पुणे : वैष्णवी कस्पटे-हगवणे ही अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी ठरली. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. त्यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर जोरदारपणे कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल. म्हणून येत्या २२ जून २०२५ पासून राज्यात हुंडाबळी व हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचा निर्धार करतो आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली आहे. (MP Supriya Sule)
यासंबंधीची माहिती त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राची लेक वैष्णवी कस्पटे- हगवणे अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंड्याची बळी ठरली. ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. त्यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल. म्हणून आम्ही हा निर्धार करतो आहोत. समाजातील सर्व घटकांचा, सर्व यंत्रणांचा सहभाग यात घ्यावा लागेल. या मोहिमेतूनच “हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचे” उद्दिष्ट सध्या करता येईल आणि वैष्णवीला हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”(MP Supriya Sule)
दरम्यान, वैष्णवी आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी शुक्रवारी (२३ मे) पत्रकार परिषद घेतली. परंतु, पोलिसांनी दोन मिनिटांत परिषद गुंडाळली. त्यांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अटकेविषयी माहिती दिली.
बावधन पोलीस म्हणाले, “बावधान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील तीनजण अटकेत होते, उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी सहा पथके तैनात केली होती. पैकी राजेंद्र हागवणे (वैष्णवीचे सासरे) आणि सुशील हगवणे (वैष्णवीचा दीर) यांना शुक्रवारी पहाटे पुणे स्वारगेट येथून अटक केली आहे.”(MP Supriya Sule)
ते म्हणाले, “सर्व पुरावे संकलित करून घेतले जात आहे. हे पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार केला जाईल. या संपूर्ण गुन्ह्याला दोषसिद्धीपर्यंत नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत.” एवढेच बोलून पोलीस अधिकारी निघून गेले.
याप्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
हगवणे पिता पुत्रांना अटक
हगवणे प्रकरणात मला का दोषी धरता?