Home » Blog » Ranya Custody : रान्या म्हणते, ‘मी तर फ्रीलान्सर!’

Ranya Custody : रान्या म्हणते, ‘मी तर फ्रीलान्सर!’

कबुलीजबाबामध्ये १७ गोल्डबार बाळगल्याचे मान्य

by प्रतिनिधी
0 comments
Ranya custody

बेंगळुरू : सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिचा ताबा विशेष न्यायालयाने महसूल गुप्तचर विभागाकडे (डीआरआय) सोपवला. त्यानंतर, तिने दिलेला कबुलीजबाब समोर आला असून त्यामध्ये आपण अभिनेत्री, वन्यजीव छायाचित्रकार आणि फ्रीलान्सर असल्याचे तिने म्हटले आहे. (Ranya custody)

सोमवारी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्याला १४.२ किलो सोन्याच्या १७ विटांसह अटक करण्यात आली होती. प्रारंभिक तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आर्थिक गुन्हेविषयक विशेष न्यायालयाने तिला डीआरआयकडे सोपवले. रान्या ही कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पोलिस महासंचालक रामचंद्र राव यांची मुलगी आहे. तिच्यावर दुबईहून बेंगळुरूमध्ये सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. (Ranya custody)

रान्याने स्वेच्छेने डीआरआयला दिलेल्या कबुलीजबाबामध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख आहेत : “माझा जन्म आणि माझी वाढ बेंगळुरू शहरात झाली. माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. मी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून काम करते. त्याचबरोबर, मी वन्यजीव छायाचित्रकार आणि दुबईमधील बांधकाम क्षेत्रात फ्रीलान्सर म्हणून काम करते. आर्किटेक्ट जतीन हुक्केरीसोबत माझा विवाह झाला आहे आणि त्याच्यासोबत मी लॅव्हल रोड येथे राहते. ३ मार्च रोजी कॅम्पेगौडा विमानतळावर माझी स्वाक्षरी घेण्यात आलेले जप्तीपत्र मी वाचले आहे. माझ्याकडून १७ सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्याची बाब मी स्वीकारत आहे.” (Ranya custody)

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विश्वनाथ सी गोवदार यांनी रान्याला पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन केले का, असे विचारले. त्यावर, रान्याने नकारार्थी उत्तर दिले. रान्याने कोठडीत असताना डीआरआयला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. यावेळी, रान्याचे वकील गिरीष यांनी तिच्याशी बोलण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने त्यांना डीआरआय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच अशिलांशी चर्चा करण्याची परवानगी दिली आहे.

हेही वाचा :

मणिपुरात संघर्ष उफाळला; निदर्शकाचा मृत्यू

हम्पीमध्ये परदेशी पर्यटक महिलेवर अत्याचार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00