कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बैठका सुरू केल्या आहे. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील दहा मतदारसंघापैकी कोल्हापूर उत्तर मतदार संघ शिवसेनेने लढवावा, अशी जोरदार मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर उत्तरचा आग्रह धरला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. कोल्हापूर उत्तरसाठी जो उमेदवार दिला जाईल त्यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक राहतील. कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणली जाईल, असा निर्धारही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
‘मातोश्री’वर झालेल्या आढावा बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते. ठाकरे यांनी दहाही मतदारसंघाचा आढावा घेतला. कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी या मतदारसंघात शिवसेनेला जिंकण्याची चांगली संधी आहे. या मतदार संघाचा आग्रह धरावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती ठाकरे यांनी जाणून घेतली. सध्या हा मतदार काँग्रेसकडे असला तरी १९९० पासून या मतदार संघात पाचवेळा शिवसेनेचा विजय झाला आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या मतदार संघात पक्षाला मोठी संधी आहे. उद्धव ठाकरे या मतदारसंघात जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही पदाधिकाऱ्यांनी दिली. शिष्टमंडळात शिवसेना उप नेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, सुनील मोदी, उप प्रमुख दिनेश साळोखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
कोल्हापूर ‘उत्तर’साठी उद्धव ठाकरेंकडे आग्रह
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघापैकी कोल्हापूर उत्तर मतदार संघ शिवसेनेने लढवावा, अशी जोरदार मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
32