-
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
सनातन मंडळी एक मजेशीर खेळी खेळतात. परिवर्तनाच्या चळवळीतील नेते मंडळींना प्रथम ते उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपविण्याचा प्रयत्न करतात. तसे ते संपले नाहीत तर त्यांना छानपणे कापून आपल्या ‘चौकटीत बसवतात! मग तुम्हाला पटवून देतात, ‘या महामानवांनी जे सांगितले, तेच आम्ही सांगतोय!’ वर सांगितलेले तीन मुद्दे आपण लक्षात घेऊया. सनातनी पुण्याने महात्मा फुलेंना प्रथम उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण हाताबाहेर जातंय असे वाटल्यावर चिपळूणकरांनी आपल्या ‘निबंधमाले’त लिहिले, ‘या जोतीला निबंध म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? आणि हा म्हणे निबंध लिहितोय! लिहू देत बापडा, कारण हा जोती म्हणजे मोहरीचे दोन दाणे. या पारड्यात पडले काय आणि त्या पारड्यात पडले काय, त्यामुळे काय फरक पडणार आहे?’ (Swami Vivekananda)
आज लोक ‘निबंधमाला’ विसरलेत. काही जणांना निबंधमाला आणि चिपळूणकर आठवले तरी हे विधान विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे की कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे हे सांगता येणार नाही. पण आज परिवाराच्या समरसता मंचावर एका बाजूला गुरू गोळवलकर दुसऱ्या बाजूला डॉक्टर हेगडेवार आणि मध्यभागी महात्मा फुले अशा प्रतिमा ठेवलेल्या असतात. ज्यांनी महात्मा फुले वाचलेले नसतील त्यांना वाटते गुरू गोळवलकर आणि डॉ. हेडगेवार, महात्मा फुले यांनी जे विचार मांडले होते तेच विचार आज प्रत्यक्षात आणताहेत! अर्थातच महात्मा फुले यांच्याबाबत तसे काही होत नाही. कारण आपणाला महात्मा फुले आणि त्यांचे विचार माहीत असतात.
विवेकानंद आणि मुसलमान
परंतु आपणाला जर महामानवाचे फक्त नावच माहीत असेल, तर त्यांची ही खेळी मोठ्या प्रमाणात किंवा पूर्णपणे यशस्वी होते. स्वामी विवेकानंदांबाबत असे झालेय. या मंडळींनी ‘विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात मिरवला,’ हे आपल्या मनावर वज्रलेप करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर भारतभर सर्वत्र लावलेल्या भित्तिपत्रकातून त्यांनी घरोघरी विवेकानंदांचा एक संदेश पोहोचवला. विवेकानंद म्हणालेत, ‘भारतातील सर्व मुसलमानांना अरबी समुद्रात बुडवा!’
या दोन्ही गोष्टी शतप्रतिशत खोट्या आहेत. खरी गोष्ट अशी आहे की विवेकानंदांनी सनातनी ब्राह्मणी हिंदू धर्मावर घणाघाती प्रहार केले. सनातनी हिंदू धर्माने त्यांना अपरंपार यातना दिल्या. आणखी एक गोष्ट म्हणजे विवेकानंदांनी इस्लामचा गौरव केलाय. ‘या देशाचा अभ्युदय करायचा असेल तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा आणि ती सन्मवयाची प्रक्रिया या देशात सुरू झाली आहे. धर्मांध शक्ती त्यात व्यत्यय आणणार नाहीत ते पहा.’ असे सांगितलेय. या देशाचे नवनिर्माण कसे करता येईल, याबद्दल त्यांनी सांगितलेली रचना आपणाला आजही अचंबित करते. त्याच वेळी ते कृतिशील विचारवंत आहेत. धडपडत, पडत, अडखळत त्यांनी पहिली पावले टाकली. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आराखडा विवेकानंदांनी सांगितलेला आहे. विवेकानंदांनी जगातल्या सर्व धर्मांवर घणाघाती प्रहार करत असतानाच या सर्व धर्मांमधील गाळ काढून टाकला तर ते मानवी जीवनात, मानवी समाजरचनेत संप्रेरक (म्हणजे आजच्या मराठीत कॅटॅलिस्ट!) म्हणून उपयोगी येतील हे सांगितलेय. देशाच्या सीमा संपल्या पाहिजेत. मी समाजवादी आहे. पण समाजवादाला आपली मांडणी नव्याने करावी लागेल, म्हणून सांगितलेय. आपण यातील एकेक गोष्ट नीटपणे लक्षात घ्यावयास हवी. (Swami Vivekananda)
हिंदू धर्मावर कठोर टीका
महात्मा फुले आणि भारतरत्न आंबेडकर यांच्यापेक्षा अधिक भेदक टीका विवेकानंदांनी हिंदू धर्मावर केली आहे. वयाच्या २६व्या वर्षी म्हणजे ७ ऑगस्ट १८८९ रोजी पूज्यपाद यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले. ‘आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जाती विभाग हा वंशगत मानलेला आहे याबाबत माझी खात्री झालेली आहे. त्याचप्रमाणे स्पार्टा देशातील लोकांनी तेथील गुलामांवर अथवा अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी तेथील निग्रोंवर जेवढे अत्याचार केले आहेत, त्यापेक्षा जास्त अत्याचार आपण आपल्या देशातील शूद्रांवर केले आहेत. ‘
१७ ऑगस्ट १८८९ रोजी पूज्यपादांना पाठविलेल्या पत्रात विवेकानंद त्यांना सांगतात, ‘आपले वेद म्हणजे देववाणी. मात्र आज खगोलशास्त्रातील अगदी साध्या गोष्टी त्यांना पूर्णपणे चूक ठरवते. पृथ्वी त्रिकोणी आहे आणि ती वासुकीच्या मस्तकावर ठेवलेली आहे, हे त्यांचे ज्ञान बरोबर घेऊन आपण आज जगात कसे काय जगणार?’
