मुंबई : प्रतिनिधी : शिवसेनेने विजयी उमेदवारांना दगाफटका होऊ नये म्हणून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना ताज लँडस एंड मध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीचे राजकारण होऊ नये आणि पक्षाची वज्रमुठ कायम रहावी यासाठी शिंदे यांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेचे २९ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या २९ विजयी नगरसेवकांशिवाय भाजपचा महापौर होऊ शकत नाही. तर दुसरीकडे उद्धव ठकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने, मनसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या युतीने ७२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ते सत्तेपासून दूर आहेत. असे असले तरी एकनाथ शिंदेंच्या बाजूने असलेल्या काही नगरसेवकांनी शिवसेना फुटीआधी उद्धव ठाकरेंसोबत काम केले आहे. त्यामुळे ऐनवेळी उद्धव ठाकरे दगाफटका करून आपले नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, याची भीती एकनाथ शिंदेंना वाटत असल्याची चर्चा आहे. (Shinde kept the Shiv Sena corporators in a hotel)
तर दुसरीकडे भाजपपासून देखील आपल्या नगरसेवकांना लांब ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा प्लॅन आखल्याचे बोलले जात आहे. कारण महापौर भाजपचा होत असला तरी आपल्या नगरसेवकांशिवाय ते शक्य नाही, हे एकनाथ शिंदेंना माहीत आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचा महापौर होत असला तरी सत्तेत आपल्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी एकनाथ शिंदेंनी ‘हॉटेल पॉलिटिक्स’ची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. कारण भाजपसोबत बोलणी करताना जर जास्त ताणले, तर तेही आपले नगरसेवक फोडू शकतात, अशी देखील भीती एकनाथ शिंदेंना असल्याचे समजते. त्यामुळे जोपर्यंत महापौर निवड होत नाही तोपर्यंत विजयी नगरसेवकांना ‘ताज लँड्स एंड’मध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. (Shinde kept the Shiv Sena corporators in a hotel)