Home » Blog » स्मृती ‘राज’

स्मृती ‘राज’

स्मृती ‘राज’

by प्रतिनिधी
0 comments
smriti mandhana

भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवत एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली. सामन्यात शतक झळकवून स्मृतीने एक ऐतिहासिक कामगिरी केली.

स्मृती मानधना हे भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रमुख नाव. स्मृतीने आपल्या बॅटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. स्मृती लहान असताना तिच्या भावामुळे तिची क्रिकेटशी ओळख झाली.  लहान असताना आवड म्हणून क्रिकेटशी मैत्री केलेली स्मृती ते भारतीय महिला संघाची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हा तिचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा आहे. आयसीसीच्या जागतिक महिला क्रिकेट क्रमवारीत ती टॉप -१० मध्ये असते. स्मृती मानधना ही भारतीय क्रिकेट संघाची सर्वात तरुण कर्णधार देखील आहे. तिने आपल्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २०२४ला झालेल्या वुमन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावून दिले आहे.  

न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात तिने शतकी खेळी करत भारताची दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडला. मितालीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत सात शतके झळकवली होती. याआधीच स्मृतीने या विक्रमाशी बरोबरी केली होती. परंतु, न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेती तिसऱ्या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे शतक झळकवून  स्मृतीने मितालीचा विक्रम मोडीत काढला. 

स्मृतीचा जन्म १८ जुलै १९९६  रोजी मुंबईत झाला. स्मृती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंब सांगलीला स्थलांतरित झाले. स्मृतीने आपले लहानपण इथेच घालवले. स्मृतीचे वडिल श्रीनिवास हे रसायन वितरक होते. तर, आई स्मिता गृहिणी होत्या. स्मृतीचे वडिल श्रीनिवास यांनी जिल्हास्तरिय तर, भाऊ श्रावण १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.  वैयक्तिक कारणांमुळे ते क्रिकेटपासून दूर गेले. परंतु, स्मृतीला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्यांनी महत्वाचा वाटा उचलला. स्मृती आपल्या मोठा भाऊ श्रावणसोबत क्रिकेटचा सराव करायची. या दरम्यान तिलाही क्रिकेटची गोडी वाटू लागली. दरम्यान तिच्या भावाने कनिष्ठ स्तरावर चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. यामुळे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्याची बातमी यायची. स्मृती तिच्या स्क्रॅपबुकसाठी या बातम्यांचे कात्रण कापत असे. सरावा दरम्यान स्मृतीच्या वडिलांना तिला क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे स्मृती आणि श्रवण हे उजव्या हाताचे. परंतु, ते मैदानात डाव्या हाताने फलंदाजी करतात.  

यानंतर स्मृतीने सांगलीतील प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी स्मृतीने महाराष्ट्र संघाच्या १५ वर्षाखालील संघात पदार्पण केले. यात तिने शानदार कामगिरी केली. यामुळे ११ व्या वर्षी स्मृतीला १९ वर्षाखालील संघात स्थान मिळाले. 

वयाच्या १५ व्या वर्षी स्मृतीला विज्ञानाचा शाखेत जायचे होते. पण, तिच्या आईने यासाठी तिला नकार दिला.  कारण त्यांना माहित होते की क्रिकेट आणि अभ्यासाचा समतोल राखणे कठीण होईल. यानंतर स्मृतीने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तिने सांगलीच्या चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्समधून तिची पदवी पूर्ण केली. यामुळे तिला क्रिकेटसाठी अधिक वेळ घालवण्यास मदत झाली. २०१३  साली स्मृतीने ५ एप्रिल रोजी बडोदा येथे झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी ती फक्त १६ वर्षांची होती. पदार्पणाच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू स्मृती ठरली होती. (३६ चेंडूत ३९) या खेळीसह तिने संघाला विजय मिळवून दिला. ही मालिका भारताने ३-० ने जिंकली. यानंतर १० एप्रिलला स्मृती मानधनाने अहमदाबाद येथे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात तिने ३५ चेंडूत २५ धावांची खेळी केली होती.

स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२३ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.  यानंतर २०२४ साली झालेल्या आयपीएलच्या हंगामात स्मृतीच्या नेतृत्वाखाली बंगळुरूनने वुमन्स प्रिमियर लीगचे विजेतेपद पटकावले होते.  स्मृतीने  वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00