बेळगाव : प्रतिनिधी : धार्मिक मठातील खोलीत महिलेसमवेत गैरवर्तन करणाऱ्या मठाच्या महास्वामीजीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावात ही घटना घडली. (Swami Beaten)
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावातील अडवीसिद्धेश्वर मठात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मठाचे स्वामीजी अडवीसिद्धराम स्वामी हे एका महिलेसोबत असताना गावकर्यांनी त्यांना रंगेहात पकडले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वामीजींवर हल्ला चढवला आणि त्यांना मध्यरात्रीच मठातून बाहेर काढले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकारात काही तरुणांनी महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन करत केल्याचाही आरोप समोर आला आहे. (Swami Beaten)
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बागलकोट जिल्ह्यातील तालिकोट येथून एक महिला आपल्या मुलीसोबत शनिवारी (२१ जून २०२५) सायंकाळी अडवीसिद्धेश्वर मठात आली होती आणि रात्री ती तिथेच थांबली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास काही स्थानिकांनी स्वामीजी, ती महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी एकाच खोलीत असल्याचे पाहिले. ही बाब समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मठात जमा झाले. संतप्त जमावाने मठात घुसून स्वामीजी अडवीसिद्धराम स्वामी यांना धारेवर धरले आणि त्यांच्यावर हल्लाही केला. त्यांना मारहाण करण्यात आली आणि कपाळमोक्षही करण्यात आला. याच वेळी काही तरुणांनी महिलेसोबत असभ्य वर्तन केले, तर तिच्या अल्पवयीन मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी महिला आणि तिच्या मुलीला सुरक्षितपणे तेथून बाहेर काढून समुपदेशन केंद्रात पाठवले. त्यानंतर, गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून रात्रीच स्वामीजी अडवीसिद्धराम यांना मठातून बाहेर काढले. सध्या स्वामीजी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे असल्याचे समजते.