कोलकाता : ज्यांनी मला फसवले, त्यांना का सोडले जात आहे, असा सवाल प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी संजय रॉय याने न्यायालयात केला. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत रॉयला दोषी ठरवण्यात आले. त्यावेळी त्याने हा सवाल केला. त्यावर न्यायाधीशांनी त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद सोमवारी ऐकण्यात येणार असल्याचे सांगितले. रॉय याचा रोख आर. जी. कर महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष यांच्याकडे होता. त्यांना पुराव्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक झाली होती. मात्र त्यांना जामीनावर सोडण्यात आले. (Roy guilty)
रॉयला सोमवारी शिक्षा देण्यात येणार आहे. तोपर्यंत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये कोलकाताच्या आर. जी. कर महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सियालदह सत्र न्यायालयाने शनिवारी (दि. १८ जानेवारी) मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरविले. न्यायाधीश अनिर्बन दास यांनी प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर ५७ दिवसांनी निर्णय सुनावला. दास यांनी रॉयला दोषी ठरविताना सांगितले की, तुला शिक्षा मिळायलाच हवी.(Roy guilty)
डॉक्टरवरील अत्याचाराच्या या थरारक घटनेचा देशभर निषेध झाला होता. रॉय कोलकाता पोलिसांचा नागरी स्वंयसेवक म्हणून काम करत होता. गुन्हा घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ९ ऑगस्ट २०२४ रोजी त्याला अटक केली होती. आज सुनावणीनंतर न्यायाधीशांनी, आम्ही सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले आहेत. तसेच वकिलांचा युक्तिवादही ऐकला. या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले.(Roy guilty)
घटना काय?
आर. जी. कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला ८ ऑगस्टच्या रात्री उशिरा शिफ्ट संपल्यानंतर आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली होती. ९ ऑगस्टला सकाळी तिचा मृतदेह हॉलमध्ये आढळून आला. विच्छेदन केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्या शरीरावर २५ जखमा होत्या. रॉयनेच या डॉक्टरवर आधी बलात्कार केला. नंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली. तसेच मृतदेहाची विटंबना केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये गेला होता आणि नंतर पहाटे ४.३० च्या सुमारास बाहेर आल्याचे दिसले होते.
हेही वाचा :
सिद्धरामय्यांची तीनशे कोटींची संपत्ती जप्त