Home » Blog » Sanjay Patil felicitated : दु:ख दूर करणाराच खरा नेता

Sanjay Patil felicitated : दु:ख दूर करणाराच खरा नेता

कैलाश सत्यार्थींकडून डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचे कौतुक

by प्रतिनिधी
0 comments
Sanjay Patil felicitated

कोल्हापूर : प्रतिनिधी : दुसऱ्याचे दु:ख दूर करुन त्यांच्या जीवनात आनंद फुलवणाराच खरा नेता असतो, असे गौरवोद्गार नोबेल पारितोषिक विजेते, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्याबद्दल काढले. संजय पाटील यांचा वाढदिवस हा त्यांनी उभारलेल्या रुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्याचा, त्यांच्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव आहे. समाजासाठी डॉ. संजय पाटील यांचे योगदान मोलाचे आहे, असे मतही डॉ. सत्यार्थी यांनी व्यक्त केले. (Sanjay Patil felicitated)

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित केलेल्या गौरव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सत्यार्थी बोलत होते. डॉ.  सत्यार्थी यांच्या हस्ते डॉ. संजय पाटील यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सुमेधा सत्यार्थी यांच्या हस्ते वैजयंती पाटील यांचा सत्कार झाला. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी पाटील, डॉ. संजय पाटील, वैजयंती पाटील, डॉ. पी. डी. पाटील, आमदार सतेज पाटील, जयंत आसगांवकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. डॉ. संजय पाटील गौरवग्रंथ आणि ‘ट्रान्सफार्मिंग हायर एज्युकेशन : अ जर्नी इन टु न्यू डायमेन्शन’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या दोन्ही ग्रंथांचे संपादक डॉ. भालबा विभुते यांचा सत्कार करण्यात आला. (Sanjay Patil felicitated)

डॉ. सत्यार्थी म्हणाले, विकासाच्या संकल्पना बदलल्या आहेत. जीवन गतिमान बनले आहे. भौतिक सुविधा वाढल्या. मात्र बिघडत असलेले सामाजिक स्वास्थ्य आणि गरीब-श्रीमंतांमधील रुंदावत चाललेली दरी ही समस्या उभी ठाकली आहे. समाजात समाधान, आनंद, स्वास्थ्य टिकवायचे आणि वाढवायचे असेल तर परोपकार, करुणा आणि सेवेचा भाव प्रत्येकाच्या ठायी भिनला पाहिजे. आयुष्य सार्थकी लावायचे असेल तर चांगली कामे राहा.”

डॉ. सत्यार्थी यांनी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप व डॉ. संजय पाटील यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी क्षेत्रात संजय पाटील यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. निरपेक्ष वृत्तीने ते कर्म करत राहिले. त्याद्वारे साकारलेल्या कार्यातून समाजाचे भले झाले. लोकांच्या सदिच्छांच्या बळावर ते शतायुषी होतील, असे ते म्हणाले. (Sanjay Patil felicitated)

आमदार सतेज पाटील म्हणाले,‘ संजय पाटील यांचे व्यक्तिमत्व कर्तृत्वाने, कष्टाने घडले आहे. त्यांनी आयुष्यात अनेकांना आधार दिला. संजय भैय्या हे साऱ्या कुटुबांचे आधार आहेत. त्यांनी आईंच्या नावांनी मेरिट स्कॉलरशीप  सुरू केली. त्या अंतर्गत हुशार विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. डी. वाय. पाटील संस्थेतून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. ज्यावेळी त्यांच्याकडे शैक्षणिक संस्थेची जबाबदारी सोपवली त्यावेळी तीन हजार विद्यार्थी शिकत होते. आज संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५०० हजार आहे. त्यांनी अनेकांना आधार दिला. तळसंदे येथे माळरान खरेदी करुन त्यांनी त्या परिसराचे नंदनवन केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे.’

सत्काराप्रसंगी बोलताना डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘‘गगनबावडा डोंगरी भागात साखर कारखाना काढायचे ठरविले. कारखान्यासाठी ऊस आवश्यक होता. या कारखान्याच्या परवानगीसाठी सहा महिने मी दिल्लीत होतो. सर्व परवानग्या मिळविल्या. सतेज पाटलांनी हा कारखाना मोठ्या कष्टाने उभा केला. भागातील तरुणांना रोजगार दिला. दीड हजाराच्या आसपास कामगार आहेत. साडेचार लाख टन ऊसाचे  गाळप होते. यामागे सतेज पाटलांचे कष्ट आहेत. खरे तर सतेज हा माझा हृदय आहे. धाडसी स्वभाव आहे. त्यांनी जे यश मिळवले ते संघर्ष करत साध्य केले आहे.  वाढदिवसाला समारंभ, सत्कार या गोष्टी मला पटत नव्हत्या. त्यांनी पुढाकार घेऊन मोठा समारंभ घडवून आणला. इतक्या साऱ्या लोकांना भेटता आले. खूप आनंदाचा हा क्षण आहे.” (Sanjay Patil felicitated)

अध्यक्षस्थानावरुन बोलताना खासदार शाहू महाराज यांनी डॉ. संजय डी. पाटील यांनी कार्यकर्तृत्वातून  वेगळा मानदंड निर्माण केला आहे. शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कामातून लोकसेवाही साधली असे गौरवोद्गगार काढले. पुणे येथील डॉ. डी. वाय विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी संजय डी. पाटील यांनी जिद्द आणि कष्टाच्या बळावर  यशाला गवसणी घातल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी शिक्षण, आरोग्य व हॉस्पिटॅलिटीमध्ये पाटील यांनी केलेले काम मोठे असल्याचे नमूद केले. (Sanjay Patil felicitated)

डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आर. के. मुदगल, तळसंदे येथील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. प्रभात रंजन,  ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव व्ही. व्ही. भोसले,  डीन आर. के. शर्मा, आकुर्डी येथील कॅम्पस डायरेक्टर अमित विक्रम, प्रताप चव्हाण पाटील, मेघराज काकडे, देवराज पाटील, सुप्रिया चव्हाण, भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, भारत पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील,  देवश्री पाटील, पूजा पाटील,  वृषाली पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

हिरव्या बोलीचा सामाजिक अविष्कार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00