जमीर काझी : मुंबई : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून अडचणीत आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी क्लिनचिट दिली. ‘हा विषय एक बिल्डर आणि जैन समाजामधील आहे. त्यामध्ये विनाकारण मुरलीधर मोहोळांचे नाव ओढून, जे काही केलं जात आहे., ते योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी मोहोळ यांची पाठराखण केली. (Clean chit to Mohol)
गेल्या काही दिवसापासून बोर्डीगच्या जागा खरेदीवरून पुण्यातील जैन ट्रस्टी, जैन समाजाबरोबरच विरोधक आणि शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे आरोपसत्र सुरूच ठेवले आहे. आज राज्यभरात जैन समाजाकडून त्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय भूमिका घ्याल?, असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, ‘काही भूमिका घेण्याचे कारण नाही. निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धीसाठी अनेक लोकं आरोप करतात. हा मुद्दा अतिशय स्पष्ट आहे. हा विषय एक बिल्डर आणि जैन समाजामधील आहे. त्यात जी भूमिका घ्यायची आहे, ती आम्ही घेतली आहे. जैन समाजाच्या भावना समजून त्यांच्या मनाप्रमाणंच होईल, अशाप्रकारे प्रयत्न आम्ही करत आहोत. विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढून, जे काही केलं जात आहे, ते योग्य नाही. पुण्याची जनता सुज्ञ आहे”, असं त्यांनी सांगितले. (Clean chit to Mohol)
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल बदलल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्याविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, ज्यांना काही माहिती नाही, त्यांच्याकडून काहीही आरोप केले जात आहे. मला वाटते की, अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे दुर्देवी लोक आहेत. त्यांना लाईमलाईटमध्ये राहायचे आहे. पण, त्यासाठी एका गरीब डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचे भांडवल का करता? या प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही, कठोर कारवाई होणार आहे. कोणाचीही चूक असू द्या, कारवाई होणारच, असे त्यांनी आश्वस्त केलं. (Clean chit to Mohol)
भाजपा कुबड्या घेऊन नाही, तर स्वतःच्या पायावर चालणारा पक्ष आहे, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. शिवसेनेकडून (यूबीटी) त्या विधानाचा समाचार घेण्यात आला. याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, त्यांना कुबड्यांचा अर्थच कळलेला नाही. अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती. मित्र म्हणजे कुबड्या नसतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
एक नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या मोर्चाबाबत भाष्य करताना ते म्हणाले, हे कव्हर फायरिंग आहे. त्यांना हे माहिती आहे, की येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे कव्हर फायरिंग म्हणून ते अशाप्रकारचं वातावरण तयार करत आहेत. पण, मी पुन्हा एकदा सांगतो, मतदारयाद्यांच्या संदर्भात आम्ही वारंवार भूमिका मांडलेली आहे, डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही भूमिका मांडली आहे. विरोधकांनी हे दाखवून दिलं पाहिजे की, डुप्लिकेट नावांमुळे एकाहून अधिक ठिकाणी मतदान झालेले आहे. असं जर ते दाखवू शकले, तर त्यांचे आरोप सत्य होतील. पण, तसं त्यांना दाखवता आलेले नाही. दुसरं म्हणजे, त्यांना जेव्हा जेव्हा मतदार यादीवर आक्षेप घेण्याची संधी मिळते, त्यावेळेस ते घेत नाहीत. फक्त मीडियासमोर येऊन बोलायचं, याचा अर्थ हे गंभीर नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.