छत्तीसगडच्या बोटेर जंगलात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत कुख्यात नक्षलवादी बसवराजू ठार झाल्याच्या बातम्या राष्ट्रीय पातळीवरील सर्व प्रसारमाध्यमांमधून ठळकपणे प्रसिद्ध झाल्या. एखाद्या नक्षलवादी नेत्याची एवढी दखल राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी का घेतली असावी? (Naxal Basavaraju)
-विजय चोरमारे
१८ मे रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा, कोंडागाव, बीजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि बस्तर फायटर्सच्या संयुक्त टीमने बोटेर परिसरात एक ऑपरेशन सुरू केले. या ऑपरेशनला राज्य पोलिसांची STF आणि CRPF यांचाही पाठिंबा लाभला. काही वेळातच संयुक्त पथकांनी बोटेर भागात नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरून टाकले.
२१ मेच्या पहाटे ऑपरेशनचा अंतिम टप्पा सुरू झाला. गोळीबार सुरू झाला आणि काही वेळातच बसवराजूच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले नक्षलवादी एकामागून एक ठार झाले. आणि थोड्याच वेळात बातमी आली की बसवराजू देखील ठार झाला.
सुरक्षा दलांना अलीकडच्या काळात मिळालेले हे सर्वांत मोठे यश मानले जाते. त्याचे कारणही तसेच होते. बसवराजू याने गेली काही वर्षे आक्रमकपणे नक्षलवादी चळवळीला नेतृत्व दिले होते. सुरक्षा दलांवर हल्ले करून अनेक जवानांच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरला होता. २०१३ मध्ये एका नक्षलवादी हल्ल्यात छत्तीसगड काँग्रेसचे सर्व शीर्षस्थ नेते ठार झाले होते. तो हल्ला बसवराजूनेच घडवून आणला होता. (Naxal Basavaraju)
बसवराजूचे खरे नाव नंबाला केशव राव होते. त्याला गगन्ना, प्रकाश, कृष्णा, विजय, केशव, बी.आर., दरपू नरसिंहा रेड्डी, नरसिंहा आणि बसवराजू अशा अनेक नावांनी ओळखले जात असे.
त्याचा जन्म आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियन्नापेट या गावात झाला होता. तो कबड्डी आणि व्हॉलीबॉलचा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. त्याने वारंगलमधील रिजनल इंजीनिअरिंग कॉलेजमधून बीटेकचे शिक्षण घेतले. याच कॉलेजचे पुढे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर झाले.
कॉलेजच्या काळातच बसवराजू डाव्या विचारसरणीकडे ओढला गेला. त्याने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (ML) च्या पीपल्स वॉर या गटात प्रवेश केला. १९८० मध्ये श्रीकाकुलममध्ये पीपल्स वॉरच्या विद्यार्थी संघटना रॅडिकल स्टुडंट्स युनियन (RSU) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात हिंसक संघर्ष झाला. RSUच्या बाजूने बसवराजू होता. पोलिसांनी त्याला अटक केली. पण त्यानंतर तो पुन्हा कधीही पोलिसांच्या ताब्यात आला नाही.
त्याच काळात बसवराजूने माओवादी चळवळीचा भाग बनण्याचा निर्णय घेतला. त्याने हत्यार उचलले. १९८७ मध्ये पीपल्स वॉरने त्याला बस्तरच्या जंगलात पाठवले. त्याच्यासोबत मल्लोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी, वेणुगोपाल राव ऊर्फ सोनू आणि मल्ला राजी रेड्डी होते. या सगळ्यांना श्रीलंकेतील LTTE (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम) या दहशतवादी गटाने प्रशिक्षण दिले. बस्तरमध्ये स्फोट घडवणे, जिलेटिन कांड्या वापरणे, आणि IED लावण्याच्या तंत्रांमध्ये त्याला पारंगत करण्यात आले. बसवराजू लवकरच स्फोटके आणि लष्करी डावपेचांमध्ये तज्ञ बनला. (Naxal Basavaraju)
१९९२ साली पीपल्स वॉरच्या केंद्रीय समितीच्या निवडणुका झाल्या. बसवराजूला समितीचे सदस्यपद देण्यात आले. त्याचा सहकारी मुपल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती याला महासचिव करण्यात आले.
काही वर्षे बसवराजू विविध नक्षलवादी ऑपरेशन्समध्ये सक्रिय राहिला. त्याचा पक्षसंघटनेतील दर्जा वाढत गेला. मात्र नक्षलवाद्यांना एकत्रित कमांडची गरज भासत होती. २००४मध्ये विविध गटांना एकत्र आणण्यासाठी एक नवीन पक्ष स्थापन करण्यात आला – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी). या पक्षात पीपल्स वॉर ग्रुप, पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी, आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया यांचा समावेश करण्यात आला. CPI (माओवादी) मध्ये अध्यक्ष, महासचिव अशा पदांबरोबरच लष्करी विंगही होती – सेंट्रल मिलिटरी कमिशन (CMC). या CMCची सूत्रे बसवराजूकडे सोपवण्यात आली. (Naxal Basavaraju)
गणपती आणि बसवराजू हे माओवादी चळवळीतले दोन महत्त्वाचे चेहरे बनले. गणपती व्यूहरचनेच्या आणि वैचारिक दिशा देण्याच्या पातळीवर कार्यरत होता, तर बसवराजू प्रत्यक्ष कारवाईच्या पातळीवर.
