मुंबई : मोठा गाजावाजा करून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास उतरलेल्या भारतीय फलंदाजांना रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यांतही अपयशाचा सामना करावा लागला. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रिषभ पंत या खेळाडूंना आपापल्या संघातर्फे खेळताना दुहेरी वैयक्तिक धावाही करता आल्या नाहीत. (Ranji Trophy)
मुंबईचा-जम्मू आणि काश्मीर यांच्यातील रणजी सामन्यास गुरुवारी मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या स्टेडियमवर सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईचा पहिला डाव अवघ्या १२० धावांत संपुष्टात आला. रोहित शर्मा ३, तर यशस्वी जैस्वाल ४ धावांवर बाद झाला. १८ व्या षटकामध्ये मुंबईची अवस्था ७ बाद ४७ अशी झाली होती. तथापि, शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियन यांनी आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचून मुंबईला शतकी टप्पा ओलांडून दिला. शार्दुलने ५७ चेंडूंमध्ये ५ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा केल्या. कोटियनने २६ धावांची खेळी केली. जम्मू आणि आणि काश्मीरकडून उमर नाझीर मीर आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. (Ranji Trophy)
यानंतर, जम्मू आणि काश्मीर संघाने पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ७ बाद १७४ धावा करून ५४ धावांची आघाडी घेतली होती. अन्य सामन्यामध्ये, रिषभ पंतला दिल्लीकडून खेळताना सौराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावात केवळ एकच धाव करता आली. दिल्लीचा पहिला डाव १८८ धावांत आटोपल्यानंतर सौराष्ट्राने दिवसअखेरपर्यंत ५ बाद १६३ धावा केल्या होत्या. सौराष्ट्राकडून खेळताना भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने ३६ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांची खेळी केली. (Ranji Trophy)
तिसऱ्या सामन्यात कर्नाटकने पंजाबचा पहिला डाव ५५ धावांत संपवला. पंजाबचा कर्णधार शुभमन गिल सलामीला खेळताना केवळ ४ धावा करू शकला. त्यानंतर, कर्नाटकने पहिल्या दिवशी ४ बाद १९९ धावा करून १४४ धावांची आघाडी घेतली होती. (Ranji Trophy)
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ३३.२ षटकांत सर्वबाद १२० (शार्दुल ठाकूर ५१, तनुष कोटियन २६, अजिंक्य रहाणे १२, उमर नाझीर मीर ४-४१, युधवीर सिंग ४-३१) विरुद्ध जम्मू आणि काश्मीर – पहिला डाव ४२ षटकांत ७ बाद १७४ (शुभम खजुरिया ५३, अबिद मुश्ताक ४४, यावेर हसन २९, मोहित अवस्थी ३-३४, शम्स मुलानी २-६१).
हेही वाचा :
भारत साखळीत अपराजित