आदमपूर (पंजाब) : पाकिस्तानातील कोणतेही ठिकाण दहशतवाद्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१३ मे) केले. पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. (Modi lauds soldiers)
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर मोदी यांनी सोमवारी पहिल्यांदाच जाहीर भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी आण्विक ब्लॅकमेलिंग भारत कदापी सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे त्यांनी आदमपूर हवाई तळाला भेट दिली. या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी भारतीय हवाई दलाच्या जवानांचे कौतुक केले. हवाई दलाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा इतिहास घडवला आहे. मोदींना यावेळी हवाई दलाच्या जवानांनी परिस्थितीची माहिती दिली. त्यांनीही जवानांशीही संवाद साधला.
लष्कर, नौदल, हवाई दल आणि बीएसएफच्या शूरवीरांना अभिवादन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या धोरणांचे, हेतूंचे आणि निर्णायक क्षमतांचे, एकतेचे प्रतीक आहे. (Modi lauds soldiers)
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या आत जाऊन दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. त्यामुळे शत्रू बिथरून गेला. भारतीय सैन्य दलांकडे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. तसेच भारताला ‘‘जटिल आणि अत्याधुनिक प्रणाली’’ कशी हाताळायची याचे ज्ञान आहे. भारतीय सैन्याने तंत्रज्ञानाचा रणनीतीशी समन्वय साधला आहे.
मोदी म्हणाले, पाकिस्तानने अनेक प्रयत्न केले. मात्र आमचे हवाई तळ आणि संरक्षण पायाभूत सुविधा सुरक्षित राहिल्या. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने मनुष्यबळ आणि यंत्र शक्ती यांच्यात उत्तम समन्वय दाखवला. (Modi lauds soldiers)
पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या तर भारत त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी महत्त्वाचा आढावा घेतला. यामध्ये सीडीएस, लष्करप्रमुख, नौदलप्रमुख, हवाई दलाचे उप प्रमुख आणि संरक्षण सचिव उपस्थित होते.
हेही वाचा :
काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका
१५ लाखांवर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न