मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेले काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबित केले. या कारवाईनंतर विधासभेत गोंधळ उडाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल सातत्याने केलेल्या विधानाचा मुद्दा नाना पटोलेंनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावेळी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्यानंतर पटोले यांच्यावर कारवाई झाली. (Nana Patole suspended)
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुसऱ्या विषयाचे काम सुरू झल्यावर पटोले यांनी लोणीकर आणि मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला. ‘मोदी तुमचा बाप असेल, राज्यातील शेतकऱ्यांचा नव्हे,’ असा संताप व्यक्त करत पटोले यांनी कोकाटे, लोणीकर यांनी केलेल्या विधानबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी यांनी केली. त्यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले. सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. (Nana Patole suspended)
कामकाज सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. पटोले आणि विजय वडेट्टीवार हे त्यांच्या आसनावरुन उठून विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले. पटोले यांनी राजदंडालाही हात घातला. अध्यक्षांसमोर उभे राहून माफीची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाणे बरोबर नाही असे म्हणाले. विरोधकांचा गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केले. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. (Nana Patole suspended)
विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार
पटोलेंच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर एक दिवसासाठी बहिष्कार टाकला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या अवमानाविरोधात आवाज उठविल्याबद्दल महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे कुणीतरी निलंबित झाले आहे. महाराष्ट्रात हा एक भयानक पायंडा पाडला आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव हे की, सरकार शेतकऱ्यांचे नसून निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आमच्या डोक्यावर बसलेले सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचनं न पाळता त्यांचा अपमान करून यांना सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपाने दाखवलं आहे. पटोलेंच्या निलंबनाचा निषेध म्हणून आम्ही आज एक दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.