाला अत्यंत खराब वातावरणात, सतत कोसळणाऱ्या पावसात आणि गोठवणाऱ्या थंडीत ट्रेक करावा लागला. याच दरम्यान खुम्बू व्हॅलीमधील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध अशा थेँगबोचे मॉनेस्ट्रीसमोर भर पावसात भरतनाट्यमची पहिली वंदना सादर करण्यात आली. लुक्ला येथून ९,००० फुटांवरून ट्रेकला सुरुवात करून भर पावसात पाचव्या दिवशी डिंगबोचे येथे १४,६०० उंचीवर येऊन पोहोचलो होतो.
याच कालावधीत, ऑक्टोबरच्या शेवटी व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान अनपेक्षित असा पाऊस झाला आणि १३,००० फुटांपासून वरती प्रचंड स्नो फॉल झाला होता. डिंगबोचे येथे तापमान उणे १० अंश झाले होते. १९८६ पासुन एव्हरेस्ट बेस कॅम्प ला येण्याची विनोद कांबोज यांची ही २१ वी वेळ. एवढ्या वर्षात ऑक्टोबर महिन्यात असा स्नो फॉल कधीच पहिला नव्हता. (Bharatanatyam pays homage to Everest)
ट्रेकच्या सर्वात खडतर टप्प्याची सुरुवात झाली होती. सतत पाच दिवस झालेल्या बर्फवृष्टीमुळे चालणे अत्यंत जिकिरीचे आणि दमछाक करणारे झाले होते. डिंगबोचे ते लोबूचे, लोबूचे ते गोरखशेप, तेथून बेस कॅम्प, काला पत्थर आणि पुन्हा परतीचा ट्रेक हा संपूर्ण बर्फातून होणार होता.
बर्फातून चालण्यासाठी गेटर्स आणि क्रेम्पोन्सचा वापर करून, जो ट्रेक साधारणपणे ५ ते ६ तासात होत असतो, त्यासाठी आठ ते नऊ तास चालावे लागत होते. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उत्कृष्ट टीमवर्कचा समन्वय साधत, संपूर्ण ग्रुप शेवटचा कॅम्प गोरखशेप येथे ३ नोव्हेंबर रोजी पोहोचला. दुपारी दोन वाजता काला पत्थरची चढाई सुरू केली. सर्वांच्यासोबत संयोगिता पाटील, दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या भरतनाट्यमच्या पेहरावात आणि साज-शृंगारात चढाई करत होत्या. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुवर्णांकित झालेल्या एव्हरेस्टसमोर, काला पत्थरच्या शिखरापासून थोड्या खाली, जिथे नृत्यासाठी जागा होती, तिथे या चौघींनी उणे ८ अंश तापमानात, बर्फावर बूट काढून भरतनाट्यम सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली. संपूर्ण टीमच्या साथीने १८,२०० फूट उंचीवर, एव्हरेस्टने पहिल्यांदाच अशी मानवंदना स्वीकारली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मावळत्या सूर्यासोबत उगवत्या चंद्रानेसुद्धा एव्हरेस्टसोबत हजेरी लावली होती. मोहिमेचा दुसरा अध्याय यशस्वी झाला होता. (Bharatanatyam pays homage to Everest)
शेवटचा आणि महत्त्वाचा मोहिमेचा टप्पा ४ नोव्हेंबरला सकाळी गोरखशेपवरून बेस कॅम्पला जाऊन मोहिमेची सांगता करणे हा होता. आदल्या रात्री गोरखशेपचे तापमान उणे १८ डिग्रीपर्यंत खाली आले होते. पहाटे पाच वाजताच सर्व टीम तयारीला लागली होती. सर्व आवरून सकाळी ६:३० वाजता बेस कॅम्पकडे जाण्यासाठी निघालो. हा सर्व ट्रेक खुम्बू हिमनदीतूनच होता. नेहमी मोरेन (मोठ्या दगडगोट्यांनी भरलेला प्रदेश) पूर्ण बर्फाच्छादित झाला होता. थंडीही प्रचंड होती. साधारण तीन तास ट्रेक करून सर्वजण साडेनऊच्या आसपास बेस कॅम्पला पोहोचले. १८ वर्षांच्या प्रांजलपासून ६३ वर्षांच्या अभय देशपांडे यांच्यापर्यंत सर्व टीम बेस कॅम्पला पोहोचली होती. सर्वांचे उद्दिष्ट सफल झाले होते. त्याच वेळी तिसऱ्या मानवंदनेची सुरुवात झाली. नृत्य विशारद, गिनीज रेकॉर्ड प्राप्त संयोगिता पाटीलसह तिच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी १७,७०० फुटांवर भरतनाट्यमने तिथे आलेल्या जगभरातील ट्रेकर्सना मंत्रमुग्ध केले.
हे यश संपादित करण्यासाठी समिटच्या सर्व टीमने, तसेच ॲस्टर आधारचे डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर, सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप पाटील, त्यांची कन्या सई पाटील, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. अनिता कदम, न्यायाधीश (निवृत्त) वंदना तेंडुलकर, अश्वता विधाते आणि उद्योगपती अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील यांनी ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी केली. समिटची ही यशस्वी मोहीम गिर्यारोहिका खुशी कांबोज यांच्या नेतृत्वाखाली आणि विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झाली.