महाराष्ट्र दिनमान : प्रतिनिधी : भारतीय नौसेना दिनी भारतीय आरमाराचे जनक, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा ४३ फुटी उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारण्यात आला होता. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर २०२३ रोजी झाले होते. या पुतळ्याच्या प्रतिष्ठापना आणि अनावरण सोहळ्याला बुधवारी (दि.४) एक वर्ष पूर्ण झाले. (Shivaji Maharaj Statue)
पुतळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य सोहळा पार पडला असता, पण पुतळा उभारणीला वर्ष होण्याआधीच अवघ्या आठ महिन्यांत, २७ ऑगस्ट रोजी हा भव्य पुतळा कोसळला. शिल्पकार जयदीप आपटेला अटक झाली. पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागितली. पण ज्याला अनुभव नव्हता अशा शिल्पकार जयदीप आपटेला पुतळा उभारणीचे काम कुणी दिले, पुतळा उभारणीचे काम महाराष्ट्र शासनाने केले की नौदलाने केले, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत.
सिंधुदुर्ग-देवगड येथे पुतळा का उभारला?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वर्षे आहे. भारतीय नौसेनेचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. चार डिसेंबर रोजी देशभर नौसेना दिन साजरा केला जातो. नौसेना दलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांची पाहणी केली. त्यातून सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग येथे नौदल दिन आयोजित करण्याचे आदेश दिले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय नौदलाने घेतला. त्याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली.
पुतळा उभारणीचे काम आपटेला
नौदलाने शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम जयदीप आपटेच्या कंपनीला दिले होते. या पुतळ्याची देखरेख आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हा कंपनीचा प्रोप्रायटर तर डॉ. चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे. शिल्पकाराची निवड, त्याचे डिझाईन ही सर्व प्रक्रिया नौदलाकडून करण्यात आली. मोठे पुतळे तयार करण्याचा अनुभव नसतानाही आपटेला नौदलाने काम कसे दिले असा प्रश्न शिल्पकारांकडून उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांचे जातीने लक्ष
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घातले होते. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, कॅप्टन सुधीर सावंत यांच्यासह व्हॉईस ॲडमिरल डी. के. त्रिपाठी, रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, रिअर ॲडमिरल मनीष चढ्ढा, कमोडोर एस. के. रॉय, संदीप सरना, गोकुल दत्ता, आशिष शर्मा, विक्रम बोरा, कॅप्टन चैतन्य या अधिकाऱ्यांनी नौदल सोहळ्याचे नियोजन केले होते. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्या सोयीसाठी सिंधुदुर्गातील मालवण येथे २.०३ कोटी रुपये खर्चून तात्पुरती तीन हेलिपॅड बांधली होती.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण
पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमारास झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. जगातील चौथ्या क्रमांकावर असलेल्या नौदलाने प्रात्यक्षिके सादर केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे , राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी आदी उपस्थित होते.
वीस युद्धनौकांचा सहभाग
यावेळी नौदलाने शक्तिप्रदर्शनही केले होते. त्यात मिग २९ के ४० विमानांसह वीस युद्धनौकांनी सहभाग घेतला होता. भारतीय नौदलाच्या मरिन कमांडोव्दारे भर समुद्र तसेच किनाऱ्यावरील शोध आणि बचाव कार्य तसेच शत्रूवर प्राणघातक हल्ल्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सोहळ्याला कोकणासह राज्यभरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. लेझर शो ने कार्यक्रमाचा समारोप झाला होता. (Shivaji Maharaj Statue)
पुतळ्याबाबत इतिहास संशोधकाकडून शंका उपस्थित
पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शिवप्रेमींनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट दिली होती. पुतळ्याची उभारणी आणि रचना पाहिल्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून पुतळा साकारताना कोणत्या उणीवा राहिल्या आहेत याची सविस्तर माहिती दिली होती. पण त्याकडे महाराष्ट्र सरकार आणि नौदलाने दुर्लक्ष केले होते.
