काँग्रेसमध्ये रुजलेले, वाढलेले नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेची मलई चाखलेले हे नेते सत्तेबाहेर राहून पाण्याबाहेरच्या माशासारखे तळमळत राहिले. अपमान सहन करीन पण भाजपमध्ये जाईन अशी अनेकांची अवस्था झाली. आणि बघता बघता महाविकास आघाडीकडून २०२४ची विधानसभा लढवलेले ४३ उमेदवार वर्षाच्या आत सत्ताधारी पक्षांमध्ये गेले. व्यक्तिगत लोभापायी, सत्तेच्या हव्यासापोटी किंवा भ्रष्टाचाराच्या संरक्षणासाठी या लोकांनी महायुतीचा रस्ता धरला. प्रसारमाध्यमे मात्र त्यांच्या सत्तापिपासूपणाबद्दल न बोलता काँग्रेस आणि विरोधक कसे कमजोर होत आहेत, याबद्दल बोलताना दिसतात.
विजय चोरमारे
काँग्रेसच्या उगवत्या ता-यांमध्ये धुळ्याचे कुणाल रोहिदास पाटील, भोरचे संग्राम अनंत थोपटे, सासवडचे संजय जगताप यांची नावे घेतली जात होती. यातल्या कुणाल पाटील आणि संग्राम थोपटे यांच्या घरात तर अनेक दशके काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता पाणी भरत होती. सत्तेची मलई चाखून अजीर्ण व्हायची पाळी यांच्यावर आली. मात्र आमदारकीला पराभूत झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता ही चर्चेत असलेली नावे म्हणून ठळकपणे समोर आली. परंतु सत्तेवाचून तळमळणारे महाविकास आघाडीतले अनेक जीव एक वर्षाच्या आत आपला पक्ष सोडून सत्तेच्या वळचणीला गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. नजिकच्या काळात आणखी किती जण जातील याची गणना नाही. (Defeated 43 candidates in Mahayuti)
विचारधारेचे मडके कच्चेच
काँग्रेसचा दोष काय असेल तर सत्तेच्या मस्तीत या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांची विचारधारेची बैठक पक्की करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. सत्ता मिळत गेली. औकातीनुसार सत्तेचे वाटप होत गेले. ठराविक घराणी सत्तेची फळे चाखत राहिली. पण त्यांचे विचारधारेचे मडके मात्र कच्चेच राहिले. एखाद्याची बैठक पक्की असू शकते. पण त्यांनी सत्तेत असताना भ्रष्टाचारच इतका केलेला असतो की, सत्तेच्या वळचणीला जाण्यावाचून पर्यायच उऱत नाही. तुलनात्म दृष्ट्या आपण बघितले तर काय दिसते? १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली तेव्हा अनेक काँग्रेसचे नेते शिवसेनेकडे गेले होते. १९९९ला युतीची सत्ता गेली. त्यानंतर ते सगळेच्या सगळे माघारी फिरले. त्यानंतर सलग पंधरा वर्षे २०१४ पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. या काळात भाजपचा किंवा शिवसेनेचा एकही नेता काँग्रेसमध्ये आला नाही. कुणी आला असेल तर तो सत्तेच्या हव्यासाने नव्हे, तर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून. नारायण राणे यांचे त्यातले महत्त्वाचे उदाहरण आहे. म्हणजे सलग पंधरा वर्षे संघर्ष करताना भाजप-शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याला सत्तेशिवाय लोकांची कामे करता येत नाहीत, असे वाटले नाही. पण काँग्रेसची सत्ता जाताच अजित पवारांपासून अनेक जणांना तो साक्षात्कार झाला. विकासासाठी आम्ही सत्तेसोबत आल्याचे कीर्तन सगळे सांगू लागले. यांच्या विकासाचे डांबर एका पावसात उखडताना दिसले हा भाग वेगळा. शिवाय आपण आयुष्यभर सत्तेसोबत संघर्ष करणा-या नेत्यांचा अपमान करतोय याचेही भान त्यांना राहिले नाही. (Defeated 43 candidates in Mahayuti)
महायुतीतील तिन्ही पक्षांत इनकमिंग जोरात
देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला स्कोअर वाढवायचा आहे. भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे दिल्लीला दाखवून द्यायचे आहे. सरकारबद्दल लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. म्हणूनच त्या त्या ठिकाणच्या गावपातळीवरच्या निवडून येण्याची शक्यता असलेल्या पुढा-यांनाही पायघड्या घालण्यात आल्या. त्यावेळी भ्रष्टाचारी कोण आहे किंवा गुन्हेगार कोण आहे, याची फिकिर केली नाही. देवेंद्र फडणवीसांच्या प्रोत्साहनाने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाल्यावर एकनाथ शिंदे गप्प बसणे शक्यच नव्हते. त्यांनीही मग बोली लावायला सुरू केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले नाराज त्यांच्यासाठी आयते सावज होते. हे दोघे कामाला लागल्यावर अजित पवार तरी कसे शांत बसतील. त्यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या जुन्या सहका-यांना साद घालणे सुरू केले. शिवाय काँग्रेसमधल्या ज्या लोकांना भाजपमध्ये किंवा शिदे सेनेत जाणे गैरसोयीचे वाटत होते, त्यांच्यासाठी अजितदादांचा धर्मनिरपेक्ष थांबा सोयीचा होता. आता एवढे सगळे पुरेसे नव्हते म्हणून मग या तिघा बहाद्दरांनी एकमेकांच्या पक्षातल्या लोकांनाच डोळे मारायला सुरुवात केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर भाजपचा दुपट्टा घेऊनच फिरायला लागले. आणि जो आडवा येईल त्याच्या गळ्यात घालून पावन करून घेऊ लागले. म्हणजे मिस कॉल द्या आणि सदस्य व्हा यापेक्षाही रवींद्र चव्हाणांच्या दुपट्टा मोहिमेचा गाजावाजा झाला. प्रकरण थेट दिल्लीत अमित शाह यांच्यापर्यंत गेले. रावणाच्या लंकेचे अहंकारामुळे दहन झाल्यापर्यंत गोष्टी गेल्या. (Defeated 43 candidates in Mahayuti)
४३ पराभूत उमेदवारांचा महायुतीच्या वळचणीला
तर हे सगळं झालं राजकीय वातावरण. यातली नेमकी वस्तुस्थिती जाणून घेताना अनेक तपशील समोर येतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाला एका वर्ष उलटून गेले आहे. तरीसुद्धा विरोधी महा विकास आघाडी (MVA) सावरली नसल्याचे दिसून येते. आपल्या पक्षातील लोकांना एकत्र ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेते धडपडत आहेत. वर्षभऱातील आकडेवारीसंदर्भातला एकत्रित वृत्तांत इंडियन एक्सप्रेसच्या आलोक देशपांडे यांनी प्रसिद्ध केला आहे. या आकडेवारीवर नजर टाकली तर महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीतील तब्बल ४३ उमेदवार जे दुस-या क्रमांकावर होते, त्यांनी महायुतीच्या वळचणीला आसरा घेतल्याचे दिसून येते. स्वाभाविकपणे यातले बहुतांश भाजपमध्ये गेले आहेत. कारण भाजपच्या वॉशिंग मशिनचा प्रभाव. सर्व यंत्रणांपासून सर्व प्रकारचे संरक्षण शिवाय सत्तेचे सर्व अनुषंगिक लाभ. महायुतीतल्या ४३ जणांबरोबर तीन अपक्ष उमेदवारही नंतर महायुतीत दाखल झाले आहेत. (Defeated 43 candidates in Mahayuti)
रिकाम्या तिजोरीच्या चाव्यांवरुन श्रेयवादाच्या बढाया
एकूण ४६ पैकी २६ जण भाजपमध्ये, १३ जण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि ७ जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक माजी उमेदवारही भाजपमध्ये गेला आहे. हे झाले फक्त विधानसभेच्या उमेदवारांचे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेसाठीचे उमेदवार, महापालिकेसाठीचे उमेदवार, नगरपालिकेसाठीचे उमेदवार, एवढेच काय नगरपंचायतीसाठीचे उमेदवारही आपल्या पक्षात खेचून घेण्यासाठी सत्तेतल्या तिन्ही पक्षांची चढाओढ लागली. कुणी म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. कुणी म्हणतो चाव्या त्यांच्याकडे असल्या तरी अधिकार आमच्याकडे आहेत वगैरे वगैरे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे. अनेक योजनांचे पैसे तिकडे वळवले आहेत. आणि अशा रिकाम्या तिजोरीच्या चाव्यांवरून श्रेयवादाच्या बढाया मारल्या जात आहेत.