विवेकानंदांनी ३० मे १८९७ रोजी श्री. प्रमदादास मित्र यांना पाठविलेले पत्र महत्त्वाचे आहे. कारण प्रमदादास सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर उभे आहेत आणि या पत्रानंतर त्यांचा आणि विवेकानंदांचा पत्रव्यवहार थांबला. त्या पत्रात विवेकानंद त्यांना सांगताहेत, ‘स्मृती आणि पुराणे हे ग्रंथ सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांनी रचले असून ते तर्कदोष, चुका, भेदभावना, द्वेषभावना यांनी ओतप्रोत भरलेले आहेत. रामानुज, शंकराचार्य हे पुरुष संकुचित हृदयाचे निव्वळ पंडित होते. त्यांच्या ठायी शूद्रांचे, गरिबांचे दुःख पाहून कळवळणारे हृदय कोठे दिसत नाही. दिसते ती पंडितांची शुष्क विद्वत्ता! माझ्या मते जातिव्यवस्था हा मोठा विभाजक घटक आहे. परोपकार हाच धर्म आहे. विधी-अनुष्ठाने या गोष्टी निव्वळ खुळेपणा आहेत.’ (Swami Vivekananda)
देवा माझ्या देशाचे रक्षण कर
- विवेकानंदांनी जून १८९० मध्ये वराहनगर मठ सोडला आणि परिव्राजक म्हणजे भटका संन्यासी म्हणून तीन वर्षे सारा भारत उभा-आडवा पिंजून काढला. त्या कालखंडात २२ ऑगस्ट १८९२ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना मुंबईहून पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘खाणेपिणे आणि स्नान या गोष्टींबाबतचे लोकभ्रमाचे गाठोडे म्हणजे धर्म हीच इकडील लोकांची समजूत आहे. अप्रामाणिक, ढोंगी पुरोहित जे शिकवतील, जी लटपटपंची करतील तोच धर्म असे ते समजतात. कलियुगात ब्राह्मणांच्या रूपाने हिंडणाऱ्या या राक्षसांच्या हातून देवा माझ्या देशाचे रक्षण कर.’
धर्म आहे की सैतानाचे तांडव ?
२० ऑगस्ट १८९३ रोजी विवेकानंद अमेरिकेत होते. सर्वधर्मपरिषदेला अजून तीन आठवडे होते. आमंत्रण नसताना आले म्हणून त्यापूर्वी स्वागतकक्षातून त्यांची खिल्ली उडवून त्यांना परत पाठवलं गेलं. आपण ते आमंत्रण मिळवूच हा विश्वास होता. पण ते तसे मिळाले नाही, तर काय होईल आणि तुम्ही काय करा हे त्यांनी २० ऑगस्ट १८९३ या दिवशी त्यांचा शिष्य आलासिंगा पेरुमल यांना पत्रातून कळवले. पत्रात ते लिहितात, ‘हिंदू धर्माइतका इतर कोणताही धर्म, अगदी ओरडून, ‘सारे मानव एक’ असे सांगत नाही आणि हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातीच्या लोकांना जेवढे पायाखाली तुडवितो तेवढा जगातील इतर कोणताही धर्म तुडवीत नाही! या दूरच्या देशात उपासमारीने किंवा भयंकर थंडीने कदाचित मला मरण येईल. पण माझ्या प्रिय तरुणांनो मी तुमच्यासमोर ‘दलित आणि गरीब यांच्या उन्नतीसाठी’ प्राण पणाला लावून प्रयत्न करण्याचा वारसा ठेवून जात आहे.’
सर्वधर्मपरिषदेनंतर विवेकानंद सव्वा तीन वर्षे इंग्लंड आणि अमेरिकेत होते. त्या कालखंडात त्यांनी लिहिलेली तीन पत्रे फार महत्त्वाची आहेत. त्यातील पहिले पत्र त्यांनी १९ मार्च १८९४ रोजी त्यांचा वराहनगर मठातील गुरुबंधू शशी यांना पाठवले. शशी श्रीरामकृष्णांचे फार जवळचे होते म्हणून त्यांना रामकृष्णानंद असेही म्हणतात. त्या पत्रात विवेकानंद लिहिताहेत, ‘दक्षिण भारतात उच्च जातींकडून खालच्या जातींवर होणारा महाभयानक अत्याचार मी पाहिला आहे. आपला धर्म हा धर्म या नावाला तरी पात्र आहे का? आपल्या देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून मला रात्र रात्र झोप येत नसे. कोट्यवधी लोक अर्धपोटी आहेत किंवा पालापाचोळा खाऊन जगतात आणि त्यांना धर्मज्ञान देतो आहे असे सांगणारे काही लाख साधूसंन्यासी व काही ब्राह्मण कायम मिष्टान्न खातात. हा काय देश आहे की नरक? हा काय धर्म आहे की हे आहे सैतानाचे तांडव ?’
२७ ऑक्टोबर १८९४ रोजी त्यांचा शिष्य आलासिंगा पेरुमल यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘जो धर्म वा जो देव विधवांचे अश्रू पुसत नाही, अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही, त्या धर्मावर व त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही.’ १८८५ मध्ये विवेकानंदांनी त्यांचा गुरुबंधू ब्रह्मानंद यांना पत्र पाठवून सांगितले, ‘आज आठ वर्षांच्या कोवळ्या मुलीचा तीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय. त्या विवाहाबद्दल आई-वडिलांना आनंद होतोय. आम्ही त्याला विरोध केला तर तुम्ही आमचा धर्म बुडवत आहात, असे म्हणतात! अरे मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म ?’
सनातन ब्राह्मणी हिंदू धर्माकडून मरणप्राय यातना
१८९७ मध्ये विवेकानंद बेलूर मठाची स्थापना करण्यात गुंतले होते. त्या वेळी ५ मे १८९७ रोजी धीरामाता यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आजचा हिंदू धर्म जो अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे, तो दुसरे तिसरे काही नसून अवकळा प्राप्त झालेला बौद्ध धर्म आहे. हे आपण हिंदूंना पटवून देऊ शकलो, तर फारशी खळखळ न करता तो सोडून देणे हिंदूंना शक्य होईल.’
