कोल्हापूर : प्रतिनिधी : देशात अस्वस्थ आणि विदारक परिस्थिती असून धार्मिकता आणि हिंसाचाराकडे झुकलेल्या समाजाला सुधारणेचे आव्हान शिव- शाहू, फुले आंबेडकर विचारांच्या साहित्यिकांसमोर आहे. सध्याच्या संघर्षमय परिस्थितीत अंधार दूऱ् करण्यासाठी ज्ञानसत्ताक समाजाची निर्मिती करावी लागेल, असे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आयोजित ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना वि.स.खांडेकर पुरस्कार, साहित्यिक प्रज्ञा पवार यांना जनाबाई पुरस्कार, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांना कोयनामाई पुरस्कार, तर सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख यांना सावित्रीमाई पुरस्काराने तर माजी सनदी अधिकारी संजय पाटील आणि सुनिता झाडे यांना धम्मपाल रत्नाकर पुरस्काराने गौरवण्यात आले.
डॉ. साळुंखे म्हणाले, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे हे पुरस्कार असून ते सांस्कृतिक साहित्याचा सन्मान करणारे आहेत. असे पुरस्कार सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. मराठी साहित्यात महिलांचे योगदान मोठे आहे. त्यांनी गुण संपन्न कवितांची निर्मिती करुन मराठी साहित्याला वैभव प्राप्त करुन दिले. असे असताना महिलांना त्यांचे मत मांडताना कमी महत्व दिले जाते, अशी खंतही साळुंखे यांनी व्यक्त केली.
साहित्यिक प्रज्ञा पवार म्हणाल्या, चळवळ आणि सांस्कृतिक स्थित्यंतर घडवणाऱ्या काळात माझी जडणघडण झाली. चळवळीची ती ताकद पुढे घेऊन जाणार आहे. आजच्या काळातील हिंसा ही पूर्वीही होती. पण तिने आता विक्राळ रुप घेतले आहे. तिचे उत्सवीकरण केले जात आहे. राज्यमान्यतेशिवाय हे घडू शकत नाही. त्यामुळे पुरस्कार मिळूनही त्यांना आनंद अंतर्मनात झिरपावा, असे वातावरण नाही. अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी समाजात दुही पसरवण्याच्या काळातही शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार खोलवर रुजलेल्या या नगरीने एकी कायम ठेवले आहे असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख म्हणाल्या, शिक्षण आणि नोकरी म्हणजे महिलांचे सक्षमीकरण नव्हे. संविधानाचा स्वीकार करुन महिलांच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या पुरुषांची आवश्यकता आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमोरे यांनी प्रास्ताविक केले. दमसाचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांनी स्वागत केले. दि.बा. पाटील यांनी आभार मानले. सुत्रसंचालन चंद्रकांत पोतदार यांनी केले. यावेळी प्रा. विनोद कांबळे, गौरी भोगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमोल पालेकर बंडखोर अभिनेते
अमोल पालेकर बंडखोर अभिनेते आहेत. त्यांचे चित्रपट पाहत मी घडलो. ते कृतिशील सामाजिक कार्यकर्ते असून दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येविरोधातील लढ्यात ते पुढे होते अशा शब्दात असे कौतुक डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. पालेकर यांचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थितांना उत्सुकता होती. पण त्यांनी ‘मन:पूर्वक आभार’ ऐवढेच बोलून ते आसनस्थ झाले.