गॉल : यजमान श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावामध्ये ९ बाद २२९ धावा केल्या. दिनेश चंदिमल आणि कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेकडून अर्धशतके झळकावली. (Srilanka Test)
या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर पथुम निसंका आठव्या षटकात बाद झाल्यानंतर दिमुथ करुणरत्ने व चंदिमल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. कारकिर्दीतील शंभरावी व अखेरची कसोटी खेळणाऱ्या करुणरत्नेने ८३ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह ३६ धावा केल्या. चंदिमलने १६३ चेंडू खेळपट्टीवर ठाण मांडत ६ चौकार व एका षटकारासह ७४ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज, कमिंदू मेंडिस व कर्णधार धनंजय डिसिल्वा हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. (Srilanka Test)
चहापानानंतर थोड्या वेळातच श्रीलंकेची अवस्था ६ बाद १५० अशी झाली होती. मात्र, कुसल मेंडिस आणि रमेश मेंडिस यांनी सातव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचून श्रीलंकेला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. रमेश मेंडिस २८ धावा करून बाद झाला. मेंडिसने दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवत १०७ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ३, तर मॅथ्यू कुन्हेमनने २ विकेट घेतल्या. (Srilanka Test)
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गुरुवारी कमिंदू मेंडिस व प्रबथ जयसूर्या या दोघांचे झेल पकडले. त्याने आता कसोटीत १९७ झेलसह ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक झेल घेणाऱ्या कसोटीपटूंच्या यादीत रिकी पॉटिंगला मागे टाकत अग्रस्थान पटकावले. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. (Srilanka Test)
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – पहिला डाव ९० षटकांत ९ बाद २२९ (दिनेश चंदिमल ७४, कुसल मेंडिस खेळत आहे ५९, दिमुथ करुणरत्ने ३६, मिचेल स्टार्क ३-३७, नॅथन लायन ३-७८) विरुद्ध ऑस्ट्रेलिया.
हेही वाचा :