हे असे विचार मांडणाऱ्या विवेकानंदांना सनातन ब्राह्मणी हिंदू धर्माने मरणप्राय यातना दिल्या. विवेकानंद अमेरिकेत भाषणे देत होते, त्या वेळी ‘युनिटी ऑफ द मिनिस्टर’ या ब्राह्मो समाजाच्या मुखपत्राने लिहिले, ‘बाबू नरेंद्रनाथ दत्त तथा स्वामी विवेकानंद यांना आम्ही कलकत्ता येथील नववृंदावन थिएटर या नाट्यसंस्थेतील रंगभूमीवर काम करणारा एक नट म्हणून ओळखतो.’ ‘इंडियन रिव्ह्यू’ यांनी लिहिले, ‘हा माणूस ब्राह्मण नाही, शूद्र आहे. याला हिंदू धर्मावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.’
जानेवारी १८९७ मध्ये विवेकानंद भारतात परत आले. या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यांचे देवदुर्लभ असे स्वागत केले. मात्र त्याच वेळी महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्य यांना पत्र पाठवून सांगितले, ‘हा माणूस शूद्र आहे. त्यातून हा समुद्रप्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही.’ विवेकानंद कलकत्त्याला पोहोचले. तेव्हा ‘बंगवासी’ने लिहिले, ‘हा माणूस शूद्र आहे. हिंदू धर्मावर बोलण्याचा आणि संन्यास घेण्याचा याला अधिकार नाही.’ २८ फेब्रुवारी १८९८ रोजी विवेकानंद भगिनी निवेदिता यांना बरोबर घेऊन श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती साजरी करायला दक्षिणेश्वरच्या मंदिरात गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. विवेकानंदांना दारातूनच परत फिरावे लागले. १४ सप्टेंबर १८९९ रोजी लंडनमधील वेदान्त सोसायटीचे प्रमुख, त्यांचे मित्र ई. टी. स्टर्डी यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, ‘भारतात पाय ठेवल्यावर या लोकांनी मला मुंडन करून कफनी घालावयास लावले. या अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहापासून संधिवातापर्यंतचे माझे सारे आजार बळावले आहेत. या अशा अनेक गोष्टींमुळे मला तीव्र वेदना होत आहेत. मात्र त्यामुळे मला आयुष्यातील एक फार मोठा अनुभव मिळाला आहे. तो मला पुढील वाटचालीत नक्कीच उपयोगी पडेल. ‘
जात हे देशातील खरे दुखणे, धर्म नव्हे!
विवेकानंदांनी हिंदू धर्मावर ओढलेले आसूड आणि सनातन हिंदू धर्मांनी त्यांना दिलेल्या यातना आपण पाहिल्या. आता विवेकानंदांनी हिंदू-मुसलमान समन्वय या देशात सुरू झालाय आणि धर्मांध शक्ती त्यात अडथळे आणताहेत हे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलेय ते समजावून घेऊया. आपल्या मनावर एक विचार वज्रलेप करण्याचा प्रयत्न झालाय. तो विचार सांगतो, ‘अत्याचार करून तलवारीच्या जोरावर हिंदूंना मुसलमान आणि ख्रिश्चन बनवले.’ विवेकानंद हे पूर्णपणे नाकारतात. त्यातील पहिले पत्र त्यांनी २२ सप्टेंबर १८९२ रोजी म्हणजे सर्वधर्मपरिषदेच्या एक वर्ष आधी खेत्रीनिवासी पंडितलाल शर्मा यांना पाठवलेय. दुसरे पत्र सर्वधर्मपरिषदेनंतर एक वर्षाने नोव्हेंबर १८९४ मध्ये दिवाणजी यांना पाठवलेय.
त्या दोन्ही पत्रांत ते सांगताहेत, ‘या देशातील धर्मांतरे तलवारीच्या जोरावर झाली, असे मानणे हे ‘महामूर्खपणाचेच’ आहे. त्यांनी धर्मांतरे केलीत पुरोहितांच्या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी, उच्चवर्णीय हिंदू जमीनदारांच्या जाचातून मोकळे होण्यासाठी.’
विवेकानंद आणखीन पुढे गेलेयत. २९ मार्च १८९४ रोजी अमेरिकेतून केरळचे धर्मगुरू सर रेव्हरंड आर ह्युम यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘तू हिंदूंना कॅथॉलिक केलेले नाहीस! तू त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केलंयस.’ जात हे या देशातील खरे दुखणे आहे, धर्म हे नव्हे! हे आज सच्चर समितीचा अहवाल आपणाला सांगतो. त्याआधी खूप वर्षे हे विवेकानंदांनी सांगितलेय !
मुसलमान राजवट वाईट होती. त्यांनी अत्याचार केले. लुटालूट केली. हे आपल्या मनावर बिंबविण्यात आलेय. ते पूर्णपणे चुकीचे आहे हे विवेकानंद सांगतात. ‘भारताचा ऐतिहासिक क्रमविकास’ या आपल्या निबंधात ते म्हणतात, ‘मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होते, त्याचा अंशमात्रसुद्धा आपल्याला पुण्याच्या आणि लाहोरच्या दरबारात दिसत नाही.’ ‘भारताचा भावी काळ’ या आपल्या भाषणात ते म्हणतात, ‘कोणतीही राजवट ही पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. मुसलमान राजवटीचे भारतातील योगदान हे की गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार संपले!’
