मेलबर्न : द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव, अग्रमानांकित आर्यना सबालेंका यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत उपांत्य फेरी गाठली. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची चीनची साथीदार शुआई झँग यांचे या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. (Sabalenka)
जर्मनीच्या झ्वेरेवने उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या बाराव्या मानांकित टॉमी पॉलला ७-६(७-१), ७-६(७-०), २-६, ६-१ असे पराभूत केले. हा सामना ३ तास २८ मिनिटे रंगला. झ्वेरेवने तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, २०२० आणि २०२४ मध्ये तो उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. उपांत्य फेरीत त्याचा सामना सर्बियाच्या सातव्या मानांकित नोव्हाक जोकोविचशी होईल. दहावेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचने उपांत्यपूर्व सामन्यामध्ये स्पेनच्या तृतीय मानांकित कार्लोस अल्कारेझवर ४-६, ६-४, ६-३, ६-४ अशी मात केली. हा सामना तब्बल ३ तास ३७ मिनिटे रंगला. जोकोविचने तब्बल १२ व्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. (Sabalenka)
महिला एकेरीमध्ये मागील दोन वर्षीच्या विजेत्या बेलारुसच्या सबालेंकाने रशियाच्या अनास्तासिया पॅव्हल्यूचेंकोवाचे आव्हान ६-२, २-६, ६-३ असे परतावून लावले. सबालेंकाने १ तास ५३ मिनिटांमध्ये हा विजय निश्चित केला. मेलबर्न पार्कवरील तिचा हा सलग १९ वा विजय ठरला. सबालेंकाची लढत उपांत्य फेरीत स्पेनच्या ११ व्या मानांकित पॉला बॅडोसाशी होईल. बॅडोसाने उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित कोको गॉफचा १ तास ४३ मिनिटांमध्ये ७-५, ६-४ असा पराभव केला. बॅडोसाने प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. (Sabalenka)
मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हिया गॅडेकी-जॉन पिअर्स या जोडीने बोपण्णा-झँग जोडीचा सुपर टायब्रेकमध्ये २-६, ६-४, ११-९ असा पराभव केला. बोपण्णाला या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये यापूर्वीच पराभव पत्करावा लागला आहे. (Sabalenka)
हेही वाचा :
भारताकडून मलेशियाचा धुव्वा