Home » Blog » Raj Thackeray Politics भाजपला राज ठाकरे यांच्याशी जवळीक हवी आहे का?

Raj Thackeray Politics भाजपला राज ठाकरे यांच्याशी जवळीक हवी आहे का?

राज ठाकरे यांना भाजपशी जवळीक हवी आहे, परंतु भाजपला त्यांच्याशी जवळीक हवी आहे का, हा खरा प्रश्न आहे.

0 comments

शिवसेनेचा दसरा मेळावा, विचारांचे सोने लुटायला या असे आवाहन करतो. त्याच धर्तीवर ‘विचारांची गुढी उभारायला या’ म्हणून राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मनसेचा मेळावा सुरू केला. मराठी नववर्षप्रारंभी, गुढीपाडव्याइतका औचित्यपूर्ण दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाच्या वार्षिक मेळाव्यासाठी दुसरा कुठला असू शकत नाही! त्यांच्या या मेळाव्याला चांगली गर्दी जमते. यंदाही तुफान गर्दी होती. राज ठाकरे यांची क्रेझ टिकून आहे, हे त्यातून दिसून येतं. परंतु ते जे म्हणतात विचारांची गुढी उभारायला, ती गुढी काही आजपर्यंत उभी राहिलेली नाही. भूमिकेतच विसंवाद असल्यामुळं ती उभी राहू शकली नाही. पुढील वर्षी मनसेला वीस वर्षे होतील. दोन दशकांच्या वाटचालीत राज ठाकरे यांच्यासारखा करिश्मा असलेल्या नेत्याचा पक्ष कुठच्या कुठे असायला हवा होता. परंतु संभ्रमावस्थेतील सातत्यापलीकडे त्यांच्या या प्रवासात काही दिसत नाही. (Raj Thackeray Politics)

पहिल्या निवडणुकीत तेरा आमदार हे आजवरचे मनसेचे मोठे यश आहे. त्यानंतर त्यांना यशाने सतत हुलकावणी दिली. त्याहून वाईट म्हणजे सुपारी घेणारा पक्ष अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. ती दूर करण्यासाठी काही किंमत मोजण्याची तयारी असावी लागते, ती राज ठाकरे यांनी आजवर कधी दाखवली नाही. कालसुसंगत राजकारण करण्याऐवजी दिवसेंदिवस राजकीयदृष्ट्या अदखलपात्र होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. पण या वाटचालीत आपली अँग्री यंग मॅनची इमेज जपण्याची त्यांची धडपड मात्र लपून राहात नाही. (Raj Thackeray Politics)

एखाद्या नेत्याचे राजकीय अंदाज चुकू शकतात. युती-आघाडीची गणिते बिघडू शकतात. एखाद्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी किंवा अगदी नगण्य यश मिळू शकते. किंवा सगळी परिस्थिती पोषक असतानाही एखाद्या घटना-प्रसंगामुळे फासे उलटे पडू शकतात. काहीही होऊ शकते. यशापयशाचे मूल्यमापन करून पुढे वाटचाल करायची असते. परंतु चुकांची पुनरावृत्ती करण्यात राज ठाकरे यांची बरोबरी कुणी करू शकत नाही. राज ठाकरे यांचा राजकारणातला अनुभव दांडगा आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षाला वीस वर्षे होत आली असतानाही त्यांना आपली जागा ठरवता येत नाही, हे त्यांच्यासह त्यांच्यामागे अजूनही उभे राहणा-या कार्यकर्त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. (Raj Thackeray Politics)

राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. गंगा प्रदूषणाचा आणि एकूणच नद्यांच्या प्रदुषणाचा मुद्दा त्यांनी मांडला. मागच्या एका कार्यक्रमात कुभमेळ्यासंदर्भात त्यांनी केलेल्या टिपणीमुळे त्यांचे हिंदुत्ववादी समर्थक दुखावले होते. त्यावर मलमपट्टी करण्यासाठी नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा त्यांनी गांभीर्याने मांडला असावा असे त्यांच्य नंतरच्या एकूण मांडणीवरून वाटले. एखादा राजकीय नेता एवढा गंभीर मुद्दा हजारोंच्या जनसमुदायासमोर मांडतो, ही गोष्ट स्वागतार्ह म्हणावी लागेल. औरंगजेबाच्या कबरीसंदर्भातही त्यांनी वस्तुनिष्ठ विवेचन केले. परंतु त्या कबरीचे राजकारण करणा-यांबाबत त्यांची भूमिका मवाळच राहिली. छत्रपती शिवरायांची बदनामी करणा-या कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यासंदर्भात त्यांनी पाळलेले मौन राजकीयच म्हणावे लागेल.

महायुती सरकारला शंभर दिवस झाले. खरेतर या शंभर दिवसांच्या पंचनाम्याची चांगली संधी राज ठाकरे यांच्यासमोर होती. परंतु त्यांना त्यात रस नसावा. सरकारला सहकार्याचीच त्यांची एकूण भूमिका दिसते. त्याचमुळे त्यांनी आमचं ऐकणार असाल तर आमचे तुम्हाला सहकार्य राहील, असे जाहीरपणे फडणवीस यांना सांगितले. आता यांचे ऐकायचे म्हणजे काय करायचे, असा प्रश्न फडणवीस यांनाही पडला असेल. (Raj Thackeray Politics)

राज ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीला गांभीर्य जाणवत होते. परंतु उत्तरोत्तर गांभीर्य कमी होत गेले. राज ठाकरे यांना भाजपशी जवळीक हवी आहे, हे कालच्या मेळाव्याने स्पष्ट केले. परंतु त्याचवेळी त्यांचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे भाजपचे मुंबईचे नेते आशिष शेलार यांच्यावर टीका करतात. त्यामुळे मेळाव्यातून कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हे स्पष्ट होत नाही. (Raj Thackeray Politics)

राज ठाकरे यांना भाजपशी जवळीक हवी आहे, परंतु भाजपला त्यांच्याशी जवळीक हवी आहे का, हा खरा प्रश्न आहे.

भाषणाच्या प्रारंभी प्रबोधनकार अंगात संचारल्याप्रमाणे बोलणारे राज ठाकरे नंतर मात्र नेहमीच्या वळणाने गेले. `ज्यावेळी इतर अंगावर येतील तेव्हा हिंदू म्हणून अंगावर जाऊ एवढी ताकद आपण याठिकाणी ठेवू`, असे म्हणतात तेव्हा पुन्हा ते हिंदुत्ववादी भूमिका कायम ठेवतात. आधीच्या सगळ्या प्रबोधनावर पाणी ओततात.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00