लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या गाण्यातून, साहित्यातून आणि कर्तृत्वातून समाजातील तळागाळातील, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांना, वंचित, शोषित कष्टकऱ्यांना शिक्षणाची, प्रबोधनाची, जागृतीची, लढण्याची, संघर्षाची प्रेरणा मिळते. लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जयंती. त्यानिमित्त…(Anna Bhau Sathe)
-सुबोध मोरे
लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेच्या जाचामुळे बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली. नंतर आई- वडीलांसह मुंबईत येऊन बालवयातच खडतर मोलमजुरीची कामे करावी लागली, हाल अपेष्टा सहन केल्या. गिरणीत बाल कामगार म्हणून काम करताना आणि माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये रहात असतानाच त्यांचा १९३४-३५ साली, तेथे राहणाऱ्या व दलित , शोषित कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते कॉ. आर. बी. मोरे, कॉ के. एम. साळवी, कॉ शंकर नारायण पगारे आदींचा परिचय झाला. त्यांच्या संपर्कात आल्यानंतरच त्यांच्याकडून धुळाक्षरे गिरविण्यास सुरवात झाली. ते कार्यकर्त्यांच्या बरोबरीने लिहायला, वाचायला शिकले. त्यांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील समज वाढू लागली.त्यांच्यातील उपजत कवी, लेखक, कलावंत आपल्या गाण्यातून, पोवाड्यातून व्यक्त होऊ लागला. (Anna Bhau Sathe)
त्यांनी आयुष्यातील पहिलं गाणं, धारावीला लागून असलेल्या लेबर कॅम्पच्या झोपडपट्टीतील मच्छरावर लिहिले. नंतर त्यांनी धनिकांकडून होणाऱ्या कामगारांच्या शोषणाविरुद्ध,
‘‘एकजुटीचा नेता झाला कामगार तय्यार …’’
किंवा धर्मांधांच्या छळवणुकीवर प्रहार करणारे
‘‘जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव…’’
मुंबईची सुप्रसिद्ध लावणी- माझी मैना, अशी अनेक गाजलेली गाणी लिहिली. पुढे ते लोकनाट्य, कथा, कादंबरी लिहू लागले. वारणेचा वाघ, चित्रा, वैजयंता, फकिरा कादंबरी नंतर एक सर्जनशील, समर्थ लेखक म्हणून कॉ. अण्णा भाऊ साठे यांची देशाला व जगाला ओळख झाली. त्यांच्या कथा, कादंबऱ्या जगातील अन्य भाषांत अनुवादीत झाल्या. (Anna Bhau Sathe)
रशियातील कम्युनिस्ट सरकारने अण्णा भाऊ साठे यांना लेखक म्हणून सन्मानाने मॉस्कोला बोलाविले व मोठा गौरव केला. समाजातील तळागाळातील जात-वर्गातून, दलित, शोषितांमधून आलेल्या शाहीर, लेखक, कार्यकर्त्याचा सन्मान जगात प्रथमच कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या रुपाने जागतिक स्तरावर झाला होता. साधं शालेय शिक्षणही न घेतलेल्या लोकशाहीर, साहित्यिकाच्या साहित्याची प्रथमच जगाने नोंद घेतली.
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्यसंस्थेचे अण्णा भाऊ साठे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले आहेत. असा सन्मान तळागाळातून आलेल्या कुठल्याही लेखक, नाटककाराला कधी मिळाला नव्हता.
ज्या अण्णा भाऊ साठे यांना कधी महाविद्यालय, विद्यापीठात जाण्याची कधी संधी तथाकथित प्रस्थापित समाजव्यवस्थेने दिली नव्हती त्या अण्णा भाऊंची गाणी, पोवाडे, लोकनाट्य, कथा, कादंबऱ्या आज शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठात शिकवल्या जात आहेत. त्यांच्या लेखनावर भारतासह जगभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठात संशोधक, संशोधन करीत आहेत. त्यांच्या गाण्यातून, साहित्यातून व कर्तृत्वातून समाजातील तळागाळातील, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांना, वंचित, शोषित कष्टकऱ्यांना शिक्षणाची, प्रबोधनाची,जागृतीची, लढण्याची, संघर्षाची प्रेरणा मिळते. अवघं ४९ वर्ष आयुष्य लाभलेल्या कॉम्रेड अण्णा भाऊंचे कर्तृत्व, व्यक्तिमत्त्व,अचाट, अचंबित करणारे आणि सर्वानांच प्रेरणा देणारे होते. (Anna Bhau Sathe)
महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेने १९५८ साली मुंबईत,भरलेल्या भारतातील पहिल्या ” दलित साहित्य संमेलनाचे अण्णा भाऊ साठे हे उदघाटक होते. त्या संमेलनातील, ‘‘हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे.’’ हे दलित, शोषित, कष्टकऱ्यांच्या श्रमाचे कौतुक करणारे ऐतिहासिक भाषण पुढच्या अनेक पिढ्यांना व दलित साहित्य, चळवळीला प्रेरणा देणारे ठरले आहे. दलित साहित्याचा झंझावात भारतभर पसरण्यास प्रारंभ झाला.
