मुंबई : प्रतिनिधी : तब्बल वीस वर्षांनी एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुरस्कृत उत्कर्ष पॅनेलचा दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत सुपडासाफ झाला. भाजप पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनेलला सात जागा मिळाल्या. पण कामगार नेते शशांक राव डॉर्क हॉर्स ठरले. त्यांच्या पॅनलने २१ पैकी १४ जागा जिंकून सोसायटीवर कामगार संघटनेचा झेंडा फडकावला. (Best Society Election)
ठाकरे बंधू एकत्र आल्याने बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचे पॅनेल बाजी मारणार की भाजपचे पॅनेल निवडून येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण सर्वांचे अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने २१ पैकी १४ जागा जिंकत सर्वांचे अंदाज चुकवले.
गेल्या नऊ वर्षापासून बेस्ट को ऑपरेटिव्ह सोसायटीवर ठाकरे गटाचे वर्चस्व होते. तरीही शंशाक राव यांनी शांतपणे बांधणी करत बेस्टच्या १५ हजार कर्मचाऱ्यांचा भरभरुन पाठिंबा मिळवला. त्यांचा कामगार संघटनासोबतचा अनुभव मोठा आहे. बेस्ट कर्मचाऱ्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (Best Society Election)
भाजपच्या सहकार पॅनेलचे सात उमेदवार विजयी झाले. या पॅनेलचे नेतृत्व आमदार प्रसाद लाड यांनी केले होते. सहकार समृद्धी पॅनेलच्या सात विजय उमेदवारांमध्ये लाड गटाचे चार आणि शिवसेना शिंदे गटातील किरण पावसकर गटाचे दोन आणि ओबीसी वेल्फेअर युनियनचा एक उमेदवार विजयी झाला.
शशांक राव पॅनेलचे विजयी उमेदवार असे : १. आंबेकर मिलिंद शामराव, २. आंब्रे संजय तुकाराम, ३. जाधव प्रकाश प्रताप, ४. जाधव शिवाजी विठ्ठलराव, ५. अम्मुंडकर शशिकांत शांताराम, ६. खरमाटे शिवाजी विश्वनाथ, ७. भिसे उज्वल मधुकर, ८. धेंडे मधुसूदन विठ्ठल, ९. कोरे नितीन गजानन, १०. किरात संदीप अशोक, ११. डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव), १२. धोंगडे प्रभाकर खंडू (अनुसूचित जाती/ जमाती), १३ चांगण किरण रावसाहेब ( भटक्या विमुक्त जाती), १४ शिंदे दत्तात्रय बाबुराव (इतर मागासवर्गीय). भाजप पॅनेलचे विजयी उमेदवार १. रामचंद्र बागवे, २. संतोष चतुर, ३. रोहित केणी, ४. संतोष बेंद्रे, ५. विजय कानडे, ६. राजेंद्र गोरे, ७. रोहिणी बाईत (महिला राखीव मतदार संघ)