Home » Blog » कोल्हापूर शहराला  गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा

कोल्हापूर शहराला  गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा

by प्रतिनिधी
0 comments
Daily water supply for Kolhapur city

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दूधगंगा काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले आहे. धरण भरल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने एक दिवस आड शहराला होणारा पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द केला असून आता गुरुवारी १३ ऑगस्टपासून नियमित पाणीपुरवठा होणार आहे. श्रावण महिन्याच्या प्रारंभीच दररोज पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेऊन महानगरपालिकेने शहरवासियांना सुखद धक्का दिला आहे. (Daily water supply for Kolhapur city)

काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनमधून पाणीपुरवठा

एल निनो आणि दुरुस्तीच्या कामांमुळे काळम्मावाडी धरणात पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पाणीसाठा शिल्लक होता. काळम्मावाडी धरणातूनच शहराला थेट पाइपलाइनमधून पाणी पुरवठा होतो. त्यातच राधानगरी धरणातही पाणी कमी होते. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यापासून कोल्हापूर शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा होत होता. आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत थेट पाईपलाईन योजनेतून पाणी उपसा नियमित सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेला एक दिवस आड पाणी पुरवठा बंद करून गुरुवारी १३ ऑगस्ट पासून शहरासह संलग्न उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Daily water supply for Kolhapur city)

नागरिकांनी पाणी उकळून,गाळून प्यावे

सध्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची गढूळता वाढली आहे. नदीपात्रातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार क्लोरिन व अॅलमचे योग्य प्रमाणात डोस देऊन पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. तसेच दररोज नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (Daily water supply for Kolhapur city)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!