ठाणे : भिवंडी तालुक्यात फर्निचर गोदामाला भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की काही तासांतच संपूर्ण चार मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Bhiwandi Fire)
भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वागत कंपाउंडमध्ये फर्निचर गोदामाची चार मजली इमारत आहे. तिला पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीत मोठ्या प्रमाणावर प्लायवूड, रेग्झिन, फोम आणि सोल्युशनचा साठा होता. त्यामुळे आग अत्यंत वेगाने पसरली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. अख्खी इमारत आगीने कवेत घेतली. त्यामुळे संपूर्ण इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे चार मजली इमारत कोसळली. (Bhiwandi Fire)
आगीची भीषणता इतकी होती की साहित्य आणि इमारतीतील फर्निचर जळताना प्रचंड आवाज होत होते. आगीच्या ज्वाळा सुमारे दहा किलोमीटरवरून दिसत होत्या. भिवंडीतील दोन, तर कल्याण आणि ठाणे येथून प्रत्येकी एक अशा एकूण चार अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र मोठ्या प्रमाणात फर्निचर आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग सतत भडकतच होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते.
अग्निशमनचा जवान जखमी
या आगीने परिसरातील १२ गोदामे खाक केली. चार मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. आगीच्या भीतीने शेजारच्या इमारतीतील माल सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कामगारांनी धाव घेतली. शेजारील इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांनीही जिवाच्या आकांताने घर सोडले. कुटुंबीय मौल्यवान साहित्य घेऊन बाहेर सुरक्षितस्थळी पोहचले होते. (Bhiwandi Fire) आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या जवानाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. हरिश्चंद्र वाघ असे जखमी जवानाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगला देशी
सात स्वच्छता कामगारांना चिरडले