कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवावे लागेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून उच्च न्यायालयाचा निर्णय़ कायम केला आहे. हा संपूर्ण विषय नेमका काय आहे, आणि यामध्ये अनेक घटकांचे हितसंबंध कसे गुंतले आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. (Mahadevi elephant)
-प्रतिनिधी
नांदणी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातलं गाव. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागातील जैन समाजाच्या सुमारे साडेसातशे गावांची श्रद्धा असलेला पुरातन मठ नांदणीत आहे. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ म्हणून तो ओळखला जातो. सुमारे बाराशे वर्षांपासूनचा हा मठ आहे. जिनसेन भट्टारक स्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक दशंकापासून या मठामध्ये हत्ती सांभाळला जातो. मठाच्या अधिपत्याखालील गावांमध्ये पंचकल्याण पूजा होतात, तेव्हा या पूजेतील इंद्र – इंद्रायणींना हत्तीवरुन कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा मान आहे.
नांदणी मठाकडे १९९२ पासून महादेवी नावाची हत्तीण आहे. चार वर्षांची असताना ही हत्तीण नांदणीच्या मठात आणली गेली होती. मठातील अनेक धार्मिक कार्यक्रमात तिचा सहभाग असे. (Mahadevi elephant)
हे सगळे प्रकरण सुरू कसे झाले आणि त्याचे धागेदोरे कुठवर जातात हे समजून घेण्यासाठी क्रोनॉलॉजी समजून घेणे आवश्यक आहे.
आपल्याला ठाऊक आहे की, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांनी आपला मुलगा अनंत अंबानी याला वाढदिवसाची भेट म्हणून जामनगरमधील वनतारा येथे खासगी अभयारण्य उभारून दिलंय. त्याठिकाणी जगभरातील असंख्य वन्यप्राणी आहेत. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदीही ते अभयारण्य बघायला गेले होते. त्याआधी तिथं वार्तांकनासाठी गेलेल्या एका मोठ्या इंग्रजी वाहिनीच्या संपादकानं हत्तींसाठीचं खाणं खाऊन ते किती पौष्टिक आहे, हे सांगितलं होतं. त्यावरून समाजमाध्यमावर खूप ट्रोलिंग झालं होतं. माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपानुसार, वनतारा इथं हत्ती पुनवर्सन केंद्र आहे. या केंद्रासाठी प्रशिक्षित हत्ती हवा आहे. त्यासाठी केरळमधून एक हत्ती आणला जाणार होता, मात्र तो मिळू शकला नाही. त्यांना नांदणीच्या हत्तीणीची खबर मिळाली. त्यानंतर वनताराशी संबंधित काही लोक नांदणी येथील मठात आले. त्यांना महादेवी हत्तीण हवी होती. त्यासाठी मठाला मोठी देणगी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मात्र बोलणी यशस्वी होऊ शकली नाहीत. मठानं वनतारा केंद्राला हत्तीण देण्यास नकार दिला. (Mahadevi elephant)
हा आरोप खरा असेल तर हत्तीण अंबानीच्या पोराला हवी होती. आता अंबानीच्या पोराला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी. तो कसा मागे हटणार? त्यातूनच या प्रकरणात ‘पेटा’ची एंट्री झाल्याचं बोललं जातं.
महादेवी हत्तीणीची अवस्था खराब झाली असून, ती आजारी आहे. त्यामुळं तिचं पुनर्वसन करावं, अशी याचिका ‘पेटा’कडून थेट मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. वनविभागाची परवानगी न घेता तिला तेलंगणा येथील मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोपही ‘पेटा’तर्फे या याचिकेतून करण्यात आला होता. त्यानंतर हायकोर्टानं हत्तीणीच्या तपासणींसाठी तीन सदस्यांची उच्चाधिकार समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी महादेवीची आरोग्य तपासणी करून हायकोर्टात अहवाल सादर करतात. हत्तीणीची परिस्थिती चांगली नाही. तिची नखं वाढलेली आहेत. पायांना सूज आलेली आहे. साखळदंडानं बांधल्यामुळं हत्तीणीच्या पोटाला व्रण आहेत, असे मुद्दे त्या अहवालात होते. मात्र नांदणी मठाला हा अहवाल मान्य नाही. मग मठाकडूनही हत्तीणीची समांतर आरोग्य तपासणी केली जाते. त्यात हत्तीणीची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल आला. त्यांनी तो न्यायालयात सादर केला. वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाचा हा अहवाल होता, मात्र वनविभागाकडून नांदणी मठाच्या अहवालाबाबत घुमजाव केले गेले. त्यामुळं दोन आठवड्यात महादेवीची रवानगी वनतारा हत्ती पुनवर्सन केंद्रात करण्याचा आदेश हायकोर्टानं दिला. (Mahadevi elephant)
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर जैन मठ आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून कृती समितीची स्थापना केली. कृती समितीनं उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हत्तीणीला नेण्यासाठी गुजरात येथील वनताराचे पथक आल्याचे समजताच २५ जुलैला मध्यरात्री शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि या निर्णयाला विरोध केला. मूक मोर्चा काढून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. कोणत्याही स्थितीमध्ये महादेवी हत्तीणीला गुजरातला घेऊन जाऊ देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी घणाघाती टीका केली. ते म्हणाले, महादेवी हत्तीण नांदणी येथे साडेतीन दशकांपासून आहे. त्यावर कधी कुणी आक्षेप घेतला नाही. अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पाला प्रशिक्षित हत्ती हवा आहे. तो मिळवून देण्यासाठी प्राणीमित्र संघटना, प्रशासन, अनेक राज्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पैसा आणि संपत्तीसमोर न्यायव्यवस्थेला हाताशी धरून समाजाची शेकडो वर्षांची संस्कृती आणि परंपरा मोडण्याचं कटकारस्थान केलं जात आहे, असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.
हत्तीणीची दुरवस्था झाली असं म्हटलं जातंय, तर तिला दुसऱ्या पुनवर्सन केंद्रात नेण्याऐवजी वनतारा अभयारण्यात नेण्याचा घाट का घातला जातोय? असा सवालही उपस्थित केला जातोय. (Mahadevi elephant)
कायदेशीर लढाई जवळपास संपली आहे. उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयानंही नांदणी मठाच्या विरोधात निर्णय दिलाय. नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काहीही बोलण्यास नकार देऊन निर्णय मान्य केला आहे. महादेवी हत्तीणीचा ३४ वर्षांचा नांदणीचा मुक्काम संपला आहे. एका मुक्या जिवासाठी नांदणी पंचक्रोशीतील लोकांनी दिलेला लढा अनेक वर्षे स्मरणात राहील.