हिंदू-मुसलमान समन्वयाचा पुरस्कार
हिंदू-मुसलमान सहकार्याची नव्हे तर समन्वयाची एक प्रक्रिया या देशात सुरू झालेली आहे आणि ती जपा, हे विवेकानंद हिंदू आणि मुसलमान या दोघांच्याही लक्षात आणून देतात. १० जून १८९८ रोजी सर्फराज मोहमद हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आमच्या वेदान्तातील सिद्धान्त कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले, तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच. आम्ही व्यवहारातील समता इस्लामकडून शिकतोय.’ मात्र त्याच वेळी हा एकमार्गी प्रवास नाही, तर हे आदानप्रदान आहे, हे त्यांनी सांगितलेय. अमेरिकेत बोस्टन येथे वेंटिथ सेंच्युरी हॉलमध्ये मुलाखत देताना त्यांनी सांगितले, ‘भारतातील इस्लामवर वेदान्तातील उदारमतवादाचा परिणाम झाला आहे. तो सहिष्णू बनलाय आणि जगभराच्या इस्लामपेक्षा वेगळा आहे.’ भगिनी निवेदिता यांनी ‘मला प्रतीत झालेले माझे गुरू’ म्हणून जे पुस्तक लिहिलेय त्यात त्यांनी लिहिलेय, ‘हिंदू-मुसलमान यांच्या समन्वयावरच हा देश उभा राहील, हे त्यांचे मत होते.’ बोलण्याच्या ओघात ते एकदा म्हणाले, ‘या देशात ताजमहालासारखी अलौकिक वास्तू निर्माण करणाऱ्या शहाजहानला तू परकीय आहेस असे म्हणालात तर त्याच्या कबरीतसुद्धा त्याचा थरकाप उडेल !’
विवेकानंदांना हिंदूंनी का स्वीकारले?
आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे थोडा वेळ परत जाऊया. विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात मिरवला आहे, असे सांगणे सनातनी शक्तींना शक्य का झाले? आणि विवेकानंदांची धर्मांबाबतची कल्पना काय होती? आज आपणासमोर ठेवले जाते ते सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी विवेकानंदांनी दिलेले फक्त आठ मिनिटांचे भाषण !
१८९३ मध्ये कोलंबस अमेरिकेला येऊन चारशे वर्षे पूर्ण होत होती. म्हणून अमेरिकेत वर्षभर फार मोठे साहित्यिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक कार्यक्रम होणार होते. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सर्वधर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तीन वर्षे या परिषदेची तयारी सुरू होती. अनेक धर्मगुरूंशी बोलून आणि वेगवेगळ्या समित्या जगभर नेमून प्रत्येक धर्माचा योग्य प्रतिनिधी निवडण्यात आला होता. त्याने त्याच्या धर्माचे वेगळेपण सांगावे, इतर धर्मांपेक्षा तो वेगळा कसा हे सांगावे. त्याचा धर्म जगासमोरचे आजचे प्रश्न कसे सोडवेल आणि इतर धर्मांत आणि त्याच्या धर्मात समन्वय शक्य आहे का? यावरचे आपले विचार मांडावेत अशी रचना होती. निवड झालेल्या प्रत्येक धर्माच्या प्रतिनिधीला जाण्यायेण्याचा खर्च, राहण्याची सोय, भरपूर मानधन या सर्व गोष्टी मिळणार होत्या.
या सर्वधर्मपरिषदेत हिंदू धर्माने आपला प्रतिनिधीच पाठवला नव्हता. कारण अगदी साधे होते. वाटेत हिंदू धर्म बुडविणारा समुद्रप्रवास होता आणि हो परिसंवाद संस्कृत भाषेत नव्हता तर चक्क यवनी भाषेत होता! खिशात दमडी नसताना आणि आमंत्रण नसताना भटका संन्यासी म्हणून भारतभर हिंडणाऱ्या विवेकानंदांनी तिथे जाण्याचे ठरविले. विवेकानंदांची मते सनातन हिंदू धर्माला सहनही होणार नाहीत, अशी आहेत.
२० सप्टेंबर १८९२ रोजी शंकरलाल शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘आपल्या देशाच्या अवनतीचे एक प्रमुख कारण म्हणजे आपण समुद्रप्रवास नाकारला. प्रवास केलाच पाहिजे. दुसऱ्या देशात गेले पाहिजे. आपल्याला जर खरेखुरे राष्ट्र निर्माण करावयाचे असेल, तर अन्य देशांतील विचारप्रवाहांशी आपण खुल्या व मोकळ्या मनाने सतत संबंध ठेवला पाहिजे.’
अमेरिकेत पोहोचल्यावर विवेकानंदांनी अधिक स्पष्ट शब्दांत २७ ऑक्टोबर १८९४ रोजी आलासिंगा पेरुमल यांना पत्र पाठवून सांगितले, ‘ज्या क्षणी हिंदूंनी म्लेंछ हा शब्द शोधून काढला आणि इतर व्यक्तींशी, राष्ट्रांशी आणि धर्माशी असलेला आपला संबंध तोडून टाकला त्या क्षणीच भारताच्या कपाळी सत्यानाश लिहिला गेला.’
सर्वधर्म परिषदेतील भाषण
ते असो! असे खणखणीत विचार असलेले विवेकानंद अमेरिकेला पोहोचले. आमंत्रण नसताना आले म्हणून त्यांची तिथे खिल्ली उडवली गेली. प्रचंड आत्मविश्वास, अथक चिकाटी आणि अद्भुत स्मरणशक्ती याच्या जोरावर विवेकानंदांनी हे आमंत्रण सन्मानपूर्वक मिळविले. सर्वधर्मपरिषद ११ सप्टेंबर १८९३ रोजी सुरू झाली. मात्र ही सर्वधर्मपरिषद सतरा दिवस सुरू होती. ११ सप्टेंबरला सर्वधर्मच्या प्रतिनिधींनी आठ-दहा मिनिटांत आपला धर्म समजावून द्यावयाचा होता. आलेल्या प्रतिनिधींपैकी फक्त बावीस जणांना ही संधी मिळाली. विवेकानंदांचे ते आठ मिनिटांचे भाषण सबंध सभागृहाला संमोहित करून गेले. वक्ता म्हणून विवेकानंदांचे अलौकिक मोठेपण अमेरिकेला समजले हे खरे. मात्र आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही. पुढील सोळा दिवसांत विवेकानंदांनी धर्म म्हणजे काय हे जगभरातून आलेल्या धर्मगुरूंना समजावून दिले! हिंदू धर्माच्या मर्यादा तिथे पण सांगितल्या! २६ सप्टेंबरच्या संध्याकाळच्या सत्रातील विषय होता ‘बौद्ध धर्म’. वक्त्यांमध्ये अर्थातच विवेकानंदांचे नाव नव्हते. बहुतेक वक्त्यांनी ‘बौद्ध धर्म भारतात जन्माला येऊन जगभर पसरला. भारतातून मात्र तो हद्दपार केला गेला याचा उल्लेख केला.’ धर्मपाल यांनी तर ‘विवेकानंदांनी आमच्या मांडणीचा प्रतिवाद करावा’ असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी असलेल्या आल्फ्रेड मॉमरी यांनी विवेकानंदांना विनंती केली, ‘तुम्ही आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे गरजेचे आहे.’
