कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र धर्म समतेचे तत्त्व सांगणारा आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड यांनी केले. (Shrirang gaikwad)
शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन आणि मराठी अधिविभाग यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी’ या ग्रंथाविषयी आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत श्रीरंग गायकवाड बोलत होते. संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य गोविंद काजरेकर, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याहस्ते उद्घाटन झाले. (Shrirang gaikwad)
डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, जिथला नागरिक वारी करतो, तो महाराष्ट्र; आणि सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र यावेत, याचे तत्त्वज्ञान सांगणारा तो महाराष्ट्र धर्म, असे वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राचे अभिन्न नाते आहे. सहभोजनाची परंपरा वारकरी संप्रदायाने रुजविली. संतांनी लोकांना जोडून ठेवण्याचे काम सातत्याने केले. ज्ञानेश्वरी, भागवत आणि तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ अवघ्या मानवतेचे सारस्वरुप आहेत. अस्पृश्यतेसह कर्मकांडांची चिकित्सा करीत सर्वांना सामावून घेणारा वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायाच्या समग्र गुणवैशिष्ट्यांची अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी बंडगर यांनी पुस्तकात केली आहे.
वारकरी संप्रदायाच्या परंपरांचा चिकित्सक वेध घेणारे ‘होय होय वारकरी’ हे मराठीतील महत्त्वाचे पुस्तक आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायाच्या वाटचालीचा आणि परंपरांचा वर्तमानकालीन परिप्रेक्ष्यातून वेध घेण्याचा प्रयत्न बंडगर यांनी केला आहे.. संप्रदायातील चांगल्या गोष्टी मांडतानाच वारकरी संप्रदायाच्या आडून समाजमन कलुषित करणाऱ्या प्रवृत्तींचाही शोध ते घेतात. जंगली महाराज, गणपती महाराज यांच्यासारख्या अनेक दुर्लक्षित प्रबोधकांचे काम या पुस्तकामुळे माहीत झाले आहे. अनेक वारकरी कथांचा इतका सुंदर अन्वयार्थ बंडगरांनी लावला आहे की त्यातून महाकादंबरीच्या शक्यताही डोकावतात, असेही ते म्हणाले. (Shrirang gaikwad)
प्राचार्य गोविंद काजरेकर म्हणाले, सांस्कृतिक धुरिणत्व भौतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी आवश्यक असते. हे धुरिणत्व वारकरी संप्रदायाकडे संत ज्ञानेश्वर यांच्यापासून ते नामदेव, तुकाराम यांच्याकडून आले. ज्ञानेश्वरीमध्ये वारकरी संप्रदायाची बीजमांडणी आहे. तेथे समताकांक्षी माणसांचा समुदाय अभिप्रेत असल्याचे माऊलींनी सांगितले. ही मूल्यचौकट पुढे संत तुकाराम यांच्यापर्यंत प्रवाहित होत राहिली. वर्तनव्यवहारातून संतांनी समतेचे आदर्श समाजासमोर मांडले. सहभोजन हे त्यामुळेच समानता मूल्याचे प्रतीक ठरले. त्यातून समाजात सहभावाची जाणीव निर्माण झाली.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, समतेचा विचार प्रवाहीपणे सर्वदूर पसरविणारा वारकरी संप्रदाय म्हणजे तत्कालीन समाजातील एक विद्यापीठच होते. माणसातले माणूसपण कायम जपण्याचे काम वारी करीत असते. भक्तीरसाची प्रचिती घेण्यासाठी आणि आपले पाय जमिनीवर राहण्यासाठी वारीचा अनुभव घेणे आवश्यक आहे. बंडगर यांनी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या माध्यमातून संतसाहित्याला आणखी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Shrirang gaikwad)
कार्यक्रमात दीपा गायकवाड संपादित ‘ज्ञानबातुकाराम’ या विशेष वार्षिकाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लेखक ज्ञानेश्वर बंडगर यांनी ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रेरणांची माहिती दिली. संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यशाळेला डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मनोहर वासवानी यांच्यासह विविध महाविद्यालयांतील मराठीचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :