अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेली कराडजवळील उंब्रजची (जि. सातारा) नीलम तानाजी शिंदे ही तरुणी अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्यावर तेथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची मृत्यूशी झुंज सुरू असताना तिच्या पालकांना मात्र व्हिसासाठी अकरा दिवस संघर्ष करावा लागला. अमेरिकन वकिलातीने त्यांना व्हिसासाठी पुढील वर्षांची तारीख दिली होती. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तातडीने कार्यवाही केली. अखेर नीलमच्या कुटुंबीयांना व्हिसा मिळाला. (Save Neelam Shinde)
धडक देऊन वाहनचालक पसार
उंब्रजची नीलम शिंदे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेली आहे. १४ फेब्रुवारी रोजी तिला एका मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यादिवशी सायंकाळी सात वाजता स्थानिक पोलिसांना अपघाताची खबर मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा नीलम गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडली होती. लॉरेन्स गॅलो नामग ५८ वर्षाच्या वाहनचालकाने तिला धडक दिली. अपघातानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. नीलमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लॉरेन्स गॅलोला १९ तारखेला अटक करण्यात आली.(Save Neelam Shinde)
व्हिसा मिळवण्यासाठी धडपड
नीलमसोबतच्या मैत्रिणींनी तिच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. तसेच संबंधित रुग्णालयातूनही तिच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांना कळवण्यात आले. कुटुंबीयांना तातडीने अमेरिकेत येण्याविषयी सांगण्यात आले. मुलीच्या अपघाताच्या बातमीने शिंदे कुटुंबीय हादरून गेले. त्यांनी तातडीने अमेरिकेला जाण्यासाठी हालचाल सुरू केली. व्हिसा मिळवण्यासाठी तिच्या पालकांची अकरा दिवस धडपड सुरू होती. (Save Neelam Shinde)
अपघातानंतर दुस-याच दिवशी नीलमच्या कुटुंबीयांनी व्हिसासाठी अर्ज केला. परंतु त्यांना व्हिसासाठी मुलाखतीला पुढील वर्षाची तारीख मिळाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत ही माहीत पोहोचली. त्यांनी बुधवारी एक्सच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर हा विषय मांडला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली. त्यानंतर तातडीने व्हिसा मंजूर करण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या बाजूने प्रक्रिया सुरू झाली. (Save Neelam Shinde)
नीलमसाठी अनेकांचे प्रयत्न
नीलम कोमामध्ये असून तिच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हिसा मिळाल्यामुळे तिचे कुटुंबीय तातडीने अमेरिकेला रवाना होणार आहेत. अमेरिकेला जाण्यासाठीचा खर्च त्यांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळे कर्ज काढूनच त्यांना रक्कम उभी करावी लागणार आहे. अमेरिकेतील रुग्णालयाच्या खर्चाचा अद्याप काही अंदाज नसल्यचे नीलमच्या कुटुंबीयांनी माध्यमांना सांगितले. कुटुंबीयांच्या दृष्टिने अमेरिकेतील रुग्णालयात असलेल्या आपल्या मुलीकडे लवकरात लवकर पोहोचणे महत्त्वाचे आहे. नीलमच्या कुटुंबीयांना व्हिसा मिळावा, यासाठी सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहकार्य केल्याचे नातलगांनी सांगितले. एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीने त्यासाठी पाठपुरावा केला आणि `सेव्ह नीलम` ही मोहीम चालवली. (Save Neelam Shinde)
हेही वाचा :
दत्तात्रय गाडेला बेड्या ठोकल्या
कोरटकरांना अटक करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार