कोल्हापूर : प्रतिनिधी : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रेच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्टाने दोषी ठरवले असून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली . अश्विनीचा खून करुन पुरावा नष्ट करण्यात मदत करणाऱ्या महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. अश्विनी बिद्रेंचा खून करणाऱ्या कुरुंदकरने वूडकटरने मृतदेहाचे तुकडे केले होते. ते तुकडे पत्र्याच्या ट्रंकेत घालून वसईच्या खाडीत फेकून दिले. थंड डोक्याने खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या अभय कुरुंदकरचे शंभर अपराध पूर्ण झाले असून न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. (Aswini Bidre Case)
कोण होत्या अश्विनी बिद्रे
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या रहिवासी असलेल्या अश्विनी यांनी परिस्थितीशी झुंज देत अतिशय जिद्दीने अभ्यास करुन आपले शिक्षण पूर्ण केले. २००० पासून त्या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होत्या. विवाहानंतर पती राजू गोरे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्या २००५ मध्ये पोलिस उपनिरीक्षक बनल्या. पती, लहान मुलगी असा संसार सांभाळून त्या पोलिस दलात कर्तव्य बजावत होत्या. अश्विनी बिद्रे यांची सांगलीत पोस्टिंग असताना पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरचा संपर्क आला. २०१५ मध्ये अश्विनी यांची सहायक पोलिस निरीक्षकपदावर बढती झाली. पोलिस दलात एकत्र काम करत असतानाच अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांच्यावर प्रेमाचे जाळे टाकले आणि त्यातच त्या अडकत गेल्या. (Aswini Bidre Case)
खुनानंतरही केले भयंकर कृत्य
अश्विनी बिद्रे यांची बदली रत्नागिरीला झाली होती. कुरुंदकर आणि अश्विनी हे नोकरीत वेगवेगळ्या ठिकाणी असलेले तरी एकमेकांशी भेटत असत. हत्येच्या दिवशी अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे या दोघांनी एकत्रित ठाण्याच्या एका हॉटेलमध्ये चहा घेतला होता. त्यानंतर ते दोघे मीरा रोडवरील फ्लॅटमध्ये गेले. तिथे दोघांमध्ये मोठा वाद झाला. वादाचे पर्यवसान खुनात झाले. अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांच्या डोक्यात लाकडी बॅटने फटके मारल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अभय कुरुंदकरला कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरची मदत झाली. कुरुंदकराचा मित्र महेश फळणीकर हा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावचा रहिवासी आहे. अभय कुरुंदकरने त्याला आजऱ्यातूनच वूडकटर आणायला सांगितले. आजऱ्यातून वूडकटर घेऊन महेश फळणीकर मुंबईला गेला. त्याने आणलेल्या वूडकटरने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. ते एका ट्रंकेत भरुन ती पेटी वसईच्या खाडीत फेकून दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर अभय कुरुंदकर निवांत होता. पण अखेर त्याच्या गुन्ह्याचे बिंग फुटलेच. (Aswini Bidre Case)
भाऊ अभय बिद्रेने सीसीटीव्ही तपासले
अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली. पण या तक्रारीची दखल नवी मुंबई पोलिसांकडून घेतली जात नव्हती. अभयवर गृहखात्याचा वरदहस्त असल्याची चर्चा होती. अश्विनी बिद्रे यांचे पोस्टिंग रत्नागिरी होते. रत्नागिरीत रहात असलेल्या फ्लॅटमध्ये अश्विनी बिंद्रे यांनी सीसीटीव्ही लावले होते. अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे याने अश्विनी बेपत्ता झाल्यावर रत्नागिरीच्या फ्लॅटमधील सीसीटीव्हीचे फुटेज स्वत:च्या लॅपटॉपमध्ये डाऊनलोड करुन घेतले. नोकरी करत असताना आनंद बिद्रे रोज काही काळ सीसीटीव्ही फुटेज चेक करत असत. एके दिवशी सीसीटीव्ही चित्रणात अभय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना मारहाण करत असल्याचे चित्रण मिळाले. त्यांनी ते पोलिसांना तपासासाठी दिले पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उलट या गुन्ह्यात ब्रिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी गप्प बसावे म्हणून त्याच्यांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. पण अखेर खुनाला वाचा फुटलीच (Aswini Bidre Case)
मीडियाने फोडली वाचा
अभय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना मारहाण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मीडियावर झळकले. या वार्तेने पोलिस दलात खळबळ उडाली. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार होते. विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर जोरदार टीका केली. एक महिला अधिकारी बेपत्ता असताना गृहखाते काय करते? असा सवाल सरकारला विचारला होता. लोकप्रतिनिधी आणि जनमताचा वाढता दबाव वाढल्यानंतर अभय कुरुंदकरवर अश्विनी बिंद्रे यांची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. अखेर सात डिसेंबर २०१७ रोजी कुरुंदकरला अटक झाली. पनवेलच्या सहायक आयुक्त संगीत शिंदे अल्फान्सो यांच्याकडे गुन्ह्याचा तपास आला. काही काळ त्यांच्या बदलीचे प्रयत्न झाले. पण पुन्हा तपास त्यांच्याकडे आला. त्यांनी अभय कुरुंदकर आणि त्यांना मदत करणाऱ्या तिघा संशयितांना अटक केली.. (Aswini Bidre Case)
कुरुंदकरचे शिक्षण आजऱ्यात झाले
अभय कुरुंदकर याचे बालपण आणि शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे झाले. अभय आणि त्याचे बंधू संजय कुरुंदकर हे दोघेही पोलिस दलात होते. त्यांचे थोरले बंधू कोल्हापूर जिल्हा परिषदेत होते तर धाकटा बंधू जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. प्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरुंदकर यांचा अभय करुंदकर नातलग लागतो. कुरुंदकरच्या आजी बहिणीकडे रहायवयास आल्या आणि कुरुंदकर कुटुंब आजरावासीय झाले. अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अभयने बालपणीचा मित्र महेश फळणीकरला वूडकटर आणावयास सांगितले होते. फळणीकरने आजऱ्यातील सॉ मिलमधून वूडकटर उपलब्ध करुन दिले होते. मित्राची मदत मात्र महेश फळणीकरला चांगलीच भोवली. सहआरोपी म्हणून तो दोषी ठरला आहे. (Aswini Bidre Case)
खुनानंतरही अश्विनीच्या मोबाईवर चॅटिंग
अश्विनी बिद्रेचा खून झाल्यानंतर अभय कुरुंदकरकडे अश्विनीचा मोबाईल होता. अश्विनी जिवंत आहेत हे भासवण्यासाठी अश्विनी आणि आपल्यात चॅटिंग सुरू असल्याचे तो भासवत होता. ‘हाऊ आर यू’ असे तो मेसेज अश्विनीच्या मोबाईलवरुन स्वत:च्या मोबाईलवर पाठवत असे. अश्विनी ‘यू’ चा वापर वाय न करता कॅपिटल ‘यू’ करत असत. पण अश्विनीच्या मोबाईलवर स्वत: चॅटिंग करतान तो कॅपिटल यू वापरण्याऐवजी वायओयू असे करत असे. हा पुरावाही पोलिसांनी कोर्टात सादर केला. (Aswini Bidre Case)
हेही वाचा :
पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप