नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये महंमद शमी समर्थपणे भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल, असा विश्वास माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने व्यक्त केला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या उणीव शमी भरून काढेल, असेही बालाजी म्हणाला. (Shami)
दुखापतीमुळे सुमारे सव्वा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर शमीने जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये पुनरागमन केले होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाठीची दुखापत बळावलेला बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शमी वगळता अर्शदीप सिंग, हर्षित राणा हे भारताचे वेगवान गोलंदाज नवखे असून प्रथमच आयसीसीच्या वन-डे स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. परिणामी, शमीवरील जबाबदारी वाढली आहे. मात्र, शमीचा अनुभव आणि कौशल्य पाहता तो ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडू शकतो, असे बालाजीला वाटते. (Shami)
“शमी २०१९ आणि २०२३ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये बुमराहपेक्षा प्रभावी ठरला होता. बुमराह हा नि:संशय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये छाप पाडणारा गोलंदाज आहे, परंतु शमीच्या अनुभवाचे महत्त्वही तितकेच आहे. बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज बनण्यापूर्वी शमीनेच काही वर्षे भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहिली होती,” असे बालाजीने सांगितले. नव्या चेंडूवर भारताला चांगली सुरुवात करून देणे आणि पॉवर-प्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या अधिकाधिक विकेट घेणे, हे वेगवान गोलंदाजांसाठी महत्त्वाचे आहे. शमी नव्या चेंडूचा उत्तमरीत्या वापर करण्याचे तंत्र जाणतो. त्यामुळे तो भारतासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्याचप्रमाणे, जुन्या चेंडूने गोलंदाजी करतानाही, त्याचा अनुभव कामी येईल, असे बालाजीने नमूद केले. (Shami)
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करताना शमीच्या गोलंदाजीची लय आणि वेग यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. परंतु, काही सामन्यांतच शमी जुना वेग पुन्हा मिळवेल, असा विश्वास बालाजीला वाटतो. घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यामुळे काहीसा संथपणा येणे नैसर्गिक आहे. अशावेळी तुम्ही शारीरिक स्थिती स्वीकारून सर्वोत्तम कामगिरी करणे, गरजेचे आहे. शमीला दुबईमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. २०२१ च्या टी-२० वर्ल्ड कपदरम्यान त्याने या स्टेडियमवर गोलंदाजी केली आहे. त्यामुळे, सामन्यादरम्यान शमी हा अर्शदीप आणि हर्षित यांना मार्गदर्शनही करू शकतो, अशी पुस्तीही बालाजीने जोडली. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होणार असून भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे.
हेही वाचा :