Home » Blog » Semi-Final : भारत उपांत्य फेरीत

Semi-Final : भारत उपांत्य फेरीत

‘सुपर-सिक्स’मध्ये स्कॉटलंडवर मात; त्रिशाचे नाबाद शतक

by प्रतिनिधी
0 comments
Semi-Final

क्वालालंपूर : गोंगाडी त्रिशाच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडचा १४० धावांनी पराभव केला. गतविजेत्या भारताचा या वर्ल्ड कपमधील हा सलग पाचवा विजय असून अपराजित राहात भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. (Semi-Final)

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १ बाद २०८ धावा ठोकल्या. भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय स्कॉटलंडच्या चांगलाच अंगलट आला. त्रिशा आणि जी. कमलिनी या जोडीने भारताला १३.३ षटकांत १४७ धावांची सलामी दिली. कमलिनी ४२ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ५१ धावा करून बाद झाल्यानंतर त्रिशाने सानिका चाळकेसोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ६१ धावांची भागीदारी रचली. त्रिशाने ५९ चेंडूंमध्ये १३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ११० धावांची खेळी केली. एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली. सानिका २० चेंडूंत ५ चौकारांसह २९ धावांवर नाबाद राहिली. (Semi-Final)

भारताचे हे आव्हान स्कॉटलंडसाठी अगोदरच खडतर होते. भारतीय गोलंदाजीपुढे तर ते आव्हान अशक्यप्रायच बनले. आयुषी शुक्ला, वैष्णवी शर्मा आणि त्रिशा या तिघींनी मिळून स्कॉटलंडचा डाव १४ षटकांत अवघ्या ५८ धावांत संपवला. आयुषीने ८ धावांत ४, तर वैष्णवीने ५ धावांत ३ विकेट घेतल्या. दहाव्या षटकात हॅट्ट्रिक नोंदवण्याची आयुषीची संधी थोडक्यात हुकली. तिने या षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेतली. त्रिशानेही ६ धावांत ३ विकेट घेऊन अष्टपैलूत्व सिद्ध केले. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिचीच निवड करण्यात आली. (Semi-Final)

मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजला १० विकेटनी नमवले. प्रत्येकी १३ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये विंडीजला ६ बाद ५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशने ८.५ षटकांत बिनबाद ५५ धावा करून विजय साकारला. दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका यांच्यातील सामना पावसामुळे एक चेंडूही न खेळता रद्द करण्यात आला. (Semi-Final)

 

संक्षिप्त धावफलक : भारत २० षटकांत १ बाद २०८ (जी. कमलिनी ५१, गोंगाडी त्रिशा नाबाद ११०, सानिका चाळके नाबाद २९, मेसी मॅसिएरा १-२५) विजयी विरुद्ध स्कॉटलंड – १४ षटकांत सर्वबाद ५८ (पिप्पा केली १२, एमा वॉशिंघम १२, आयुषी शुक्ला ४-८, वैष्णवी शर्मा ३-५, गोंगाडी त्रिशा ३-६).

हेही वाचा :
ज्योती याराजीचे विक्रमासह सुवर्ण

विंडीजचा ३५ वर्षांनी पाक भूमीवर कसोटीविजय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00