नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूर शहरात रस्त्याच्या कडेला व्हीव्हीपॅट स्लिप्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जबाबदार सहाय्यक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात येत आहे. या घटनेनंतर निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. (VVPAT slips found on the roads)
बिहारमध्ये गुरुवारी पहिल्या टप्प्यातील १२१ मतदारसंघात मतदान झाले. समस्तीपूरमधील सराईरंजन विधानसभा मतदार संघातील एका महाविद्यालयाजवळ व्हीव्हीपॅट स्लिप्स मोठ्या प्रमाणांवर आढळून आला. सोशल मिडियावर विखुरलेल्या स्लिप्स् चा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ताबडतोब निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. (VVPAT slips found on the roads)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मॉक पोलमधील स्लिप्स होत्या. चूक करणाऱ्या जबाबदार सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. “समस्तीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मॉक पोलच्या व्हीव्हीपॅट स्लिप्स असल्याने, मतदान प्रक्रियेची अखंडता अबाधित आहे. निवडणूक आयुक्तांनीही निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. तथापि, संबंधित एआरओला निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले जात आहे आणि एफआयआर नोंदवला जात आहे,” असे सीईसी कुमार यांनी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (VVPAT slips found on the roads)