विवेकानंद म्हणाले, ‘खरंतर तुम्ही मला वक्ता म्हणून बोलवावयास हवे होते. कारण मी स्वतः बौद्ध आहे! येशू ख्रिस्त आणि बुद्ध नक्की काय होते हे मानवजातीला समजलेले नाही. येशू ख्रिस्तांना ‘जुन्या करारातील’ अपूर्णता दूर करावयाची होती. त्याचप्रमाणे आमचे बुद्धदेवही हिंदू धर्मातील कालबाह्य तत्त्वे, रूढी आणि काळाच्या प्रवाहात त्यात आलेले दोष दूर करण्यासाठी आले होते. जातिव्यवस्था ही कालबाह्य सामाजिक व्यवस्था आहे. जातिव्यवस्था म्हणजे काही जणांना विशेषाधिकार देणे. याउलट सर्व प्रकारचे विशेषाधिकार नाहीसे करणे, हे नीतीचे आणि नीतितत्त्वावर आधारलेल्या कोणत्याही धर्माचे प्रमुख ध्येय आहे. बौद्ध धर्माने सांगितलेला करुणेचा आणि समतेचा संदेश बरोबर नसेल, तर आमचा किंवा कोणत्याच धर्माचा निभाव लागणार नाही.’
सतरा दिवस चाललेली सर्वधर्मपरिषद २८ सप्टेंबरला संपली. ३० सप्टेंबर १८९३ रोजी ‘बोस्टन इव्हिनिंग ट्रान्सक्रिप्ट’मध्ये आलेली बातमी आहे. ‘सर्वधर्मपरिषदेपुढे झालेले विवेकानंदांचे भाषण आकाशासारखे व्यापक स्वरूपाचे होते व त्यात सर्व धर्मांतील सर्वोत्कृष्ट तत्त्वांचा समावेश होता. सर्व मानवजातीविषयी दया, शिक्षेच्या वा बक्षिसाच्या आशेने नव्हे, तर ईश्वरावरील प्रेमासाठीच सत्कृत्याचे आचरण या तत्त्वांचा या भाषणात अंतर्भाव होता आणि त्यालाच त्यांनी उद्याचा विश्वधर्म असे म्हटले.’ ‘अनेक शतकांच्या प्रवासात सर्व धर्मांमध्ये गाळ साठलेला आहे. तो काढून सर्व धर्म शुद्ध स्वरूपात मानवजातीपुढे ठेवून, ते सर्व एकच आहेत हे समजावून देणे हे माझे जीवितकार्य आहे,’ असे सांगणाऱ्या विवेकानंदांनी सर्व धर्मांना याची जाणीव करून दिली आहे.
२१ मार्च १८९५ रोजी न्यूयॉर्कमधून श्रीमती सारा ओली बुल यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान ही नावे माणसांच्यात बंधुभाव निर्माण करण्याऐवजी दुरावा किंवा वैर निर्माण करताहेत. या सर्व धर्मांमधील शुभ शक्ती आता नाहीशा होऊन त्या आता हानिकारक स्वरूपात भोवताली आहेत आणि त्यांच्या प्रभावामुळे अगदी चांगली माणसेसुद्धा अगदी सैतानासारखी वागताहेत. आटोकाट प्रयत्न करून आपल्याला यश मिळवायचंय.’
हेच विचार अगदी ज्वालाग्राही शब्दांत त्यांनी ७ जून १८९६ रोजी मागरिट नोबेल म्हणजे नंतरच्या भगिनी निवेदिता यांना सांगितले. ‘आजचे जगातील सर्व धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रूपाने उरलेले आहेत.’
धर्माची विज्ञानाशी सांगड
लंडन येथे ‘धर्माची आवश्यकता’ या विषयावर त्यांनी जे भाषण दिले त्यात त्यांनी हे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘एक धर्म खरा ठरला तर सर्व धर्म खरे ठरतात आणि एक धर्म खोटा ठरला तर सारे धर्म खोटे ठरतात आणि कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे आपल्या भोवताली असतात हे पण आपण लक्षात घ्यावयास हवे. आपणाला आज नवा धर्म हवा आहे. आज जगात जे काही चांगले आहे, त्या सर्वांचा समावेश या धर्मात असेल. पण हा धर्म विज्ञानावर आधारित असेल. त्यामुळे तो स्थितिशील नसेल तर गतिशील असेल. सारांश, धर्म आणि आधुनिक भौतिक विज्ञान यांच्यात समन्वय घडून यावयास हवा. हा समन्वय होण्यासाठी या दोघांनाही एकमेकांना काही सवलती द्याव्या लागतील. हे अत्यावश्यक आहे पण हे कठीण आहे, याची मला जाणीव आहे.’