दलित साहित्याचे भाष्यकार व पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबुराव बागुल यांनी अण्णा भाऊ साठे यांचा गौरव ‘भारताचा मॅक्झिम गॉर्की’ म्हणून केला होता.
- लेखन प्रेरणा दिन घोषित करावा
अशा या प्रेरणादायी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जयंती दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात ‘ लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करण्यात यावा, त्याची सुरवात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन करावी. तसेच, देश पातळीवरही हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होण्यासाठी शासनाने व मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा असे आवाहन आम्ही करीत आहोत.
अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन राष्ट्रीय स्तरावर लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित झाला तर त्या दिवशी देशातील शाळा, महाविद्यालयात, अण्णा भाऊंच्या जीवन, साहित्यावर कार्यक्रम घेणे शासनाला बंधनकारक होईल. (Anna Bhau Sathe)
त्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षकांना अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचावे लागेल, ते साहित्य भारतातील सर्व भाषात शासनाला अनुवाद करावे लागेल, त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य देशभर वाचले जाईल. आणि या सर्व गोष्टी झाल्या तर देशभरातील सर्व अण्णा भाऊ साठे प्रेमी, चाहते यांचा आनंद द्विगुणित होईल!
महाराष्ट्र शासन कुसुमाग्रज दिन साजरा करते. माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन केंद्र सरकार वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करते. त्या निमित्ताने सगळीकडे त्यांच्या साहित्यावर कार्यक्रम घेणे बंधनकारक झाले आहे.
त्याच पद्धतीने अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन लेखन प्रेरणा दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर घोषित करावा. यासाठी अनेक मान्यवर साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटनांनी शासनाकडे तीन वर्षांपूर्वीच लेखी पत्र पाठवून मागणी केली होती. परंतु शासनाने प्रतिसाद दिलेला नाही. यंदा तरी महाराष्ट्र शासनाने ‘लेखन प्रेरणा दिना’ची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी मी पुन्हा मान्यवर लेखक, अर्जुन डांगळे, डॉ बाबुराव गुरव, डॉ यशवंत मनोहर,उर्मिला पवार, हिरा बनसोडे, डॉ. भारत पाटणकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, उत्तम कांबळे, प्रज्ञा दया पवार, निरजा, माया पंडित, प्रतिभा अहिरे, नाटककार शफाअत खान, गणेश विसपुते, श्यामल गरुड, कुंदा प्र.नी., प्रतिमा जोशी, छाया कोरेगावकर, आनंद विंगकर, महेबुब सय्यद, अजय कांडर, लता प्र. म., किशोर जाधव, लता भिसे, निलिमा बंडेलु, संपत देसाई, प्रभू राजगडकर, कलिम अजीम, संजय भिसे, सुरेश राघव, श्रीधर पवार, मुख्तार खान, सायमन मार्टिन, आदिनाथ इंगोले, दिलीप चव्हाण, प्रकाश मोगले, अण्णा सावंत, अर्जुन जगधने, सारिका उबाळे, सुरेश केदारे, शोभा बागुल, दीपक पवार, सुनील कदम, धम्मा रणदिवे, अमरनाथ सिंग, श्रीधर चैतन्य, महादेव खुडे, सचिन बगाडे, राम बाहेती, अविनाश कदम, शंकर बळी, सत्यपाल रजपूत, सुरेश साबळे, भारत यादव, दत्ता चव्हाण, राजानंद सुरडकर, दिलीप तायडे साहित्यिक, कलावंत व लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, जनवादी लेखक संघ, जागर लोक कला पथक, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती, जाती अंत संघर्ष समिती आदी. सामाजिक, सांस्कृतिक संस्था, संघटनांतर्फे आम्ही जाहीरपणे करीत आहोत.