इस्लामाबाद; वृत्तसंस्था : ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) ची शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. या वेळी पाकिस्तानात होणाऱ्या या परिषदेच्या सुरक्षेची जबाबदारी लष्कर घेणार आहे. शाहबाज सरकारने आपल्या स्थानिक पोलिस आणि रेंजर्सवर विश्वास व्यक्त केलेला नाही. या परिषदेवलर हिंसाचाराचे सावट कायम आहे. (Shanghai)
इस्लामाबाद आणि रावळपिंडीत लष्कर तैनात करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, या भागात पाकिस्तानी लष्कराचे सुमारे दहा हजार सैनिक आणि कमांडो तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिस आणि इतर सुरक्षा दलही थेट लष्कराच्या आदेशाचे पालन करतील. सुरक्षेच्या दृष्टीने इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. एवढ्या सुरक्षेनंतरही इम्रान खानचा ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्ष आंदोलन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे लष्कर आणि आंदोलकांमध्ये संघर्षाचे वातावरण वाढले आहे. ‘जिओ न्यूज’ने विमानतळाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारताचे चार सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळही पाकिस्तानला पोहोचले आहे. चीनचे १५ सदस्यीय शिष्टमंडळ, किर्गिस्तानचे ४ सदस्यीय शिष्टमंडळ आणि इराणचे २ सदस्यीय शिष्टमंडळ इस्लामाबादला पोहोचले आहे. दोन्ही शेजारी देशांनी या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय बैठक घेण्यास नकार दिला आहे अशा वेळी ही शिखर परिषद होत आहे.
सध्या पाकिस्तान गंभीर अंतर्गत अस्थिरता, दहशतवाद आणि हिंसाचाराच्या गर्तेत आहे. अशा वातावरणात १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी ‘शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ शिखर परिषद होत आहे. कोणतीही अनुचित घटना टाळता यावी, यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचे पूर्णपणे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. दहशतवादी धमक्या, बलुचिस्तानमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि इम्रान खान समर्थकांनी नुकतीच केलेली निदर्शने यामुळे देशाची सुरक्षा अधिक आव्हानात्मक झाली आहे. दहशतवाद आणि हिंसाचाराचा धोका वाढला आहे. पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादाचा बळी ठरत आहे; मात्र अलिकडच्या आठवड्यात हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः बलुचिस्तान आणि कराचीसारख्या भागात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. बलुचिस्तानमध्ये, ‘बलुच लिबरेशन आर्मी’ (बीएलए) आणि पाकिस्तानी तालिबान यांसारख्या संघटनांच्या हल्ल्यांमध्ये डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कराचीमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यात चीनी नागरिक मारले गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी खराब झाली. याशिवाय दहशतवाद्यांनी पोलिस आणि लष्कराच्या जवानांनाही लक्ष्य केले आहे. गेल्या आठवड्यात बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २० मुले आणि सात कामगारांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. (Shanghai)
पाकिस्तानातील आव्हाने
- बलुचिस्तानमध्ये आग अजूनही धुमसती.
- बलुचिस्तान प्रांतात स्वातंत्र्याच्या मागणीला जाेर.
- ‘बलुचिस्तान आर्मी’ला पाक तालिबानचा पाठींबा.
- दाेन्ही संघटनांकडून महत्त्वाच्या संस्थांवर हल्ले.
- इम्रान खान समर्थकांमुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण.
सुरक्षा, प्रादेशिक स्थिरतवेर चर्चा
या परिषदेत भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांवर कोणतीही चर्चा होणार नाही. या भेटीबाबत जयशंकर म्हणाले की, ‘एससीओ’चे जबाबदार सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी एस. जयशंकर पाकिस्तानला जात आहेत. त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानी ‘मीडिया रिपोर्टस्नुसार, ७६ सदस्यीय रशियन शिष्टमंडळ आधीच इस्लामाबादला पोहोचले आहे. याशिवाय चीन, किर्गिस्तान आणि इतर ‘एससीओ’ सदस्य देशांचे प्रतिनिधीही शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात पोहोचले आहेत. शिखर परिषदेदरम्यान सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरता यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. (Shanghai Cooperation Council)
हेही वाचा :
- पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर
- बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे
- नाट्यगृह मूळ स्वरूपात वेळेत उभारणार