दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने मंगळवारी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटनी पराभव करून पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांत संपवून भारताने हे आव्हान ४८.१ षटकांमध्ये ६ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. विराट कोहलीच्या ८४ धावांच्या खेळीमुळे भारताचा विजय सुकर झाला. (Semi-Final)
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला सुरुवातीच्या पाच षटकांत ३० धावांची सलामी दिली. ड्वार्शुईसने गिलचा त्रिफळा उडवून भारताला पहिला धक्का दिला. कॉनोलीला स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित पायचीत झाला. त्याची आक्रमक खेळी २८ धावांवरच थांबली. त्यानंतर, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावा जोडल्या. झाम्पाने श्रेयसला त्रिफळाचीत करून ही जोडी फोडली. श्रेयसने ६२ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह ४५ धावा केल्या. अक्षर पटेलला एलिसने बाद केले. त्यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने संघाचे द्विशतक पूर्ण केले.(Semi-Final)
कोहली शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच झाम्पाने त्याची विकेट काढली. विराटने ९८ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या साहाय्याने ८४ धावांची संयमी खेळी केली. त्यानंतर, राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी फटकेबाजी करून लक्ष्य आवाक्यात आणले. पंड्या २८ धावा करून बाद झाल्यानंतर राहुलने एकोणपन्नासाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलला षटकार खेचून भारताचा विजय साकारला. राहुलने अखेरपर्यंत नाबाद राहत २ चौकार व २ षटकारांसह ३४ चेंडूंमध्ये ४२ धावा फटकावल्या. यादरम्यान, त्याने वन-डे कारकिर्दीतील ३,००० धावांचा टप्पाही ओलांडला.(Semi-Final)
तत्पूर्वी, नाणेफेकीबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या पदरी येणारी निराशा या सामन्यातही कायम राहिली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर महंमद शमी आपल्याच गोलंदाजीवर सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा झेल टिपण्यात अपयशी ठरला. याची भरपाई म्हणून शमीने तिसऱ्या षटकात दुसरा सलामीवीर कूपर कॉनोलीला माघारी पाठवले. हेडने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत तिसऱ्या क्रमांकावरील स्मिथसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. नवव्या षटकात वरुण चक्रवर्तीने हेडला बाद करण्यात यश मिळवले. हेडने ३३ चेंडूंमध्ये ५ चौकार व २ षटकारांसह ३९ धावा फटकावल्या. त्यानंतर, स्मिथ आणि लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचून संघाचे शतक पूर्ण केले. (Semi-Final)
रवींद्र जडेजाने लॅबुशेनला बाद करून ही जोडी फोडली आणि चारच षटकांमध्ये जोश इंग्लिसलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्मिथने पुन्हा ॲलेक्स केरीसह अर्धशतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. शमीने ३७व्या षटकात फुलटॉस चेंडूवर स्मिथचा त्रिफळा उडवला. स्मिथ ९६ षटकांत ४ चौकार व एका षटकारासह ७३ धावा केल्या. अखेरच्या षटकांत केरीच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला. अठ्ठेचाळीसाव्या षटकात श्रेयस अय्यरच्या अचूक थ्रोमुळे केरी धावबाद झाला. त्याने ५७ चेंडूंमध्ये ८ चौकार व एका षटकारासह ६१ धावा केल्या. केरी बाद झाल्यानंतर अल्पावधीतच ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला. भारताकडून शमीने तीन, तर वरुण आणि जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Semi-Final)
धावफलक : ऑस्ट्रेलिया – ट्रॅव्हिस हेड झे. गिल गो. वरुण ३९, कूपर कॉनोली झे. राहुल गो. शमी ०, स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. शमी ७३, मार्नस लॅबुशेन पायचीत गो. जडेजा २९, जोश इंग्लिस झे. कोहली गो. जडेजा ११, ॲलेक्स केरी धावबाद ६१, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. पटेल ७, बेन ड्वार्शुइस झे. अय्यर गो. वरुण १९, ॲडम झाम्पा त्रि. गो. पंड्या ७, नॅथन एलिस झे. कोहली गो. शमी १०, तन्वीर सांघा नाबाद १, अवांतर ७, एकूण ४९.३ षटकांत सर्वबाद २६४.
बाद क्रम : १-४, २-५४, ३-११०, ४-१४४, ५-१९८, ६-२०५, ७-२३९, ८-२४९, ९-२६२, १०-२६४.
गोलंदाजी : महंमद शमी १०-०-४८-३, हार्दिक पंड्या ५.३-०-४०-१, कुलदीप यादव ८-०-४४-०, वरुण चक्रवर्ती १०-०-४९-२, अक्षर पटेल ८-१-४३-१, रवींद्र जडेजा ८-१-४०-२.
भारत – रोहित शर्मा पायचीत गो. कॉनोली २८, शुभमन गिल त्रि. गो. ड्वार्शुईस ८, विराट कोहली झे. ड्वार्शुईस गो. झाम्पा ८४, श्रेयस अय्यर त्रि. गो. झाम्पा ४५, अक्षर पटेल त्रि. गो. एलिस २७, लोकेश राहुल नाबाद ४२, हार्दिक पंड्या झे. मॅक्सवेल गो. एलिस २८, रवींद्र जडेजा नाबाद २, अवांतर ३, एकूण ४८.१ षटकांत ६ बाद २६७.(Semi-Final)
बाद क्रम : १-३०, २-४३, ३-१३४, ४-१७८, ५-२२५, ६-२६०.गोलंदाजी : बेन ड्वार्शुईस ७-०-३९-१, नॅथन एलिस १०-०-४९-२, कूपर कॉनोली ८-०-३७-१, ॲडम झाम्पा १०-०-६०-२, तन्वीर सांघा ६-०-४१-०, ग्लेन मॅक्सवेल ६.१-०-३५-०, ट्रॅव्हिस हेड १-०-६-०.
हेही वाचा :
रिषभ पंतला ‘लॉरियस’ पुरस्कारासाठी नामांकन