नवी दिल्ली : देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन रविवारी (२६ जानेवारी) घडले. संरक्षण दलांच्या तुकड्यांचे अप्रतिम संचलन, हेलिकॉप्टर आणि विमानांच्या कसरती आणि विविध राज्यांच्या चित्ररथांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. संचलनात विविध राज्ये आणि मंत्रालयांचे ३१ रंगीबेरंगी चित्ररथ सहभागी झाले होते. त्यानंतर फ्लाय-पास्ट करण्यात आला. हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.(Republic Day Parade)
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. तेथे त्यांनी पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रमुख कार्यक्रमाच्या ठिकाणी परंपरेनुसार राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर स्वदेशी बनावटीच्या लाइट फील्ड गनने २१ तोफांची सलामी देण्यात आली. (Republic Day Parade)
त्यानंतर पाच हजार कलाकारांनी ‘जयती जय माम भारतम्’ या शीर्षक धूनच्या तालावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ४५ हून अधिक नृत्यप्रकार सादर करण्यात आले. पाठोपाठ सशस्र दलांचे संचलन, एनसीसी, एनएसएस आणि विविध राज्ये तसेच विविध मंत्रालयांच्या चित्ररथांचे संचलन झाले. संचलन पाहण्यासाठी कर्तव्यपथावर हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (Republic Day Parade)
प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे दहा हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. विशेषत: विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे आणि शासनाच्या योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांचा यामध्ये समावेश होता.
परेडची सुरुवात ग्रुप कॅप्टन आलोक अहलावत यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी Mi-17 1V हेलिकॉप्टरने फुलांच्या पाकळ्यांच्या माध्यमातून ध्वज फॉर्मेशन केले. यानंतर परेड कमांडर लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार आणि परेड सेकंड-इन-कमांड मेजर जनरल सुमित मेहता यांच्या नेतृत्वाखाली परेड सुरू झाली. या परेडमध्ये परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंग यादव (निवृत्त) आणि सुभेदार मेजर संजय कुमार (निवृत्त) यांच्यासह अशोक चक्र विजेते लेफ्टनंट कर्नल जस राम सिंग (निवृत्त) यांच्यासह सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्राप्तकर्ते सहभागी झाले होते. (Republic Day Parade)
कर्तव्यपथावर प्रदर्शित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये टँक टी-९० (भीष्म); BMP-2 सारथसह NAG क्षेपणास्त्र प्रणाली; ब्रह्मोस; पिनाका मल्टी-लाँचर रॉकेट सिस्टम, अग्निबान मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर; आकाश शस्त्र यंत्रणा; एकात्मिक रणांगण निरीक्षण प्रणाली; ऑल-टेरेन व्हेईकल (चेतक), लाइट स्पेशालिस्ट व्हेईकल (बजरंग), व्हेईकल माउंटेड इन्फंट्री मोर्टार सिस्टीम (ऐरावत), क्विक रिॲक्शन फोर्स व्हेइकल्स (नंदीघोष आणि त्रिपुरांतक) आणि शॉर्ट-स्पॅन ब्रिजिंग सिस्टमचा समावेश होता. (Republic Day Parade)
BrahMos missile, Pinaka multi-launcher rocket system, BM-21 Agnibaan, a 122 mm Multiple Barrel Rocket Launcher, Akash Weapon System being displayed during 76th #RepublicDay Parade on Kartavya Path, in Delhi#RepublicDayParade #76thRepublicDay #RepublicDayOnDD #RepublicDay2025… pic.twitter.com/WVqv2gyk0Q
— DD News (@DDNewslive) January 26, 2025