बेळगाव : प्रतिनिधी : भाजपचे राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी यांनी सीमाप्रश्नासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हा संपलेला विषय आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही जण सीमाप्रश्न जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते, असे त्यांनी म्हटले आहे. (Iranna kadadi)
संपलेला प्रश्न जीवंत ठेवण्याचा प्रयत्न काही लोक करत होते, पण त्यात ते अपयशी ठरले आहेत असे वक्तव्य करून कडाडी यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगावात बुधवारी (२ जुलै) पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. (Iranna kadadi)
ते म्हणाले, आपणाला येथेच राहायचे हे जनतेलाही कळून चुकले आहे. या भागाचा विकास झाला पाहिजे अशीच जनतेची भूमिका आहे त्यामुळे त्यांनी बदल घडवून आणला आहे. जनता आता राष्ट्रीय पक्षांसोबत आहे. आम्ही अनेक नेत्यांशी सीमाप्रश्नाबाबत चर्चा केली आहे. पण सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. (Iranna kadadi)
इराण्णा कडाडी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठी भाषिकांत संतापाची भावना आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. सीमाप्रश्न संपेल पण बेळगाव महाराष्ट्रात गेल्यावरच, अशी प्रतिक्रिया युवा नेते अंकुश केसरकर यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी कडाडी यांचा समाचार घेतला.
हेही वाचा :
रिलायन्स कम्यु.चे कर्जखाते ‘फ्रॉड’ जाहीर करणार
उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार चीनला नाही : दलाई लामा