पाटणा : विधानसभा निवडणूक दहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना बिहारमधील नितीश कुमार सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नव्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाने सात नव्या चेहेऱ्यांना संधी दिली आहे.(Bihar)
भाजपचे आमदार संजय सारोगी, सुनील कुमार, जिबेश मिश्रा, मोतीलाल प्रसाद, क्रिशनकुमार मंटू, राजूकुमार सिंह आणि विजय कुमार मंडल यांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. शुक्रवारपासून बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी दोन दिवस मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला.(Bihar)
बुधवारी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी महसूल मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भाजपच्या ‘एक नेता एक पद’ या धोरणानुसार आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. राज्यातील पक्षाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा ऋणी आहे, असे सांगण्यासही जैस्वाल विसरले नाहीत.(Bihar)
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मोतीलाल प्रसाद म्हणाले, “पक्षकार्यकर्ता आणि आमदार म्हणून मी नेहमीच दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आलो आहे. मंत्रिपदाची भूमिका माझ्यासाठी नवी आहे. संघटनेमध्ये काम करताना मिळालेल्या अनुभवाचा मला मंत्रीपद भूषवताना फायदा होईल. मला जे खाते देण्यात येईल, तिथे मी पूर्णत: समर्पित भावनेने काम करेन.”(Bihar)
हेही वाचा :