बेंगळुरू : आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाने ऑस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त फिरकीपटू ॲडम झाम्पाच्या जागी कर्नाटकचा डावखुरा फलंदाज रविचंद्रन स्मारनची निवड केली आहे. २१ वर्षीय स्मारनने मागील वर्षीच देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून आयपीएलमध्ये त्याला प्रथमच एका संघाने करारबद्ध केले आहे. (Smaran)
यंदाच्या आयपीएलमध्ये झाम्पाने केवळ दोन सामने खेळल्यानंतर त्याच्या खांद्याची दुखापत बळावली. या दुखापतीवर उपचार करण्यासाठी तो मायदेशी रवाना झाल्यामुळे उर्वरित आयपीएल मोसमात तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हैदराबाद संघास त्याचा बदली खेळाडू निवडण्याची संधी मिळाली. तथापि, हैदराबादने पर्यायी फिरकीपटूची निवड न करता डावखुरा फलंदाज असणाऱ्या स्मारनला संघात स्थान देण्याचे ठरवले. (Smaran)
स्मारनने देशांतर्गत क्रिकेटच्या मागील मोसमात कर्नाटकतर्फे पदार्पण करताना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. सईद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने १७० च्या स्ट्राइक रेटने १७० धावा केल्या. त्याचबरोबर कर्नाटकने विजय हजारे करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेमध्ये त्याने २ शतके व २ अर्धशतकांसह ४३३ धावा फटकावल्या. अंतिम सामन्यात ९२ चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी केल्यामुळे तो सामनावीरही ठरला होता. पदार्पणाच्या रणजी मोसमामध्येही त्याने ७ सामन्यांत ६४.५०च्या सरासरीने ५१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने एक शतक व एक द्विशतकही झळकावले आहे. आयपीएलसाठी नोव्हेंबर, २०२४ मध्ये झालेल्या लिलावादरम्यान स्मारन कराराविना राहिला होता. आयपीएल मोसमाच्या सुरुवातीस रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने एका सराव सामन्यात त्याला खेळवले होते. (Smaran)
हेही वाचा :
पी. व्ही. सिंधू, लक्ष्यकडे नेतृत्व
भारताचा ऑगस्टमध्ये बांगलादेश दौरा