मुंबई : केंद्र सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती केली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नियुक्तीची माहिती ‘एक्स’वर दिली आहे. (Shree Chandrashekhar)
‘‘भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, भारताच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना राष्ट्रपतींना आनंद होत आहे,’’ असे या पोस्टमध्ये मंत्री मेघवाल यांनी म्हटले आहे.(Shree Chandrashekhar)
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे. न्यायमूर्ती चंद्रशेखर सध्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.(Shree Chandrashekhar)
२५ मे १९६५ रोजी जन्मलेले न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी १९९३ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ९ डिसेंबर १९९३ रोजी दिल्ली राज्य बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी दिल्ली येथे फौजदारी आणि दिवाणी दोन्ही बाजूंनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये वकील म्हणून सुमारे १९ वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी सुमारे ३५०० खटले चालवले. त्यामध्ये बहुतेक खटले सर्वोच्च न्यायालयातील आहेत.
सुरुवातीला ७ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांची झारखंड उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ७ जून २०१४ रोजी त्यांना कायमस्वरूपी करण्यात आले. त्यांनी २९ डिसेंबर २०२३ ते ४ जुलै २०२४ पर्यंत झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर त्यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. त्यांनी या वर्षी २१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते मे २०२७ मध्ये निवृत्त होतील.