आठ महिन्यांत पुतळा कोसळला
२६ ऑगस्ट रोजी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना हा ४५ फूट उंचीचा भव्य पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना पुतळा पडल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. स्थानिक शिवप्रेमींनी पुतळा उभारलेल्या राजकोट परिसरात धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे यांनी झालेल्या घटनेची माहिती नौदलाला कळवली. या घटनेने महाराष्ट्रासह देश विदेशात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींनी सोशल मिडियावर जाहीरपणे केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यावर त्यांच्यावर विरोधी पक्षांतील नेत्यांनी टीकेचा भडीमार केला. राज्यभर सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची माफी (Shivaji Maharaj Statue)
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. ‘शिवाजी महाराज आपले दैवत आहे, आपली अस्मिता आहे. यावर राजकारण करू नये. विरोधक माफीची मागणी करत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर एकदा नाही, शंभरवेळा डोके ठेवायला मी तयार आहे. मला त्यात कमीपणा वाटणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य आहेत,’ असे शिंदे त्यावेळी म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी यांनी मागितली माफी
पुतळा कोसळल्यानंतर तीन दिवसांत म्हणजे ३० ऑगस्ट २०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या पायाभरणी कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी‘”छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ एक महापुरुषच नाहीत तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आराध्य दैवताच्या चरणी नतमस्तक होत आता त्यांची माफी मागत आहे,’ या शब्दांत माफी मागितली.
जयदीप आपटे फरार
छत्रपती शिवरायाचा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे या घटनेनंतर फरार होता. पोलिसांनी त्याच्या कल्याणमधील घरात शोध घेतला पण तो मिळाला नाही. पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक केली. शिल्पकार जयदीप आपटेला राज्य सरकार वाचवत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला कल्याणमधील घरातून अटक झाली.
आपटेचा शिल्पकलेतील अनुभव किती? (Shivaji Maharaj Statue)
पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे कोण, याचा शोध पोलिस घेत होते. २५ वर्षी जयदीप आपटे याची जयदीप आपटे मेसर्स आर्टिस्ट्री नामक कंपनी होती. तो कल्याणमध्ये रहात होता. त्याच्या शाळेजवळ सदाशिव साठे यांचा शिल्प घडवण्याचा स्टुडिओ होता. इयत्ता आठवीला असतानाच या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय आपटेने घेतला होता. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून मूर्तिकला विषयात त्याने डिप्लोमा पूर्ण केला. सिंधुदुर्ग येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापूर्वी भव्य पुतळा उभारण्याचा अनुभव आपटेकडे नव्हता. त्याने दीड ते अडीच फुटी मूर्ती किंवा पुतळे तयार केले होते. तरीही शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम आपटेला दिले. पुतळा अनावरणानंतर जयदीप आपटे याने एका दैनिकाला मुलाखत दिली होती. ब्राँझचा भव्य पुतळा बनवायला तीन वर्षांचा काळ लागतो. पण त्याने पुतळा उभारण्याचे काम जून २०२३ मध्ये सुरू केले आणि अवघ्या सात महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण केले. कमी वेळेत पुतळा पूर्ण करण्यासाठी त्याने थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊन करण्याचा निर्णय घेतला. पण काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही, हे आपटेच्या लक्षात आले. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्री डायमेन्शनल प्रिंट करायचे ठरवले. थ्री डायमेन्शनल प्रिंटिंग व्यवसायातील त्याच्या मित्रांनी एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम सुरू झाले. कास्टिंग झालेले तुकडे एकत्र करुन पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये तयार केला जातो. पण कमी वेळ आणि पुतळा नेण्यासाठी कोकणातील लहान रस्ते असल्याने त्याने जागेवरच पुतळा जोडण्याचा निर्णय घेतला. पाऊस, वारा, लोडशेडिंग अशा अडचणीना तोंड देऊन त्याने पुतळा तयार केला. शिवाजी महाराजांच्या विचारांनी उर्जा मिळाल्यानेच पुतळ्याचे काम पूर्ण केले, असे त्याने मुलाखतीत म्हटले होते.
हेही वाचा :
- Maharashtra Government : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांनी घेतलेले निर्णय
- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री
- महायुतीचा सत्ता स्थापनेचा दावा