महायुतीतील मित्रपक्षांचे कुरघोड्यांचे राजकारण
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काय झाले होते ? तर महायुतीने राज्यातील २८८ पैकी २३४ जागा जिंकल्या होत्या. यात भाजपला १३२, शिंदे सेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त ५० जागांवर समाधान मानावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या. मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे-किनारपट्टी, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाले.
महायुतीला अपेक्षेहून मोठा दणदणीत विजय मिळवला. इव्हीएम घोटाळ्यापासून मतचोरीपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा त्यासंदर्भात सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा निवडणूक घोटाळा दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एव्हाना स्पष्ट होत आले आहे. हरियाणा, महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमधल्या विजयाने त्यासंदर्भातल्या शक्यता अधिक ठळक बनल्या आङेत. मात्र महायुतीला मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडीतील पक्षांची वाताहत झाली. ही वस्तुस्थिती आहेच. पाशवी म्हणता येईल असे बहुमत मिळाल्यामुळे महायुतीतील पक्षांनी आपली पकड अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न त्वरेने सुरू केले. त्याचबरोबर एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले. (Defeated 43 candidates in Mahayuti)
आता विरोधी पक्षातील जो उमेदवार आपल्या पक्षात का घेतले जाते,असा एक प्रश्न यासंदर्भात उपस्थित होतो. तर त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. विरोधक पुन्हा लढण्याची शक्यता संपते. कारण ते आणखी कमजोर होतात. ज्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचा विजय झाला आहे, तिथेही विरोधी नेत्यांना फोडले आहे. हा अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. २०२९ च्या निवडणुकीची रणनीती आखताना त्याचा फायदा होतो.”
मोठा फटका उद्धव ठाकरे शिवसेनेला
महाविकास आघाडीतील तीन मुख्य पक्षांमध्ये सर्वात मोठा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसला आहे. त्यांच्या १९ उमेदवारांनी महायुतीत प्रवेश केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील १३, तर काँग्रेसच्या दहा जणांनी पक्ष सोडला. याशिवाय तीन अपक्ष आणि शेतकरी-कामगार पक्षाच्या एकाने महायुतीचा रस्ता धरला.
काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सलील देशमुख यांनी गेल्या आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी पुढचे पाऊल अद्याप उचललेले नाही.
प्रदेशनिहाय चित्र बघितले तर मराठवाड्यातील सोळा पराभूतांनी पक्षांतर केले, यापैकी निम्मे म्हणजे आठ जण भाजपमध्ये, ५ अजित पवार गटात, ३ शिंदे सेनेत गेले.उत्तर महाराष्ट्रातील ११ पैकी १० भाजपमध्ये, १ अजित पवार गटात गेले. कोकणातील ५ भाजपमध्ये, ३ शिंदे सेनेत, २ अजित पवार गटात.
अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक लक्ष देत आहेत. त्यांच्या पक्षात आलेल्या १३ पैकी ५ मराठवाड्यातील, ४ पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. यात ६ शरद पवार गटाचे, ३ काँग्रेसचे, २ शिवसेना ठाकरे गटाचे आणि २ अपक्ष आहेत.
शिंदे सेनेत आलेले ५ ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. यापैकी ३ कोकणातील, २ मराठवाड्यातील आहेत. शिवाय काँग्रेस आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एकजण शिंदे सेनेत दाखल झाला आहे.