नवी दिल्ली : तब्बल १२ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या विराट कोहलीला पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांची गुरुवारी निराशा झाली. दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यामध्ये पहिल्या दिवशी विराटला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. (Ranji Trophy)
विराटला पाहण्यासाठी मध्यरात्री २ पासून चाहत्यांनी स्टेडियमबाहेर रांगा लावल्या होत्या. गुरुवारी सकाळी सामन्यापूर्वी, गेट क्र. १६ आणि १७ बाहेर गर्दी आवाक्याबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी, तीन लोक जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. इतक्या सारी दिव्ये पार करून स्टेडियममध्ये पोहोचलेल्या चाहत्यांना विराटचे दर्शन झाले खरे, पण क्षेत्ररक्षक म्हणून. काही चाहत्यांनी तर ‘विराटला गोलंदाजी द्या,’ अशाही घोषणा दिल्या. मात्र, विराट गोलंदाजीस आला नाही. (Ranji Trophy)

विराटला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.
दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये २४१ धावा केल्या. रेल्वेतर्फे उपेंद्र यादवने १७७ चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली. कर्ण शर्माने ७ चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या. दिल्लीतर्फे नवदीप सैनी व सुमीत माथूर यांनी प्रत्येकी ३, तर सिद्धांत शर्मा व मनी ग्रेवाल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. त्यानंतर, फलंदाजीस उतरलेल्या दिल्लीने दिवसअखेरपर्यंत १ बाद ४१ धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा अर्पित राणा १०, तर यश धुल १७ धावांवर खेळत होते. शुक्रवारी विराट फलंदाजीस येण्याची शक्यता आहे. (Ranji Trophy)

गर्दी आवाक्याबाहेर गेल्यामुळे काही वेळ चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पडलेला चपलांचा खच. यावेळी पोलिसाच्या दुचाकीचेही नुकसान झाले.
अन्य सामन्यांत, कर्नाटकने हरियाणाविरुद्ध पहिल्या दिवशी पहिल्या डावात ५ बाद २६७ धावा केल्या. भारताचा फलंदाज लोकेश राहुलला कर्नाटककडून खेळताना केवळ २६ धावा करता आल्या. कर्नाटकचा कर्णधार मयंक अगरवालने ८ चौकार व ३ षटकारांसह ९१ धावांची खेळी केली. मुंबईने मेघालयचा डाव ८६ धावांत संपवून दिवसअखेरपर्यंत २ बाद २१३ धावा केल्या. पहिल्या दिवशी तिसऱ्याच षटकात मुंबईच्या शार्दुल ठाकूरने हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने या षटकाच्या चौथ्या, पाचव्या व सहाव्या चेंडूवर विकेट घेतल्या. मुंबईतर्फे सिद्धेश लाडने १५५ चेंडूंमध्ये ११ चौकार व एका षटकारासह नाबाद ८९ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने १५२ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ८३ धावा फटकावल्या. या दोघांनी खेळ संपेपर्यंत नाबाद १७० धावांची भागीदारी रचली. (Ranji Trophy)
हेही वाचा :