विवेकानंद धर्माकडे संप्रेरक म्हणून पाहतात. कोणतीही फार अवघड रासायनिक प्रक्रिया त्यात आपण चिमूटभर योग्य संप्रेरक टाकला तर सुतासारखी सरळ होते आणि ती रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या चिमूटभर संप्रेरकामध्ये कोणताही बदल न होता पुन्हा तसाच उरलेला असतो. पुढील प्रक्रियेतसुद्धा आपण तो वापरू शकतो. मात्र अनेक वेळा वापरल्यावर तो विषारी बनतो. तो बदलावा लागतो. माणसाला आणि मानवी समाजाला स्वयंशासन देणारा धर्म हा विवेकानंदांच्या मनातील संप्रेरक आहे. त्यांच्या मनात हे अगदी पक्के बसले होते. एक गोष्ट लक्षात घ्या. विवेकानंद समाजवादी आहेत. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत १ नोव्हेंबर १८९६ रोजी मेरी हेल यांना पाठविलेल्या पत्रात लिहिलेय, ‘प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. ज्या वेळी एखाद्या देशात हा समाजवाद येईल त्या वेळी गरिबांची व दलितांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारेल. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल. पण या समाजरचनेत एक धोका दिसतो. या समाजरचनेत मानवी स्वातंत्र्याचा लोप होईल आणि असामान्य प्रतिभावान माणसे निर्माण होणार नाहीत! त्यामुळे ही रचना पण येईल आणि जाईल त्या वेळी आपणाला त्यातील त्रुटी समजतील.’ त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी १८९७ मध्ये मद्रासमध्ये ‘हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘सगळ्या समाजवादी सिद्धान्तांना आणि रचनेला अध्यात्म्याची जोड द्यावी लागेल.’ त्यानंतर १० जून १८९८ रोजी मोहमदानंद यांना पाठविलेल्या पत्रात आपली रचना सांगताना त्यांनी सांगितले, ‘जिथे वेद नाहीत, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचंय. आपल्याला हे काम वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल!’
वर केलेली चर्चा, विवेकानंदांचे विचार तसे परिपूर्ण वाटतात. पण ते अपुरे किंवा एकांगी असू शकतील. कारण फक्त ३९ वर्षांचे आयुष्य, अथक एकाकी धडपड, अनेक व्याधींनी ग्रासलेले शरीर. महत्त्वाचे म्हणजे विवेकानंद जे सांगताहेत ते समजून घेण्याची नव्हे तर ऐकण्याचीसुद्धा कुवत नसलेले शिष्य, गुरुबंधू, भोवतालचा सारा समाज. या अशा परिस्थितीत या देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची एखादी रचना शोधत त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न अंधारात चाचपडत विवेकानंद करत होते का? या प्रश्नाचे उत्तर विवेकानंदांची हजार-पंधराशे पत्रे, त्यांची सविस्तर पण उत्स्फूर्त भाषणे, त्यांनी अनेकांशी केलेले प्रत्यक्ष संवाद यात अजिबात मिळत नाही. कदाचित रामदासांच्या सांगण्याप्रमाणे ‘मसलतीचे बोलू नये, बोलायचे लिहू नये’ असे काही असू शकेल. पण ते नीटपणे समजून घ्यावयाचे असेल तर विवेकानंदांच्या आतल्या आवाजाच्या काही अंधूक लहरी आपल्याला ऐकू येतात का हे पाहावयास हवे. आजही भोवताली गूढतेचे वलय घेऊन उभ्या असलेल्या आणि पूर्णपणे फसलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर सहा वर्षांनी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांच्या बालवयात आणि कुमारवयात या स्वातंत्र्यलढ्याचे पडसाद त्यांच्या मनावर उमटलेले असणार. विवेकानंद १९ वर्षांचे असताना १८८२ मध्ये बंकिमचंद्र यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. संन्याशांनी कल्पकतेने केलेले संघटन जुलमी राजवट कशी उलथवून टाकू शकेल याचे त्यात वर्णन आहे. त्यानंतर चार वर्षांनी विवेकानंद आणि त्यांच्या मित्रांनी वराहनगर मठ स्थापन केला. त्यापुढील चार वर्षांनी म्हणजे १८९० मध्ये विवेकानंद आणि त्यांचे मठातील गुरुबंधू एकेक करत भारतभ्रमण करावयास बाहेर पडले. पुढील तीन वर्षे विवेकानंदांनी भारत उभा-आडवा पिंजून काढला. ते कचराकुंडीजवळ झोपले, भंग्याच्या घरी राहिले. मुसलमानांच्याही घरी राहिले आणि राजवाड्यातही राहिले. सरदार हरिसिंग हे जयपूर लष्कराचे प्रमुख आहेत. त्यांच्या घरी विवेकानंदांनी दहा-बारा दिवस मुक्काम केला. क्रांतिकारकांच्या चळवळीला सक्रिय मदत व मार्गदर्शन करणारे पंडित शामजी कृष्णा वर्मा त्या वेळी अजमेरला राहत. विवेकानंद अजमेरला गेले त्या वेळी ते मुंबईला गेले होते. विवेकानंद अजमेरला आलेत हे समजल्यावर मुंबईतील आपली कामे सोडून ते परत आले. ते आणि विवेकानंद त्यानंतर दहा-बारा दिवस एकत्र होते.
या सर्व धडपडींतून आणि चिंतनातून विवेकानंदांना त्यांचा आतला आवाज ऐकू आला.
भारतात परत आल्यावर आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, ‘आपले भौतिक सामर्थ्य वापरून आपण इंग्रजांना या देशातून घालवून देऊ असे समजणे म्हणजे हिमालयासमोर उभ्या असलेल्या एखाद्या मातीच्या ढेकळाने मी ताकद कमवेन आणि त्याला बाजूला करेन असे म्हणण्यासारखे आहे! माझा आतला आवाज सांगतोय, आम्ही वेदोक्त धर्माचे गूढ रहस्य पाश्चात्त्य जगात प्रसिद्ध करून त्या बलाढ्य लोकांची श्रद्धा व सहानुभूती संपादित करू. राजकारण हा गौण विषय ठरवून आपण राजकारण करू.’
विवेकानंदांची रचना येथे थांबते. त्यानंतर २५ वर्षांनी दुसरा एक महात्मा आपला आतला आवाज ऐकत ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ ही प्रार्थना आणि अहिंसक शांततामय कायदेभंग ही रचना बरोबर घेऊन आपली वाटचाल सुरू करतो.
