कोल्हापूर; प्रतिनिधी : वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळातील असला तरी यावेळी आमच्या सरकारकडून तो कायम राहणार असून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मार्गी लावला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ई-लॉबी व नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण व सहाय्य मंत्री, तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. (Ajit Pawar)
प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ फीत कापून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण व ई लॉबी मशिनवर पासबुक प्रिंटींग करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांनी स्वागत केले. यावेळी महालक्ष्मीची मूर्ती देऊन बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा सत्कार केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खा.धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर), माजी आमदार अमल महाडिक, संजयबाबा घाटगे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार निवेदिता माने, बँकेचे संचालक,कर्मचारी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेची ६१५४ कोटींची उलाढाल असून ८० टक्के कर्जपुरवठा केला असल्याचे सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जपुरवठा वितरणामध्ये जिल्हा बँकेने ३०० कोटींचे वाटप केले असून इतर बँकांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा बँक पुढे आहे. (Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले की, बँकेची अत्याधुनिक इमारत अतिशय देखण्या रुपात बांधली असून अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचा बँक ग्राहकांना निश्चित फायदा होईल. नाबार्डच्या योजना राबवणे व पीक कर्ज वाटपात ही बँक आघाडीवर आहे ही चांगली बाब आहे. बँकेचा कारभार काटकसरीने केल्याने बँक सुस्थितीत आली आहे. ई-लॉबी सुरू करणारी महाराष्ट्रातील ही एकमेव जिल्हा बँक असल्याचे उल्लेखनीय आहे.
दरम्यान अपात्र कर्जमाफी, नोटाबंदीच्या काळातील पडून असलेल्या नोटा याबाबत योग्य निर्णय घेतले जातील. आमच्या सरकारच्या काळात सोलर वीज, वीज बिल माफी, शेतकरी व महिला सक्षमीकरण करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. इथून पुढेही शेतकरी हितासाठी प्राधान्याने काम करत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले.
लाडक्या बहिणीला भाऊबीज भेट
आमच्या सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. लाडकी बहिण योजना ही अनेक महिलांना आधार ठरत असून आजच लाभार्थी महिलांच्या खात्यावर २ कोटी ३० लाख रुपये वर्ग केले आहेत. यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरचे पैसे पाठवून दिले आहेत.ही भाऊबीज भेट माझ्या तमाम बहिणींना संसाराचा आधार ठरेल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
गुलाबी जँकेट
अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची हल्ली खूप चर्चा आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात याचा दाखला देत अजितदादांचा नवा बदल हा परिवर्तनाचा व नव्या विचारांचा असून सर्वसामान्य जनता नेहमी त्यांच्या पाठीशी राहते. बारामतीमधून दादा कितीही नाही म्हटले तरी त्यांना उभे राहावे लागणार असून त्यांचा आठव्यांदा प्रचंड मताने नक्की विजय होईल असे सूतोवाच केले.
हेही वाचा :