Home » Blog » Raut attacks hajare : मोदी काळातील घोटाळ्यांबाबत हजारे गप्प का?

Raut attacks hajare : मोदी काळातील घोटाळ्यांबाबत हजारे गप्प का?

खासदार संजय राऊत यांचा सवाल

by प्रतिनिधी
0 comments
Raut attacks hajare

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात गेल्या ११ वर्षात देशात आणि राज्यात इतके घोटाळे, भ्रष्टाचार झाले. लोकशाहीवर हल्ले करण्यात आले. त्याबाबत अण्णा हजारे एका शब्दानेही का बोलले नाहीत?, हे त्यांनी देशाला स्पष्ट करून सांगावे, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी रविवारी हजारे यांना दिले. (Raut attacks hajare)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्याबाबत आनंद व्यक्त करून अरविंद केजरीवाल यांच्या कारकिर्दीबाबत मत मांडले होते.

त्याबाबत पत्रकारांशी बोलताना देताना राऊत म्हणाले की,अण्णा हजारे काय म्हणतात त्याला आता काही महत्त्व राहिलेले नाही. केजरीवाल आणि हजारे यांनी एक मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनामुळेच अण्णा देशाला माहीत झाले. पण गेल्या १२ वर्षांत या देशावर अशी अनेक संकटे आली. देश लुटला जात आहे. विकला जात आहे. एकाच उद्योगपतीच्या घशात देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये पवित्र करून घेण्यात येत आहे. पण अण्णांना त्यावर आपले मत व्यक्त करावेसे वाटत नाही, यामागचं रहस्य काय? असा खोचक सवाल त्यांनी केला. (Raut attacks hajare)

मोदी काळात देशात, महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले, लोकशाहीवर हल्ले झाले, अत्याचार झाला. तेव्हा अण्णा हजारेंनी त्याविरोधात कधीच हालचाल केली नाही. ‘ब्र’ही काढला नाही. पण केजरीवाल यांच्या दिल्लीतील पराभवाने त्यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काल पाहिला, त्यांना अत्यानंद झाला. हा आनंद लोकशाहीला मारक आहे, असे सांगून ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत ‘एक्झिट पोल’ने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. जणू ही निवडणूक भाजपा एकहाती खेचून आणणार हे चित्र अगोदरच स्पष्ट झाले होते. मागील एक वर्षांपासून आपचे जे पानीपत झाले होते. ते सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. (Raut attacks hajare)

महाराष्ट्रानंतर दिल्लीचे निकाल आले, त्यात आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता हे आकडे सांगत आहेत. आता एकत्र यायचा याचा विचार नेत्यांनी करायला हवा, याविषयीची भूमिका सगळ्यांनी घेणे आवश्यक आहे. नाहीतर देशात आणि राज्याराज्यात जे काही चालले त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता द्यावी, असा टोला त्यांनी इंडिया आघाडीला लगावला. जर असे असेल तर हा देश टिकेल का? लोकशाही टिकेल का? विरोधी पक्ष राहिल का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. ‘आप’च्या पराभवाचा आनंद काँग्रेसला झाला असेल तर ते दु:खद आहे, कारण भाजपा सत्तेत आली आहे, हे त्यांनी विसरू नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा :

‘आप’ने १३ जागा कशा गमावल्या?
भाजप, ‘आप’च्या मतात केवळ अडीच टक्क्याचा फरक
बीरेन सिंह मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार
३१ माओवाद्यांचा खात्मा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00