विवेकानंद आणि गांधी
विवेकानंद आणि गांधीजी यांच्या आतल्या आवाजात आणखी एक साम्य आहे. दोघेही स्वातंत्र्य हे साध्य नव्हे तर एक साधन म्हणून त्याच्याकडे पाहतात. विवेकानंदांनी १९ नोव्हेंबर १८९४ रोजी अमेरिकेतून आपल्या मद्रास प्रांतातील सर्व शिष्यांना ‘माझ्या शूर युवकांनो’ असे संबोधन करत जे पत्र लिहिलेय त्यात त्यांना सांगितलेय, ‘कल्पना करा की इंग्रजांनी सारी सत्ता तुम्हाला दिली, तर परिणाम काय होईल? जे सत्ताधारी होतील ते इतरांना दडपून टाकतील. त्यांच्यापर्यंत काही ती सत्ता, ते स्वातंत्र्य पोहोचू देणार नाहीत. गुलामांना सत्ता हवी असते, इतरांना गुलाम बनविण्यासाठी.’ हे असे होऊ नये यावर फक्त एकच मार्ग आहे, हे विवेकानंद आणि गांधीजी यांना त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोघांचाही आतला आवाज त्यांना नेमकी एकच गोष्ट सांगतोय.
‘या देशात सुरुवात खेड्यापासून करावी लागेल. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण आणि निर्भय बनवले पाहिजे.’ विवेकानंदांची रचना गांधीजींपेक्षा अधिक आक्रमक आणि अधिक गोळीबंद आहे. तीन वर्षे भटका संन्यासी म्हणून सारा भारत उभा-आडवा पिंजून काढल्यावर प्रत्येक खेडे हे अर्धपोटी आणि अर्धनग्न आहे हे पाहून मला रात्र रात्र झोप येत नाही, हे मित्रांना सांगताना या सर्वावरचा एकमेव उपाय त्यांच्या आतल्या आवाजाने त्यांना सांगितला आहे. परंतु अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांनी हा आपला आतला आवाज कोणालाही सांगितलेला नाही. सर्वधर्मपरिषदेत विवेकानंद उभे राहिले ते केवळ प्रोफेसर राईट यांच्यामुळे. त्यांना हा उपाय विवेकानंदांनी सांगितला आहे. पण तो उपाय काय हे त्यांनी राईट यांना पाठविलेल्या पत्रातून आपणाला कळत नाही. परिषद संपल्यावर २ ऑक्टोबर १८९३ रोजी राईट यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेय, ‘तुमचे माझ्यावर किती उपकार आहेत म्हणून सांगू! मला जगाच्या व्यासपीठावर तुमच्यामुळे आणून ठेवणारी ती परिषद आता संपली आहे.’ त्यानंतर २६ ऑक्टोबर १८९३ रोजी राईट यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘माझ्या मनातील योजना मांडण्याने जितके लोक येतील त्यापेक्षा केवळ हा मूर्तिपूजक बोलतो तरी काय या कुतूहलाने अधिक लोक येताहेत. माझ्या योजनेसाठी मला आता सर्वस्व ओतून काम करावयाचे आहे. पण तूर्तास ती योजना पुढे न मांडता मी सर्वसामान्य वक्त्याप्रमाणे भाषणे देणार.’ २८ डिसेंबर १८९३ रोजी हरिपद मित्रा यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘मी या देशात केवळ कुतूहल म्हणून किंवा गंमत पाहण्यास किंवा नाव कमविण्यासाठी आलेलो नाही. मी येथे आपल्या देशातील गरिबांची उन्नती करण्यासाठी काही उपाय सुचतो का, माझ्या रचनेला मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा रचना येथे आढळतात का हे पाहण्यासाठी आलो आहे.’
त्यानंतर तीन महिन्यांनी, त्यापुढील तीन महिन्यांत हा आतला आवाज अगदी सविस्तर पत्रे लिहून त्यांनी चार जवळच्या मित्रांना कळविला. विवेकानंदांचा आतला आवाज समजावा असे वाटणाऱ्या प्रत्येकाने ती चार पत्रे अभ्यासली पाहिजेत. पहिले पत्र १८ मार्च १८९४ रोजी शशीला (म्हणजे श्रीरामकृष्णानंद) यांना लिहिलेय. दुसरे पत्र २८ मे १८९४ रोजी आलासिंगा पेरुमल यांना लिहिलेय. तिसरे पत्र २० जून १८९४ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई (म्हणजे जुनागड संस्थानचे दिवाण) आणि चौथे पत्र २३ जून १८९४ रोजी म्हैसूरच्या महाराजांना लिहिलेय. चारही पत्रांतील रचना प्रामुख्याने अशी आहे, ‘आपल्या देशातील ९० टक्के लोक खेड्यांत राहतात. सर्व खेडी अर्धनग्न आणि अर्धपोटी आहेत. आपण साऱ्या जगातील संपत्ती लुटून आणून एका खेड्यात ओतली, तरी ते खेडे पुन्हा एका वर्षात अर्धपोटी आणि अर्धनग्न असेल. याचे कारण त्यांना अनेक शतके ज्ञान, विज्ञान, खरा धर्म यांपासून आपण वंचित ठेवलंय. आपण माणूस आहोत आणि या समाजाचा एक भाग आहोत, हेच ते विसरून गेलेत. खेड्यात शाळा काढून काही फायदा होणार नाही. मोठी माणसे दिवसभर शेतात राबणार. लहान मुले गुरे राखायला जाणार. स्त्रिया दिवसभर पाणी भर, सरपण आण, जेवण कर म्हणून मेटाकुटीला आलेल्या असणार. माझी रचना सांगतो, मला प्रत्येक खेड्यात दोन शिक्षित संन्यासी ठेवायचे आहेत. संध्याकाळी गावातील लोक पारावर जमतात. तिथे ते त्यांना धर्म समजावून देतील. त्यांच्याकडे पृथ्वीचा गोल असेल. भूगोलाच्या मदतीने ते त्यांना इतिहास शिकवितील. त्यांच्याकडे लोहचुंबक आणि काही रासायनिक पदार्थ असतील. त्यांच्याकडे कंदिलाच्या प्रकाशात दाखविता येतील अशी प्रकाशचित्रे असतील. प्रत्येक खेडे असे उभे करावे लागेल. यासाठी मला आज भारतात दहा हजार संन्यासी मिळतील. मात्र भारतातील कंजूस श्रीमंत यासाठी दमडी देणार नाहीत…. आता मी अमेरिकेत भाषणे देईन आणि या कार्यक्रमासाठी पैसे गोळा करीन.’