CMC च्या म्हणजे सेंट्रल मिलिटरी कमिशन स्थापनेनंतर बसवराजू अधिक सक्रिय झाला. बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागांतील नक्षल चळवळीवर त्याचा प्रभाव होता. तो IED लावण्यात तज्ज्ञ होता आणि शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांशीही त्याचे संबंध होते. त्यामुळे संघटनेतील त्याचे महत्त्व वाढत गेले.
त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले : त्याची नुसती यादी पाहिली तरी तो किती खतरनाक पातळीवर होता याची कल्पना येऊ शकतो.
- २०१० : दंतेवाडा हल्ला – ७६ CRPF जवान ठार झाले होते.
- २०१३ : झीरम घाटी हल्ला – महेंद्र कर्मा, विद्याचरण शुक्ल, नंदकुमार पटेल व अन्य 27 जणांचा मृत्यू. छत्तीसगडची अख्खी काँग्रेस या हल्ल्याने संपवली होती.
- २०१८ : ओडिशात तेलुगु देशम पार्टीच्या दोन नेत्यांची हत्या
२०१३ मध्ये ‘‘पीपल्स वॉर’’ या पत्रिकेत बसवराजूने लिहिले :
“जर आपण आपल्या देशात शेतजमिनीचा प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणि उग्र स्वरूपात सशस्त्र क्रांतीमध्ये संघटित करू शकलो, तर आपण सर्व शत्रूंना हरवून नवी लोकशाही क्रांती पूर्ण करू शकतो.”
त्याचे हे विचार वाचल्यानंतर कल्पना येऊ शकते की, बसवराजू शेतकरी आणि कामगारांना शस्त्र उचलण्यास प्रवृत्त करत होता. त्यामुळे संघटनेत त्याला अधिक महत्त्व मिळू लागले. त्याच्यासोबत नेहमी AK-47 असायची.
२०१७ मध्ये CPI (माओवादी) ला जाणवले की गणपती केवळ विचारांच्या पातळीवर काम करत होता, प्रत्यक्ष लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी अधिक योग्य व्यक्ती हवी होती. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांचे वर्चस्व वाढत चालले होते, त्यांचा मुकाबला करण्यासाठी अधिक सक्षम व्यक्तिकडे सूत्रे द्यायला पाहिजे, असे त्यांच्या संघटनेला वाटू लागले. त्यावेळी त्यांच्यासमोर बसवराजू इतका सक्षम पर्याय दुसरा कुणी नव्हता. त्यामुळे २०१८ मध्ये बसवराजूला महासचिव पदावर नेमण्यात आले. यानंतर NIA च्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये त्याला गणपतीपेक्षा वरचे स्थान मिळाले. त्याच्यावरच्या बक्षिसाची रक्कम दीड कोटी रुपये करण्यात आली.
त्याच्या संरक्षणासाठी १५०हून अधिक नक्षलवादी तैनात होते. त्याभोवती तीन ते चार थरांचे सुरक्षाकवच होते – त्यातील सर्वांत बाहेरच्या थराकडे इन्सास रायफल्स, त्यानंतरच्या थरातील लोकांकडे कार्बाइन, त्यानंतर SLR आणि अंतर्गत वर्तुळात AK-47 किंवा एके-५६ रायफल राहू लागली. (Naxal Basavaraju)
पक्षाचा नेता बनल्यावर त्याच्यावरच्या खटल्यांची संख्याही वाढू लागली.
- २०१८ : सुकमा IED हल्ला – ९ CRPF जवान ठार
- २०१९ : गडचिरोली IED ब्लास्ट – १५ पोलिस ठार
- २०२१-२२ : सुकमा-बीजापूर हल्ला – २२ जवान ठार
- २०२३ : दंतेवाडा IED हल्ला – DRG चे दहा जवान व एक ड्रायव्हर ठार
- २०२५ : बीजापूर IED हल्ला – DRG चे ८ जवान ठार
२०२५ मध्ये बसवराजूची कहाणी अंताकडे वाटचाल करू लागली होती. एप्रिलमध्ये बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू केले. यामध्ये भारतीय हवाई दलाचाही सहभाग होता. छत्तीसगड-तेलंगणा सीमेजवळील करेगुट्टा टेकड्यांवर ही कारवाई झाली. या ठिकाणी माओवादी चळवळीची नेतृत्वाची फळी असल्याची माहिती मिळाली होती.
२१ एप्रिलपासून २१ दिवस सुरू राहिलेल्या ऑपरेशनमध्ये ३१ माओवादी ठार झाले. अनेक दशकांनंतर करेगुट्टा टेकड्यांवर तिरंगा फडकावला गेला.
ही कारवाई सुरू असताना बसवराजू करेगुट्टा भागातच होता, पण तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. तिथून तो बोटेर जंगलात लपला. सुरक्षा दलांना त्याचा ठावठिकाणा कळला होता. त्यामुळे पुढची कारवाई शक्य झाली. दहा दिवस लपून राहिल्यानंतर १८ मे रोजी त्याला घेरण्यात आले आणि तिथेच त्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. (Naxal Basavaraju)
बसवराजू ठार झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. अत्यंत क्रूर दहशतवाद्याचा खात्मा झाल्याच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. त्याचबरोबर कॉम्रेड बसवराजच्या हौतातम्याला लाल सलाम अशा पोस्टही पाहावयास मिळतात. चारू मुजुमदारचा क्रांतिकारी वारसा तुम्ही जिवंत ठेवलात, अशा शब्दात त्याला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. गेली वीस वर्षे माओवादी चळवळीला नेतृत्व देणाऱ्या बसवराजूला ठार करण्यात यश आल्यामुळे सुरक्षा दलांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकला आहे.