या चार जणांपैकी तीन जणांनी विवेकानंदांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. प्रतिसाद दिलाय तो फक्त त्यांचा सर्वात जवळचा शिष्य आलासिंगा पेरुमल यांनी. त्यांनी पत्रात स्पष्टपणे लिहिलेय, ‘मला असले काही जमणार नाही.’ खरी अडचण पुढची आहे. भाषणे देऊन पैसे मिळवीन हा भ्रम आहे, हे त्यांच्या लक्षात आले. अमेरिकेत भाषणे हा ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ आहे. हे त्यांच्या लक्षात आले. भाषणे ठेवणाऱ्या लोकांनी त्यांना फसवले ही खंत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. तीन वर्षांनंतर म्हणजे १८९७ मध्ये विवेकानंद भारतात परत आले. त्या वेळी त्यांनी फारसे पैसे बरोबर आणले नाहीत. त्यांच्या मनातील बेलूर मठाच्या उभारणीसाठी भारतातील एकाही धनिकाने वा संस्थानिकाने एक कवडीसुद्धा दिली नाही. त्यानंतर अडीच वर्षांनी अमेरिकेत भाषणे देऊन पैसे मिळवता येतील म्हणून विवेकानंद परत परदेशात गेले. दीड वर्ष ते तिथे राहिले. `परत जाण्याच्या तिकिटाचे पैसेसुद्धा भाषणातून मला मिळत नाहीत. मला भिक्षा म्हणून किमान मी लंडनला पोहोचेन एवढे तिकिटाचे पैसे द्या’ अशी त्यांनी त्यांच्या अमेरिकेतील शिष्यांना विनंती केली आहे! मात्र कोणीही काहीही मदत केली नाही. १७ जून १९०० रोजी मेरी हेल यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेय, ‘आज भाषण हे केवळ माझ्या उपजीविकेचे साधन उरलंय.’
विवेकानंदांनी लवकर जगाचा निरोप का घेतला?
‘ज्याची हिंमत हरली नाही, तो कधीच हरत नाही’ हा मंत्र बरोबर घेऊन आजन्म वाटचाल करणारे विवेकानंद लांबलांबचे प्रवास करत १९०१ साल उजाडण्याच्या थोडे आधी भारतात परत आले. या देशाचे नवनिर्माण करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षित करणारा त्यांचा बेलूर मठ आकार घेतोय. हा आतला आवाज फार विलक्षण आहे. बेलूर मठाचे सभासद होताना तुमचा धर्म, तुमची जात, तुमचा पंथ, तुमचे लिंग आणि तुमचे राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाणार नव्हते. बेलूर मठात अध्यात्म आणि विज्ञान यांचा अभ्यास करावा लागणार होता. संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर हुकमत मिळवावी लागणार होती. विवेकानंदांनी सांगितले होते, ‘आजच्या जगात संस्कृत ही ढाल आणि इंग्रजी ही तलवार म्हणून तुम्हाला वापरायची आहे.’ इंग्रजीत भाषण देण्यासाठी संन्याशांना तयार करावयाचे होते. आपण भाषण देताना आपला चेहरा, आपले हावभाव सुधारावेत म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव करावयाचा होता. ठरलेल्या वेळेप्रमाणे गोष्टी पार पडल्या नाहीत, तर जेवण मिळणार नव्हते. प्रत्येकाला जमिनीचा एक तुकडा दिलेला होता. त्यात भाजीपाला पिकवून तो जवळच्या बाजारात जाऊन विकायचा होता. थोडक्यात विवेकानंदांच्या आतल्या आवाजाने त्यांना सांगितलेले संन्यासी येथे तयार होऊन प्रत्येक खेड्याचे नवनिर्माण करण्यासाठी तिथे जाणार होते. सनातनी मंडळींच्या आतल्या आवाजाने त्यांना ही रचना भयावह आहे हे सांगितले होते. सर्वप्रथम कलकत्ता महानगरपालिकेने बेलूर मठावर फार मोठा कर बसविला. त्यांचे सांगणे होते, ‘मठ कधी असा नसतो! हे विवेकानंदांचे विश्रामगृह आहे.’ न्यायालयात फेऱ्या मारून, आपली बाजू मांडून विवेकानंदांनी हा निर्णय रद्द करून घेतला. बेलूर मठ आता आकार घेत होता आणि आपल्या कल्पनेतही न मावणारा एक आघात जनसामान्यांवर झाला. एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी का घेतली? तुकाराममहाराज अचानक गरुडावर बसून वैकुंठाला का गेले? त्याचप्रमाणे विवेकानंदांनी अगदी अचानक वयाच्या ३९व्या वर्षी या जगाचा निरोप का घेतला? त्यांचे दोन धाकटे भाऊ महेंद्रनाथ आणि भूपेंद्रनाथ अनुक्रमे ८१ आणि ८७ वर्षे जगले. विवेकानंदांच्या मृत्यूचे कारण आम्हाला समजत नाही, म्हणून कलकत्ता येथील प्रमुख डॉक्टरांनी सांगितले. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण सनातनी मंडळींनी दिलेय. त्यांनी सांगितलेय, ‘ही महासमाधी आहे. अशा वेळी प्राण डोळ्यांवाटे बाहेर जातो. त्यामुळे त्यांचे डोळे लाल झालेत.’ खरी गोष्ट एवढीच की, ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद यांच्या अचानक, विस्मयकारक प्रकारे झालेल्या महानिर्वाणामुळे त्यांचे आतले आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत.
हेही वाचा:
Atal Bihari Vajpeyee अटल वारसा!
congress session : बेळगावात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन
rambhdracharya : भागवत संघाचे नेतृत्व करतात, हिंदू धर्माचे नाही